राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर तथा प. पू. श्रीगुरूजी यांच्या निधनास नुकतीच 50 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने त्यांचे हे पुण्यस्मरण...
श्री गुरूजींचा जन्म नागपूर येथे दि. 19 फेबु्रवारी, 1906 रोजी झाला. त्यांचे वडील हे ‘भाऊजी’ तर आई लक्ष्मीबाई ‘ताई’ या नावाने परिचित होते. भाऊजी हे हाडाचे शिक्षक, तर ताई या शिकलेल्या व सुसंस्कृत गृहिणी होत्या. इयत्ता चौथीच्या परीक्षेत बाल माधव नर्मदा विभागात पहिला आला होता. त्यानंतर त्याने आपल्या शैक्षणिक जीवनात पहिला वर्ग कधीही सोडला नाही. नवव्या वर्षी त्याचा व्रतबंध झाला. त्या दिवसापासून त्याची नित्य संध्या व सूर्यनमस्कार यात कधीही खंड पडला नाही.चंद्रपूरच्या ज्युबिली हायस्कूलमधून ते मॅट्रिकची परीक्षा उत्तमरित्या उत्तीर्ण झाले. आपल्या शालेय जीवनात त्यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी व संस्कृत या भाषांत अतिशय प्रावीण्य मिळवले. शालेय जीवनात त्यांनी अनेक वक्तृत्व स्पर्धांत पारितोषिके मिळविली. त्यांची स्मरणशक्ती अतिशय तीव्र तरल होती. ते एकपाठी होते. प्रथमपासूनच त्यांना वाचनाची आवड होती. या सर्व गुणांचे प्रत्यंतर पुढे संघकार्यात असताना विविध भाषणे व बैठका यातून येत राहिले.
मॅट्रिकनंतर श्रीगुरूजींनी हिस्लोप महाविद्यालयातून इंटर-सायन्सचे शिक्षण पूर्ण केले. ‘प्राणिशास्त्र’ हा त्यांच्या अभ्यासाचा मुख्य विषय असला तरी त्यांनी सुवर्णपदक मात्र ‘इंग्रजी’ या विषयात मिळविले. पुढे बनारस हिंदू विद्यापीठातून त्यांनी ‘बीएस्सी’ (1926) व ‘एमएस्सी’ (1928) या पदव्या विशेष प्रावीण्यासह मिळविल्या. आपल्या दीड तपाच्या शिक्षण साधनेत त्यांनी अनेक पदके, पारितोषिके विविध स्पर्धांतून मिळविली. अनेक शिष्यवृत्त्या मिळविल्या व आपली गुणवत्ता सिद्ध केली.पुढे ‘प्राणिशास्त्र’ या विषयातील प्रगत संशोधनासाठी त्यांनी मद्रास (आताचे चेन्नई) येथील मत्स्यालयांत प्रवेश मिळवला. परंतु, दोन वर्षांनंतर आर्थिक कारणासाठी त्यांना ते संशोधन अर्धवट सोडावे लागले. अर्थार्जनाची आवश्यकता लक्षात घेऊन त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठात ‘प्राणिशास्त्र’ विभागात प्राध्यापकाची नोकरी पत्करली. ‘प्राणिशास्त्र’ हा जरी त्यांच्या अध्यापनाचा मुख्य विषय असला, तरी ते ‘बी.ए’च्या वर्गाला इंग्रजी व राज्यशास्त्र हे विषयही तन्मयतेने शिकवित. ‘एक विद्यार्थीप्रिय प्राध्यापक’ म्हणून त्यांचा लौकिक होता. याच काळात विद्यार्थ्यांनी त्यांना ‘गुरूजी’ ही उपाधी प्रदान केली. ते नामाभिधान पुढे अवघ्या हिंदू समाजाचे व राष्ट्राचे गुरू झालेल्या गोळवलकरांना चिकटले ते कायमचेच! पुढे नागपूरला परतल्यावर त्यांनी वकिलीचे शिक्षण पूर्ण केले व काही काळ ते ‘गोळवलकर वकील’ही झाले.
