पर्यावरण संतुलनासाठी लोकसहभाग महत्त्वाचा!

    03-Jun-2023
Total Views | 140
sudhir mungantiwar

हवामान बदलाच्या संकटाशी जर सामना करायचा असेल, तर जंगल क्षेत्र अबाधित राहिलं पाहिजे आणि त्याच वेळेस एकूणच झाडांचं आच्छादन वाढलं पाहिजे, याविषयी कोणाचंच दुमत असू शकत नाही आणि याच विचारातून बहुदा देशाच्या इतिहासातील सगळ्यात मोठी वृक्ष लागवड मोहीम आम्ही हाती घेतली होती. याच काळात मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा ‘आयआयटी मुंबई‘कडून आम्ही सविस्तर अभ्यास करून घेतला आणि त्यांच्याकडून एक अहवालदेखील करून घेतला. या अहवालात जे नमूद केलं आहे ते मुंबईकरांपर्यंत तर पोहोचलं पाहिजेच. पण, ते महाराष्ट्रातील जनतेलादेखील कळले पाहिजे.

सर्वप्रथम दै. ‘मुंबई तरुण भारत’ वर्तमानपत्राच्या सर्व वाचकांना ’जागतिक पर्यावरण दिनाच्या’ शुभेच्छा. अर्थात, फक्त शुभेच्छा देऊन जसे आपण इतर दिवस साजरे करतो, तसं करण्याचा आजचा दिवस क्वचितच नाही. साधारपणे दहा हजार वर्षांपूर्वी माणूस शेती करायला लागला तिथपासूनचा आत्तापर्यंतचा ज्ञात इतिहास हा आधी मौखिक, मग लिखित स्वरूपात आढळतो. या संपूर्ण इतिहासाचं अवलोकन केलं, तर एक गोष्ट नक्की जाणवेल ती म्हणजे, आजपर्यंत कधीच नव्हतं इतकं भविष्यकाळाचं ओझं वर्तमानकाळावर आहे आणि हे पूर्णपणे मी पर्यावरण या परीप्रेक्षातून म्हणत आहे, हे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आलं असेल.

केशवसुतांनी १८९७ साली ‘मनोरंजन’ मासिकात ‘विश्वाचा विस्तार केवढा, ज्याच्या त्याच्या डोक्याएवढा’ असं एक निरीक्षण आपल्या स्फुटातून मांडलं होतं. आपल्या जाणिवेपेक्षा जगाची विराटता ही अफाट आहे, हे दर्शविण्यासाठी अनेक संतांनी ‘विश्व’ या तात्त्विक संकल्पनेचा उल्लेख केला. आजच्या जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने, तुम्हा-आम्हा सर्वांनाच, आपल्या विश्वाच्या ज्या काही कल्पना असतील, त्याचा विस्तार करून एकूणच ‘पृथ्वी‘ नावाचा जो एक ग्रह आहे, त्याचा सकल विचार करावा लागेल आणि असा विचार जर आपण करू शकलो, तर आणि तरच आपलं आणि पुढच्या पिढ्यांचं आयुष्य सुखकर होणार आहे.

