‘रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट’ (RESQ CT) ही स्वयंसेवी संस्था 2007 पासून संकटग्रस्त प्राण्यांसाठी कार्यरत आहे. गेल्या पाच वर्षांपासून या संस्थेने 200हून अधिक प्रजातींच्या दहा हजार वन्यजीवांना थेट विविध प्रकारचेसाहाय्य केले आहे. तसेच वन्यजीव संरक्षण, संवर्धन आणि मानव-प्राणी सहअस्तित्व प्रस्थापित करण्यासाठी देखील ही संस्था कार्यरत आहे. प्रत्येक प्राण्याचा यशस्वी बचाव, पुनर्वसन व त्यानंतर त्या प्राण्याचा त्याच्या नैसर्गिक अधिवासात पुन्हा समावेश करणे, हे या संस्थेचे मुख्य कार्य. अशा या महाराष्ट्राच्या जैवविविधतेच्या रक्षणासाठी कटिबद्ध असणार्या संस्थेच्या कार्याचा परिचय करुन देणारा हा लेख...
गेल्या दशकात आपल्या सभोवतालचा परिसर झपाट्याने बदलत आहे. जलद आधुनिकीकरण आणि हवामानातील बदल यामुळे वन्यप्राण्यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. यात मुख्यतः महाराष्ट्रातील संरक्षित आणि राखीव वनक्षेत्रासाठी नियुक्त केलेल्या 20 टक्क्यांहून कमी जमिनीच्या बाहेर राहणारे वन्यजीव मोठ्या प्रमाणात धोक्यात येत असल्याचे प्रकर्षाने आढळून येते. त्यातच जखमी, आजारी, अनाथ व तस्करी होत असलेले किंवा मानव-प्राणी संघर्षाच्या परिस्थितीत अडकल्यामुळे, झपाट्याने कमी होणार्या प्राण्यांच्या संख्येच्या संरक्षणासाठी शाश्वत उपाय लागू करणे अत्यावश्यक झाले आहे.‘रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट’ची एकूण 70 पेक्षा अधिक बचावकर्त्यांची, पुनर्वसनकर्त्यांची, पशुवैद्यकीयांची व वन्यजीव सामाजिक तज्ज्ञांची टीम संपूर्ण महाराष्ट्रात प्राण्यांना आणि समुदायांना मदत करण्यासाठी अथक परिश्रम करते. ही संस्था प्रतिसादात्मक व प्रतिबंधात्मक क्रियाकलापांद्वारे वन्यजीव आणि मानवी समुदाय यांच्यातील संरक्षण आणि सहअस्तित्वाच्या दृष्टीने व्यापक प्रमाणात कार्य करत आहे.
तांत्रिक बचाव : आव्हानासाठी लागणारी तयारी
आमच्या कामाचा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणजे तांत्रिक बचाव. हा एक अत्यंत आव्हानात्मक असा बचावाचा पैलू आहे. वन्यजीव प्रजातींची विविधता व त्यांच्यावर उद्भवणार्या संकटांच्या विस्तृत श्रेणीमुळे विविध प्रकारच्या परिस्थिती हाताळण्यास सक्षम, प्रशिक्षित आणि अनुभवी टीम आवश्यक आहे.आमची तांत्रिक बचावकार्ये उंच जागांवर अडकलेल्या पक्ष्यांसाठी केलेल्या हवाई बचाव मोहिमेपासून ते बिबट्या, गवा किंवा विहिरीत अडकून पडणार्या इतर लहान सस्तन प्राण्यांसाठी भूमिगत बचाव मोहिमेपर्यंत आहेत. कोणतीही दोन बचावकार्ये कधीही सारखी नसतात. केवळ योग्य व सुरक्षित उपकरणांपलीकडे या बचावकार्यांसाठी ‘क्लायंबिंग‘ आणि ‘रिगिंग‘सारख्या तांत्रिक क्षमतांमध्ये निपुण व कुशल तज्ज्ञांची आवश्यकता असते. हे बचावकर्ते त्यांच्या वन्यजीव हाताळणी कौशल्याचा वापर करून सुरक्षित निष्कर्ष धोरणे तयार करण्यासाठी अनुकूल आणि अनुभवी असणे तितकेच आवश्यक आहे.