श्रीगुरूजींच्या अध्ययन-अध्यापन कार्यकाळात त्यांचे जे बहुआयामी व्यक्तिमत्त्व विकसित झाले, त्याचे स्वरुप थक्क करून टाकणारे आहे. ते अभ्यासक्रमाच्या चौकटीत कधीच बसले नाहीत. त्यांचे वाचन चौफेर व विस्तृत होते. शास्त्रीय विषयापासून ललितकला व धर्मशास्त्रापासून पाककलेपर्यंत प्रत्येक विषयाचे त्यांना अफाट कुतूहल होते. त्यामुळे वाचनाच्या माध्यमातून त्यांची ज्ञानसाधना अखंड सुरू होती. परिस्थितीमुळे पात्रता असूनही त्यांना वैद्यकीय शिक्षण घेता आले नाही. परंतु, त्यांनी अॅलोपॅथी, होमियोपॅथी, आयुर्वेद, निसर्गोपचारया वैद्यकीय शाखांचा सखोल अभ्यास केला. भूगोल, खगोल, ज्योतिर्विद्या यांच्यात त्यांना रस होता. स्थापत्यशास्त्र, युद्धशास्त्र, गूढविद्या यांचाही त्यांचा दांडगा व्यासंग होता. साहित्य, संगीत, नाटक, चित्रकला, क्रीडा, व्यायाम अशा अनेक विषयांचे ते जाणकार होते. वेद, उपनिषदे, गीता, शास्त्रे पुराणे, स्मृती व इतिहास यांचाही अभ्यास त्यांनी केला होता. अनेक देशी व विदेशी दार्शनिकांचे ग्रंथ त्यांनी वाचले होते. बायबल व कुराणांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला होता. या सर्व ज्ञानसंपादनाचे संदर्भ त्यांच्या भाषणांतून व बैठकांतून सतत दिले जात असत. उपनिषदे व बायबल यांचा त्यांनी तौलनिक अभ्यास केला होता. म्हणूनच एका बैठकीत ते म्हणाले, “उपनिषदांचा अभ्यास असला, तरच बायबलमधील काही विसंगत वाटणार्या संकल्पनांची संगती लावता येते, अन्यथा केवळ पाश्चात्य विचारसरणीच्या आधारे ती लावता येत नाही, हे निश्चित!”
श्रीगुरूजींनी पं. सावळाराम यांच्याकडून बासरी वादनाचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले होते. ते सतारही उत्तम वाजवीत. त्यांना गायनाचे उत्तम अंग होते. नागपुरातील रामकृष्ण मठाचे प्रमुख अमिताभ महाराज यांना गुरूजींच्या गायन कलेविषयी अपार कौतुक होते. ते हॉकी, टेनिस, मल्लखांब या क्रीडाप्रकारात तरबेज होते. पाकशास्त्रातही ते पारंगत होते. पुरणपोळीसारखा सुगरणीलाही आव्हान वाटणारा पदार्थ ते उत्तम बनवित.इतक्या परस्परविरोधी ज्ञानशाखांत व विषयांत एवढी पारंगतता श्रीगुरूजींनी कशी मिळवली असेल? तर जीवनाकडे समग्रपणे पाहण्याची त्यांची दृष्टी, सर्व ज्ञानशाखांबद्दलचे प्रचंड कुतूहल, संशोधनात्मक वृत्ती व चौफेर वाचन हे त्याचे उत्तर आहे. कोणत्याही विषयाचा शेवटपर्यंत पाठपुरावा करावा, अशी त्यांची भूमिका होती. या ग्रंथालयातील प्रत्येक विषयाचे महत्त्वाचे असे प्रत्येक पुस्तके श्रीगुरूजींनी आपल्या अध्ययन-अध्यापन काळात वाचलेले होते, अशी नोंद बनारस हिंदू विद्यापीठाच्या तत्कालीन ग्रंथपालाने आपल्या आठवणीत करून ठेवली आहे. त्यांच्या या व्यासंगाचे प्रत्यंतर अनेक विद्वान व पंडितांबरोबर त्यांच्या ज्या चर्चा झाल्या, त्यात येत असे. यासंदर्भात त्यांची तुलना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या बहुआयामी व उग्र ज्ञानसाधनेशी व त्यासाठी केलेल्या अफाट वाचनाशीच होऊ शकते. वयाच्या तिशीपर्यंतच दोघांनी आपल्या जीवनाचा भरभक्कम बौद्धिक वैचारिक पाया घातलेला दिसतो.