‘डिजिटल क्रांती’ ही अशी एक क्रांती आहे, जिने जगातल्या प्रत्येक माणसाच्या आयुष्याला स्पर्श केला आणि त्याच ताकदीने पण अर्थात नकारात्मक पद्धतीने हवामान बदलाने जगातील प्रत्येक माणसाला वेढून टाकलं आहे. त्यामुळे हीच ती वेळ आहे की, जगातील प्रत्येक माणसाने जागं होण्याची. सात वर्षांपूर्वीच्या पॅरिस परिषदेत जगातील तापमान वाढ १.५ अंश सेल्सियसवर रोखण्याचा निर्धार करण्यात आला होता. ती परिषद ऐतिहासिक ठरली होती. ग्लासगो परिषदेमध्ये, मानवी हस्तक्षेपामुळे पृथ्वीचं तापमान १.१ अंश सेल्सियसने वाढलं असून ही जगासाठी धोक्याची घंटा आहे. सर्व राष्ट्रांनी २०३० पर्यंत कर्बउत्सर्जन कपातीच्या उद्दिष्टांचा पुनर्विचार करून त्यात वाढ करावी. अर्थात जगातील सगळ्या विकसनशील राष्ट्रांनी कर्बउत्सर्जन कपातीसाठी किती प्रयत्न केले हे जगाने पाहिलंच. त्याचाच परिणाम असा की, जगाचं तापमान १.५ अंश सेल्सियसने वाढण्याची शक्यता २०१९ ला ४३ टक्के होते, जी वाढून आता ६३ टक्के झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक बँकेच्या ’मेकिंग इट पर्सनल हाऊ बिहेविअरल चेंज कॅन टॅकल क्लायमेट चेंज’ या कार्यक्रमाला व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित करताना सांगितलं होतं की, “ग्रहासाठी स्वतंत्रपणे केलेली प्रत्येक चांगली कृती क्षुल्लक वाटू शकते. मात्र, जेव्हा जगभरातील अब्जावधी लोक सामूहिक कृती करतात, तेव्हा त्याचा परिणाम खूप मोठा असतो. आपल्या ग्रहासाठी योग्य निर्णय घेणार्‍या व्यक्ती आपल्या ग्रहाच्या लढाईत महत्त्वपूर्ण आहेत यावर आमचा विश्वास आहे आणि हाच ‘मिशन लाईफ‘चा गाभा आहे.“ याच कार्यक्रमात पंतप्रधान पुढे असेदेखील म्हणाले की, “हवामान बदलाचा सामना केवळ कॉन्फरन्स टेबलवरून लढता येणार नाही. प्रत्येक घरातील जेवणाच्या टेबलवरून तो लढावा लागणार आहे. जेव्हा एखादी कल्पना चर्चेच्या टेबलवरून जेवणाच्या टेबलवर जाते, तेव्हा ती एक लोकचळवळ बनते. आपल्या आवडीनिवडी ग्रहाला व्याप्ती आणि गती प्रदान करण्यास मदत करू शकतात, याची प्रत्येक कुटुंब आणि प्रत्येक व्यक्तीला जाणीव करून द्यायची आहे. ‘मिशन लाईफ’ हे हवामान बदलाविरूद्धच्या लढाईचे लोकशाहीकरण करण्याविषयीचे अभियान आहे. जेव्हा लोकांना जाणीव होईल की, दैनंदिन जीवनातील साध्या कृतीमध्ये किती ताकद आहे, तेव्हा त्याचा पर्यावरणावर खूप सकारात्मक परिणाम होईल.”

मोदीजींचं म्हणणं अतिशय तार्किक आहे. २०१४ ला पंतप्रधान झाल्यावर त्यांनी ज्या दोन मूलगामी कल्पना राबवल्या, त्या कल्पना म्हणजे हवामान बदलाच्या संकटाला तोंड देण्यासाठी त्यांनी त्यांच्या पद्धतीने शोधलेलं उत्तर होतं. पहिली कल्पना होती ती म्हणजे ’स्वच्छ भारत अभियान’ आणि दुसरी घरातील लाकडावर चालणार्‍या चुलीला पर्याय म्हणजे प्रत्येक घरात सिलिंडर पोहोचवणे. या दोन्ही मोहिमांची जगाने दखल घेतली आणि कार्बन उत्सर्जन कपातीत यांचा वाटा मोठा आहे, हे मान्य केले. हा झाला देशाच्या इतिहासातील सगळ्यात कार्यक्षम आणि लोकप्रिय पंतप्रधानाने उचललेलं पाऊल!