वन्यजीव पुनर्वसन आणि संरक्षण कल्याण
एखाद्या वन्यजीवाचा केवळ बचाव केल्यानंतर आमचे काम संपत नाही, तर संबंधित वन्यप्राण्यावर पुढील कार्यवाहीची खात्री करण्यासाठी सुधारित संरक्षण कल्याण प्रयत्नांची तीव्र गरज आहे. बचाव केलेले वन्यजीव तत्काळ सोडण्यासाठी योग्य नसतील, तर पुण्यातील आमची पुनर्वसन सुविधा (महाराष्ट्र वन विभागाकडून अधिकृत पुनर्वसन व उपचार केंद्र) पूर्णपणे सुसज्ज आहे. आमच्याकडे 300 हून अधिक वन्यप्राणी ठेवण्यासाठी अनेक बहुमुखी ‘एन्क्लोजर’ आहेत व आमचे पशुवैद्यक आणि पुनर्वसनकर्त्यांची एक समर्पित टीम या वन्यजीवांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यायोग्य होईपर्यंत विविध प्रजातींच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी परिश्रमपूर्वक या ‘एन्क्लोजर्स’ची निर्मिती करते.
आम्ही पुनर्वसन केंद्रात वन्यप्राण्यांचा सांभाळ करून त्यांना वाढविण्यात आणि त्यानंतर विविध प्रकारच्या प्रजातींना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पुन्हा मुक्त करण्यात यशस्वी झालो आहोत. यामध्ये भारतीय पट्टेदार तरस, वाघाटी, रानमांजर, कोल्हा, पिसोरी हरीण, चिंकारा, भेकर, वानर आणि विविध प्रकारचे पक्षी यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त आम्ही खवले मांजर, पाण्यातील कासव, जमिनीवरचे कासव आणि इतर असंख्य सस्तन प्राण्यांसह बेकायदेशीर वन्यजीव व्यापाराला बळी पडलेल्या हजारो प्राण्यांचे यशस्वीरित्या पुनर्वसन केले आहे आणि त्यांना पुन्हा सुरक्षित अधिवासात परत आणले आहे.
संघर्ष व्यवस्थापन आणि समुदाय शिक्षण
आम्हाला दाट मानवी लोकवस्तीच्या भागात, निवासी तसेच औद्योगिक क्षेत्रातही बिबट्या, गवा, मगरी व साप अशा विविध प्राण्यांच्या बचावासाठी पाचारण केले जाते. या परिस्थितींमध्ये मानव आणि प्राणी या दोघांच्याही सुरक्षिततेची खात्री बाळगणारा दृष्टिकोन अतिशय आवश्यक आहे. परिस्थितीचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यासाठी स्थानिक समुदाय, वन विभाग, पोलीस यंत्रणा आणि इतर संस्थांसोबत काम करणे आम्हाला अनेकदा आवश्यक असते.शिवाय, आम्हाला हे समजले आहे की, मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी मानवी दृष्टिकोन बदलणेही तितकेच महत्त्वाचे आहे. म्हणूनच, ‘रेस्क्यू’ने एक सर्वसमावेशक धोरण तयार केले आहे, जे सामाजिक जागरुकता आणि वन्यजीव संरक्षणाला एकत्र जोडते. आम्ही स्थानिक समुदायांमध्ये मानव-वन्यजीव परस्पर संवाद सुरक्षितपणे आणि आदरपूर्वक हाताळण्यासाठी, त्यांना वन्यप्राण्यांबद्दलचे आवश्यक ज्ञान व सुरक्षिततेची साधने प्रदान करण्यासाठी, नियमित जागरूकता कार्यक्रम आयोजित करतो. हे उपक्रम वन्यजीवांबद्दलचे गैरसमज आणि भीती दूर करण्यासाठी, शांततापूर्ण सहअस्तित्वाला चालना देण्यासाठी एक सर्वव्यापक व्यासपीठ म्हणून काम करतात.
