आषाढ शुक्ल द्वितीयेला जगन्नाथ पुरी येथे पूर्णपरात्पर भगवान श्रीजगन्नाथजींची रथयात्रा सुरू होते. ही रथयात्रा पुरीचा मुख्य उत्सव आहे. त्यानिमित्ताने ही रथयात्रा आणि नागपूरचे मराठा राजे श्रीमंत रघुजी महाराज भोसले यांचे योगदान उलगडणारा हा लेख....
रथारूढो गच्छन् पथि मिलित भूदेव पटलै
स्तुति प्रादुर्भावम्प्रतिपदमुपाकर्ण्य सदयः।
दया सिन्धुर्बन्धुः सकल जगतां सिन्धु सुतया
जगन्नाथः स्वामी नयनपथगामी भवतु मे॥
ओडिशा राज्याचा पुरी प्रदेश, ज्याला ‘पुरुषोत्तम पुरी’, ‘शंख क्षेत्र’, ‘श्रीक्षेत्र‘ असेही म्हणतात. ही भगवान श्रीजगन्नाथ महाप्रभू यांची मुख्य लीला-भूमी आहे. श्री जगन्नाथजी हे उत्कल प्रदेशाचे प्रमुख दैवत मानले जातात. श्रीजगन्नाथ हे स्वतः राधा आणि श्रीकृष्ण यांचे युगल प्रतीक आहेत, अशी येथील वैष्णवांची श्रद्धा. श्रीजगन्नाथजी हे परात्पर भगवान आहेत आणि श्रीकृष्ण हे त्यांच्या कलेचे एक रूप आहे. आषाढ शुक्ल द्वितीयेला जगन्नाथपुरी येथे पूर्णपरात्पर भगवान श्रीजगन्नाथजींची रथयात्रा सुरू होते. ही रथयात्रा पुरीचा मुख्य उत्सव आहे. हजारो, लाखोंच्या संख्येने लहान मुले, वृद्ध पुरूष, तरुण, स्त्रिया देशाच्या नव्हे, तर विदेशातूनही महाप्रभूंच्या दर्शनार्थ पुरीला येतात. ऐरवी केवळ हिंदूंनाच प्रवेश असल्याने इतर धर्मीय बांधवदेखील महाप्रभूंच्या दर्शनाला रथयात्रा उत्सवात दाखल होतात. उत्तर भारतात भक्ती चळवळ प्रारंभ होण्यापूर्वी शतकानुशतके मध्ययुगीन ओडिशातील सकल हिंदू धर्मीयांना एकत्रित करणारी जगन्नाथाची रथयात्रा हिंदू धर्माच्या एकात्म भावनेचे प्रतिनिधित्व करते.रथयात्रा ज्याला ‘नवदिन यात्रा’, ‘दशावतार यात्रा‘ आणि ‘गुंडीचा यात्रा’ असेही म्हणतात, ती आषाढ मासातील शुक्ल पक्षाच्या द्वितीयेला प्रारंभ होते. या मुख्य यात्रेच्याआधी देखील अनेक विधी मंदिरात संपन्न होतात,
असे म्हटले जाते की, राजा इंद्रद्युम्न जो आपल्या कुटुंबासह निलांचल सागर (ओडिशा) जवळ राहत होता, त्याला समुद्रात एक महाकाय वृक्ष दिसला. राजाने त्याच्याकडून विष्णूमूर्ती मिळवण्याचा निर्णय घेताच विश्वकर्मा स्वतः वृद्ध सुताराच्या रूपात प्रकट झाला. मूर्ती बनवताना त्यांनी अट घातली की, मूर्ती पूर्ण होईपर्यंत मी मूर्ती बनवणार असलेल्या घरात कोणीही येऊ नये. राजाने ते मान्य केले. आज ज्या ठिकाणी श्रीजगन्नाथ मंदिर आहे, त्या ठिकाणी त्यांनी घरामध्ये मूर्ती बनवण्यास