सोलापुर : महाराष्ट्रातील सोलापूर शहरात बकरी ईद निमित्ताने समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला आहे. दि. २९ जून रोजी सोलापुरातील ईदगाह मैदानावर 'लव्ह पाकिस्तान' लिहिलेले आणि पाकिस्तानचे चिन्ह असलेले फुगे विकल्याची बातमी समोर आली आहे. या प्रकरणात फुगे विक्री करणाऱ्याला ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. या संदर्भात विजापूर नाका पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी अधिकचा तपास करत आहेत.
या प्रकरणात 'लव्ह पाकिस्तान' लिहिलेले फुगे विकत असल्या कारणाने विक्रेत्याला ताब्यात घेण्यात आले आहे. सोलापुरातील शाही आलमगीर इदगाह मैदानाजवळ हे फुगे विकले जात होते.दरम्यान 'लव्ह पाकिस्तान' लिहिलेल्या फुग्यांसोबतच पाकिस्तानचे झेंडेही विकल्याचे ही वृत्तसंस्थाकडून सांगितले जात आहे. अजय पवार असे फुगे विकणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. तो विजापूर रोडच्या पारधी बस्ती येथील रहिवासी आहे. त्याला ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे. तसेच संबंधित व्यक्तीने फुगे कोठून आणले याची माहिती घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.