त्याच वेळेला कर्नाटकातल्या तुलसी गोविंद गौडा या आजी, ज्यांचं वय ८५च्या आसपास असेल, गेली ६५ वर्ष जंगलात जाऊन तिथल्या चांगल्या झाडांच्या फांद्या घेऊन ती दुसरीकडे लावत आहेत, जंगलं अबाधित राहतील हे बघत आहेत. या आजींना नुकताच मोदी सरकारने ‘पद्मश्री’ पुरस्कराने सन्मानित केले. आपल्या नगर जिल्ह्यातील राहीबाई पोपरे यांना ’बियाणं बाई’ म्हणून ओळखलं जातं, नष्ट होत चाललेली किंवा दुर्मीळ होत चाललेली बियाणं त्या शोधतात, राखतात आणि ती शेतकर्‍यांना वाटून, शेतकर्‍यांनी पारंपरिक पिकांकडे वळावं म्हणून प्रयत्न करत आहेत. थोडक्यात काय तर, आज भारतात अनेक पातळ्यांवर हवामान बदलाशी लढण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि याच वेळेला महाराष्ट्रात २०१४ ते २०१९ या काळात वनमंत्री असताना मी ३३ कोटी वृक्ष लावण्याचा निर्धार केला आणि तो निर्धार सत्यात उतरवण्यासाठी माझ्या विभागाने अविश्रांत मेहनतदेखील केली.

हवामान बदलाच्या संकटाशी जर सामना करायचा असेल, तर जंगल क्षेत्र अबाधित राहिलं पाहिजे आणि त्याच वेळेस एकूणच झाडांचं आच्छादन वाढलं पाहिजे, याविषयी कोणाचंच दुमत असू शकत नाही आणि याच विचारातून बहुदा देशाच्या इतिहासातील सगळ्यात मोठी वृक्ष लागवड मोहीम आम्ही हाती घेतली होती. याच काळात मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा ‘आयआयटी मुंबई‘कडून आम्ही सविस्तर अभ्यास करून घेतला आणि त्यांच्याकडून एक अहवालदेखील करून घेतला. या अहवालात जे नमूद केलं आहे ते मुंबईकरांपर्यंत तर पोहोचलं पाहिजेच. पण, ते महाराष्ट्रातील जनतेलादेखील कळले पाहिजे.

sudhir mungantiwar

मुंबईच्या संजय गांधी नॅशनल पार्कचं मूल्य आहे १५ लाख, १२ हजार, ३८८ कोटी रुपये. थोडक्यात, या राष्ट्रीय उद्यानातील नितळ पाण्याचे जे झरे आहेत, इथली जैविविधता आहे, यातून मुंबई, ठाणे आणि परिसराला मिळणारा शुद्ध हवेचा पुरवठा आहे किंवा यामुळे लोकांना मिळणारा ताजेतवानेपणा आणि मनःशांती असेल. इतकं सगळं जर उभं करायचं असेल १५ लाख, १२ हजार, ३८८ कोटी रुपयांची गरज लागेल, तर इतकं सगळं पुन्हा दुसर्‍या एखाद्या राष्ट्रीय उद्यानात उभं करता येईल. थोडक्यात, निसर्गाने आपल्याला दिलेलं हे मुक्त दान आहे. आज हॉलिवूडमधला प्रख्यात अभिनेता लिआनार्डो दि कॅप्रिओ हा मोठ्या प्रमाणावर जंगलं विकत घेऊन त्याचं संरक्षण करत आहे. कारण काय तर जर जंगलं टिकलीच नाहीत, तर आपल्या सगळ्यांच्या आयुष्याची अशी काही परवड होईल की, त्यापुढे कोणीही कमावलेलं सगळं ऐश्वर्य फिकं पडेल!