सुरुवात केली. म्हातारा सुतार कोण होता, हे राजाच्या घरच्यांना माहीत नव्हते. बरेच दिवस घराचे दार बंद असताना सुतार न खाता-पिता जीवंत कसा काय राहू शकतो, हे बघण्यासाठी महाराणीने दार उघडले आणि घात झाला. अट मोडली गेल्याने सुतार कुठेच आढळला नाही. परंतु, श्रीजगन्नाथ, सुभद्रा आणि बलराम यांच्या अर्धवट लाकडी मूर्ती मात्र सापडल्या. राजा-राणी उदास झाले. पण, त्याच क्षणी दोघांनाही आकाशवाणी ऐकू आली, ’‘व्यर्थ दु:खी होऊ नकोस, आम्हाला या रूपात जगायचे आहे.” मूर्ती द्रव्याने शुद्ध करून प्रतिष्ठापना करायची आहे. पुढे त्याच त्रिकुट काष्ठ प्रतिमा जगन्नाथ मंदिरात स्थापन करण्यात आल्या. माता सुभद्रेची नगर प्रदक्षिणा इच्छा पूर्ण करण्याच्या उद्देशाने श्रीकृष्ण आणि बलराम यांनी वेगवेगळ्या रथात बसून रथयात्रा काढली. या रथयात्रेच्या काळात भगवान कृष्ण, भगवान बलभद्र आणि सुभद्रा यांच्या मूर्ती जगन्नाथ मंदिरातून गुंडीचा मंदिरापर्यंत नेल्या जातात. मिरवणुकीपूर्वी, पुजारी स्नान पौर्णिमा विधी करतात, ज्यामध्ये तीन मूर्ती सुवर्ण कुंडातील प्रत्येकी १०८ घडे पाणी काढून काष्ठ प्रतिमांचे स्नान संपन्न होते. ‘ब्रह्म पुराण’, ‘पद्म पुराण’, ‘स्कंद पुराण’ आणि ‘कपिला संहिता‘ या पवित्र हिंदू ग्रंथांमध्ये रथयात्रेचे महत्त्व विशद केले आहे .
देवता विग्रहांना (उत्सव मूर्ती नव्हे!) प्रत्यक्ष मंदिराबाहेर काढून रथारूढ स्वरूपात काढण्याची ही परंपरा संपूर्ण जगात केवळ जगन्नाथ पुरी येथेच आहे. भगवान जगन्नाथाचा रथ ‘नंदीघोष रथ’ म्हणून ओळखला जातो. याला ‘गरुडध्वज‘ आणि ‘कपिध्वज’ असेही म्हणतात. आपण भगवान जगन्नाथाचा रथ त्याच्या रंगावरून ओळखू शकतो. जगन्नाथाच्या रथाला पिवळ्या आणि लाल रंगाचे आच्छादन असून, तो रथांमध्येही सर्वांत मोठा आहे. रथाला चार घोडे असून, घोड्यांचा रंग पांढरा आहे. रथाची उंची ४५ फूट असून, त्याला १६ चाके आहेत. हे सुदर्शन चक्र चिन्ह देखील ठळकपणे प्रदर्शित करते. रथाची पालक देवता ‘गरुड’ आहे आणि सारथी ‘दारुका’ म्हणून ओळखले जाते. रथावरील ध्वज ‘त्रैलोक्यमोहिनी‘ म्हणून ओळखला जातो. रथ ओढण्यासाठी जी दोरी वापरली जाते, त्याला ‘शंखचूडा’ म्हणतात. भगवान जगन्नाथासोबतच रथामध्ये वराह, गोवर्धन, कृष्ण, नृसिंह, राम, नारायण, त्रिविक्रम, हनुमान आणि रुद्र यांच्याही मूर्ती स्थापित असतात. रथाच्या मुखाला ‘नंदी मुख‘ आणि शस्त्रांना ‘शंख’ व ‘चक्र’ नामाभिधान आहे.