भविष्यातील मार्ग : आव्हानांवर मात करणे, क्षमता निर्माण करणे आणि सहयोगी उपक्रम
वन्यजीव बचाव आणि पुनर्वसन हे एक अल्पचर्चित क्षेत्र असून, त्यासाठी लागणारी संसाधनेही अनेकदा अल्प प्रमाणात उपलब्ध होतात. त्यामुळे याकामी लागणारी रसद, आर्थिक समर्थन सुरक्षित करणे, हे महत्त्वपूर्ण आव्हानांपैकी एक आहे. आम्ही आमच्या कामाच्या महत्त्वतेविषयी जागरूकता पसरवत आहोत. तसेच आमच्या क्षमता वाढवण्यास मदत करू शकणार्या भागीदारांचाही शोध घेत आहोत.भविष्यासाठी राज्यभरात अधिकाधिक ‘रेस्क्यू’ दूरस्थ पथक स्थापन करणे, त्यांना इतर प्रदेशांमध्ये वन्यजीव बचावकार्याला वेळेवर प्रतिसाद देण्यास सक्षम करणे, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. या पथकांसाठीचे आमचे उद्दिष्ट तरुणांमध्ये कौशल्य विकास प्रदान करणे, त्यांना योग्य साधने आणि संसाधनांनी सुसज्ज करणे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, उत्पन्नाचे स्थिर स्रोत उपलब्ध करून देणे हे आहे. जेथे त्यांचे ध्येय मानव आणि वन्यजीवांमधील वातावरण सुधारणे, हेच असेल.
आम्ही पश्चिम महाराष्ट्रात दौंड, बारामती तसेच नाशिक येथे आधीच तीन पथके स्थापन केलेली आहेत. ही पथके वन्यजीव संवर्धनासाठी सामायिक जबाबदारीची भावना वाढवून स्थानिक समुदायांचे संलग्नतेचे बिंदू म्हणून काम करतात व ते वन्यजीव बचाव आणि पुनर्वसनासाठी अधिक समावेशक आणि प्रभावी दृष्टिकोन सक्षम करून स्थानिक वनविभाग अधिकारी आणि संस्थांसोबत भागीदारी निर्माण करण्याच्या दिशेनेदेखील कार्य करतात.आम्ही महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र वन विभागाचे शतशः आभारी आहोत. कारण, त्यांनी आम्हाला राज्यभर वन्यजीव बचाव सेवा प्रदान करण्यासाठी अधिकृत संस्था म्हणून नियुक्त केले आहे. आम्ही वन विभागांसोबत काम करतो, ज्यांचे नियामक प्राधिकरण आणि प्रादेशिक ज्ञान आमच्या तांत्रिक कौशल्य आणि बिनशर्त वचनबद्धतेसह, आम्हाला संसाधने सामायिक करण्यास आणि वन्यजीव संरक्षणाच्या आव्हानांना प्रभावीपणे हाताळण्यासाठी समन्वित आणि शाश्वत दृष्टिकोन विकसित करायला प्रोत्साहन देते.
जसजसे आम्ही बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेतो, शिकतो, तसतशी आमची वाढ होत आहे. आम्ही आमच्या ध्येयासाठी अधिकाधिक वचनबद्ध होतो. आमची आशा आहे की, आमचे कार्य इतरांना नक्कीच प्रेरणा देईल. वन्यजीवांबद्दल सहानुभूती आणि आदराची संस्कृती वाढवेल आणि आमच्या वैविध्यपूर्ण आणि सुंदर महाराष्ट्रात सर्व सजीवांच्या सहअस्तित्वाला चालना देईल. ‘रेस्क्यू’मध्ये आमच्यासाठी, कोणतीही एक प्रजाती फक्त महत्त्वाची नसून, सर्व प्रजातींचे जीवन महत्त्वाचे आहे.
नेहा पंचमिया
(लेखिका ‘रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट‘च्या अध्यक्ष आहेत.)