श्रीगुरूजींची खरी व परिपूर्ण ओळख होण्यासाठी आजच्या युवापिढीला त्यांच्या जीवनाचे विविध पैलू माहीत असणे आवश्यक आहे. विज्ञानाच्या अभ्यासातून त्यांची प्रखर विज्ञाननिष्ठा सिद्ध झाली होती. संशोधनवृत्तीतून त्यांची प्रयोगशीलता, तार्किकता विकसित झाली होती. विविध ज्ञानशाखांच्या अभ्यासातून त्यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी झाले होते. प्राचीन वाङ्मय व तत्वज्ञान यांच्या चिंतनामुळे विज्ञानापलीकडे असणार्या अध्यात्माची ओढ त्यांच्या मनात निर्माण झाली होती. कला व क्रीडा यांच्या आवडीतून व अभ्यासातून त्यांचे व्यक्तिमत्त्व चतुरस्र झाले होते. त्यांनी विविध भाषांवर प्रभुत्त्व मिळवल्यामुळे त्यांच्याजवळ विलक्षण वादकौशल्य होते. म्हणूनच त्यांच्या कर्तृत्त्वाची व नेतृत्त्वगुणांची चर्चा व चिकित्सा करताना, ज्या विविधांगी ज्ञानसाधनेच्या पायावर त्यांचे जीवनशिल्प उभे आहे, त्यांचे यथायोग्य आकलन आजच्या तरूण पिढीने करून घेणे आवश्यक आहे. वर्तमानकाळी जीवनाच्या विविध क्षेत्रांत नेतृत्त्वाचे जे खुजेपण अनुभवता येते, ते पाहिल्यानंतर तर या आकलनाची अपरिहार्यता ठळकपणे अधोरेखित होते.
श्रीगुरूजींच्या जीवनातील एका द्वंद्वाचा उल्लेख केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. त्यांच्या जीवनाला अध्यात्माची बैठक होती. वेळ मिळेल तेव्हा ध्यानधारणा, वाचन-चिंतन-मनन यात ते रमलेले असत. बनारस हिंदू विद्यापीठात असताना त्यांनी रामकृष्ण व विवेकानंद यांचे समग्र वाङ्मय वाचले होते. त्याचा खोल ठसा त्यांच्या जीवनावर उमटलेला दिसतो. त्यांची अध्यात्माची ओढ अधिक घट्ट झाली ती या ग्रंथांमुळे. त्यातूनच हिमालयात जाऊन तपश्चचर्या करावी, असा विचार त्यांच्या मनात घोळू लागला. 1931 साली नागपुरातील रामकृष्ण मठाशी त्यांचा संबंध आला, त्याचे प्रमुख अमिताभ महाराज यांच्याशी त्यांचा संपर्क वाढला. त्यांच्याशी त्यांची विविध विषयांवर सखोल चर्चा होत असे. हा सिलसिला 1936 सालापर्यंत अखंडपणे सुरू होत.दुसर्या बाजूने बनारस येथे असतानाच श्रीगुरूजींचा रा. स्व. संघाशी संबंध आला. संघ संस्थापक डॉ. हेडगेवार यांनी संघसंपर्कात आलेल्या अनेक युवकांना शिक्षण व संघकार्यासाठी देशाच्या विविध भागांत पाठविले होते. त्या योजनेतून भय्याजी दाणी हे बनारस हिंदू विश्वविद्यापीठात शिक्षण व संघकार्य यासाठी दाखल झाले होते. तेथेच त्यांचा श्रीगुरूजींशी दाट परिचय झाला व त्यांच्या माध्यमातून ते संघाकडे आकर्षित झाले (1931). एवढेच नव्हे, तर बनारसमध्ये प्राध्यापक असताना तेथील संघचालक म्हणूनही त्यांनी दायित्व सांभाळले. पुढे ते नागपुरात परतले. तेव्हा डॉ. हेडगेवार यांनी प्रयत्नपूर्वक त्यांच्याशी संपर्क वाढविला व मोठ्या विश्वासाने संघाच्या विविध जबाबदार्या त्यांच्यावर सोपविल्या.
