डीआरडीओने घेतली अग्नि – १ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
02-Jun-2023
Total Views | 58
नवी दिल्ली : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) अब्दुल कलाम बेटावरून पृष्ठभागावरून जमिनीवर मारा करणारी आणि आण्विक क्षमता असलेल्या अग्नि १ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. सॉलिड इंजिनवर आधारित क्षेपणास्त्राची मारक क्षमता ९०० किमीपर्यंत आहे. ओडिशाच्या किनार्याजवळील बंगालच्या उपसागरातील अब्दुल कलाम बेटावर मोबाईल लाँचरमधून हे क्षेपणास्त्र डागण्यात आले. चाचणीच्या संपूर्ण मार्गावर अत्याधुनिक रडार आणि इलेक्ट्रो-ऑप्टिक सिस्टीमद्वारे देखरेख करण्यात आली होती.
डीआरडीओच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चाचणीचे सर्व मानक यावेळी पूर्ण झाले आहेत. अग्नी १ हे भारतीय सशस्त्र दलाचे पहिले आणि एकमेव सॉलिड इंजिन आधारित क्षेपणास्त्र आहे. स्वदेशी बनावटीचे १५ मीटर लांब आणि १२ टन वजनाचे क्षेपणास्त्र १ हजार किलो वजनाचे अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम आहे.
दरम्यान, यापूर्वी कमी पल्ल्याच्या आण्विक सक्षम बॅलिस्टिक क्षेपणास्त्र एसआरबीएम अग्नि-१ ते अग्नी-५ क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. त्यांची मारक क्षमता ७५० किमी ते ३५०० किमी पर्यंत आहे. त्याचप्रमाणे अग्नी-५ क्षेपणास्त्राचीही गेल्या वर्षी यशस्वी चाचणी घेण्यात आली होती, ज्याचा पल्ला पाच हजार किलोमीटर आहे.