‘वन‘ या शब्दाची अगदीच तांत्रिक व्याख्या करायची झाली, तर त्यात शहरातील उद्यानं, वनस्पती उद्यानंदेखील येतात, हे मला आवर्जून सांगायचं आहे. कारण, तुम्ही अगदी हॉलिवूड अभिनेत्यासारखं जंगल विकत घेऊन राखू शकत नसलात, तरी तुमच्या आसपासची उद्यानं, वनस्पती उद्यानं ही नीट राखली जात आहेत का नाहीत, हे तर निश्चित बघू शकता. महापालिकेला आग्रह करून उद्यानांच्या आणि वनस्पती उद्यानांना शहराच्या विकास आराखड्यात जागा मिळेल हे पाहू शकता. हे करताना एक राजकीय पदाधिकारी म्हणून, मी किंवा माझ्या पक्षातील सहकारी आमच्या जबाबदारीपासून दूर जातोय, असं अजिबात नाही. पण, मुळात विषयच इतका गंभीर आहे की, मोदी त्यांच्या भाषणात म्हणाले तसं प्रत्येकाचा हातभार लागल्याशिवाय हे संकट परतवणं केवळ अशक्य आहे.

महाराष्ट्रात कुठेही तुम्हाला वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमण होताना दिसलं, तर बिनदिक्तपणे माझ्या खात्याशी संपर्क साधा आणि याशिवाय पर्यावरणाच्या म्हणजेच जंगल किंवा वृक्ष लागवड यासाठी काहीही कल्पना अथवा सहकार्य हवं असेल, तर त्यासाठी शासन कटिबद्ध आहे. मध्यंतरी मुख्यमंत्री महोदयांनी एक आवाहन केलं होतं की, प्रत्येकाने फक्त एक मिनिट सार्वजनिक स्वच्छतेसाठी आणि एक मिनिट पर्यावरण रक्षणासाठी दिलं, तर सध्याचं चित्र बदलायला वेळ लागणार नाही. तुम्ही फक्त एक मिनिट द्या, माझ्या वन विभागासह संपूर्ण शासन हे २४ तास या कार्याच्या दिमतीला आहेच. मुंबईसारख्या शहरांमध्ये वृक्षसंगोपन व संवर्धनासाठी वस्तीवार स्थानिकांच्या हरित समित्या तयार करता येतील का, याचाही विचार शहरे व महानगरातील नागरिकांनी करायला हवाय.

अजूनही वेळ गेलेली नाही. जर पृथ्वीचं तापमान १.५ अंशाने वाढण्याचा धोका खरंच वास्तवात आला, तर दरवर्षी वाढत जाणारा असह्य उन्हाळा आणि दाणादाण उडवणारा अवकाळी पावसाळा हा अजून भीषण होईल आणि असं झालं तर पुढच्या पिढ्या आपल्याला कधीच माफ करणार नाहीत. त्यासाठी प्रत्येकाने फक्त आपली प्रत्येक कृती पर्यावरणपूरक आहे का नाही, हा प्रश्न जरी स्वतःला विचारला तरी बदल दूर नाही.

पुन्हा एकदा जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा. वंदे मातरम्!

सुधीर मुनगंटीवार
(लेखक भाजपचे ज्येष्ठ नेते असून महाराष्ट्राचे विद्यमान वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसायमंत्री आहेत.)

अग्रलेख
जरुर वाचा
अजमेरमध्ये २३ वर्षांपूर्वी भारतात अवैधपणे घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

अजमेरमध्ये २३ वर्षांपूर्वी भारतात अवैधपणे घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Bangladeshi राजस्थानातील अजमेर पोलिसांनी २३ वर्षांपूर्वी भारतात घुसखोरी केलेल्या बांगलादेशी घुसखोरी व्यक्तीच्या मुसक्या आवळल्या आहेत. व्हिसाशिवाय अवैधपणे बांगलादेशी व्यक्तीने भारतात घुसखोरी केली आणि त्याला तब्बल २३ वर्षानंतर ताब्यात घेण्यात आले आहे. संबंधित अवैधपणे घुसखोरी करणाऱ्याचे नाव हे मोहम्मद शाहिद असून त्याचे वय वर्षे हे ४० आहे. तो अजमेरमधील अंदर कोट परिसरात अवैधपणे वास्तव्य करत होता. एटीएएफने एकूण अकरा कारवायांमध्ये एकूण २१ घुसखोरांना पकडले आहे. दरम्यान, आता दर्गा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121