एकीकडे रामकृष्ण मठ, दुसरीकडे रा. स्व. संघ अशा दोन्ही संस्थांत ते सारखाच रस घेत होते. रामकृष्ण मठाचे संस्थापक स्वामी विवेकानंद यांनी समाजाला युगधर्म सांगितला, तर हा युगधर्म प्रत्यक्ष व्यवहारात आणण्यासाठी संघमंत्र व शाखातंत्र असा दुहेरी मार्ग डॉ. हेडगेवार यांनी सांगितला. या दोन्ही विचारांचा अपूर्व मिलाफ गुरूजींच्या जीवनात झालेला दिसतो. मात्र, यामुळे पुढील काळात त्यांना एका द्वंद्वाला सामोरे जावे लागले. संघमार्ग की संन्यासमार्ग, असे त्या द्वंद्वाचे मानसिक स्वरुप होते. या द्वंद्वाने झपाटलेले असतानाच 1936 साली ते कोलकातामार्गे सारगाछी येथील रामकृष्ण मठात विवेकानंदांचे गुरूबंधू असलेल्या स्वामी अखंडानंद यांच्याकडे अचानकपणे निघून गेले. त्यांनी अखंडानंदांचे शिष्यत्व पत्करले व सात-आठ महिने त्यांची मनोभावे सेवा-श्रुषा केली. पुढे दि. 13 जानेवारी, 1937 रोजी त्यांनी गुरूजींवर अनुग्रह करून त्यांना शक्तिपात योगाद्वारे आपल्यातील दैवी शक्ती प्रदान केली. याच काळात गुरूजींनी हिमालयात जाऊन तपश्चर्या करण्याची आपली इच्छा स्वामीजींजवळ बोलून दाखवली. त्या विषयावर त्यांच्याशी त्यांनी सविस्तर चर्चाही केली. मात्र, स्वामीजींनी त्यांना या निश्चयापासून परावृत्त केले. त्यावर स्वामीजी म्हणाले, “स्वामी विवेकानंदांना अभिप्रेत असणार्या दरिद्री नारायणाची सेवा करण्यासाठी तुझा जन्म झाला आहे. ते कार्य तुझी वाट पाहत आहे.” हे म्हणत असताना स्वामीजींच्या डोळ्यासमोर रा. स्व. संघाचे कार्यच उभे होते. शक्तिपात समारंभानंतर काही दिवसांतच स्वामीजींचे दुःखद निधन झाले व श्रीगुरूजींना नागपुरात परतावे लागले. अशाप्रकारे एका चमत्कारिक द्वंद्वाचा भावात्मक व राष्ट्रकेंद्री शेवट झाला. ते नागपुरात परतल्यानंतर त्यांनी डॉ. हेडगेवारांच्या चरणी आपले जीवन समर्पित केले. संन्यासमार्गाचा मोह सोडून श्रीगुरूजी समाजाच्या व राष्ट्राच्या सेवेत समर्पण भावनेने कसे जोडले गेले, त्याची पूर्वपीठिका ही अशी मनोज्ञ आहे. (क्रमश:)
-प्रा. श्याम अत्रे