भगवान बलभद्राचा रथ ‘तालध्वज’ म्हणून ओळखला जातो. बलभद्राच्या रथाला हिरव्या आणि लाल रंगाचे आच्छादन असून, तो रथांपैकी दुसरा सर्वात मोठा आहे. रथाला घोडे असून, घोड्यांचा रंग काळा आहे. रथाची उंची ४४ फूट असून, त्याला १४ चाके आहेत. रथाचे पालक देवता ‘वासुदेव’ असून, सारथी ‘माताली’ म्हणून ओळखले जाते. रथाचे द्वारपाल ‘नंदा’ आणि ‘सुनंदा’ आहेत. रथावरील ध्वज ‘उन्नानी’ म्हणून ओळखला जातो. रथ ओढण्यासाठी वापरण्यात येणारी दोरी ‘वासुकी’ म्हणून ओळखली जाते. बलभद्रासोबतच रथात गणेश, कार्तिकेय, सर्वमंगला, प्रलंबरी, हलायुधा, मृत्युंजय, नटमवर, मुक्तेश्वर आणि शेषदेवाच्या मूर्ती आहेत. रथाचे मुख ‘केतुभद्रा’ म्हणून ओळखले जाते आणि शस्त्रे ‘हल’ आणि ‘मुसळ’ आहेत.देवी सुभद्रेचा रथ ‘देवदलन’ म्हणून ओळखला जातो. याला ‘दर्पदलन’ आणि ‘पद्मध्वज’ असेही म्हणतात. रथाला काळ्या आणि लाल रंगाचे आच्छादन असून, तो रथांमध्येही सर्वात लहान आहे. रथाला चार घोडे असून, घोड्यांचा रंग लाल आहे. रथाची उंची ४३ फूट असून, त्याला १२ चाके आहेत. रथाची संरक्षक देवता ‘जयदुर्गा’ आहे आणि सारथी ‘अर्जुन’ आहे. रथावरील ध्वज ‘नादंबिका’ आणि रथ ओढण्यासाठी वापरण्यात येणारी दोरी ‘स्वर्णचूडा’ म्हणून ओळखली जाते. सुभद्रेसोबतच रथामध्ये चंडी, चामुंडा, उग्रतारा, वनदुर्गा, शुलीदुर्गा, वाराही, श्यामा काली, मंगला आणि बिमला यांच्या मूर्ती आहेत. रथाचे मुख ‘भक्तिसुमेध’ आणि शस्त्रे ‘पद्म‘ आणि ‘कल्हार’ म्हणून ओळखले जातात.
पौराणिक आणि प्राचीन परंपरा असलेल्या श्रीजगन्नाथ क्षेत्राचे धार्मिक आणि अध्यात्मिक महत्त्व ओळखून अनेक जुलमी मुघल आक्रमकांनी या मंदिराला अनेकदा लुटले. कलींग आणि ब्रिटिश नोंदीनुसार सुमारे १८ वेळा या पुरी मंदिराची लूट करण्यात आली. १६९२ मध्ये मुघल सम्राट औरंगजेबने भगवान जगन्नाथाचे मंदिर नष्ट करण्याचे फर्मान जारी केले होते. त्यावेळी दिव्यसिंह देवा हा खुर्दाचा राजा होता. ओडिशाच्या नवाबाने आपला भाऊ मस्तराम खान याच्या मदतीने मंदिरावर आक्रमण केले. नवाब मंदिरात शिरला आणि जगन्नाथाच्या सुवर्ण सिंहासनावर चढला. मंदिराचा खजिना लुटला गेला. अज्ञात ठिकाणी लपलेल्या आक्रमणकर्त्याचा सामना करण्यास पुरीचा राजा असमर्थ ठरला. श्रीमंदिराच्या परिसरात बिमला मंदिराच्या मागे भगवान जगन्नाथ मूर्ती लपवून ठेवण्यात आल्या. ब्रह्मगिरी येथे असलेल्या गडकोकल येथे एकामागून एक हे त्रिकूट हलवण्यात आले. सततचे आक्रमण आणि मूर्ती विध्वंसाचे भय या कारणामुळे पुजार्यांनी मूर्तींना बानपूरमधील हरिश्वर, खलीकोटमधील चिकिली, कोडाळातील रुमागढ, गंजममधील अथागडा आणि शेवटी गंजम जिल्ह्यातील मारदा येथे स्थलांतरित केले. इसवी सन १७३३ ते १७३६ या काळात मारदा गावी महाप्रभू जगन्नाथ, बंधू बलराम आणि देवी सुभद्रा यांचे काष्ठ विग्रह स्थापित होते. या काळात मारदा गावीच रथयात्रा उत्सव संपन्न होत असे.
ओडिशामधील हिंदूंच्या जगन्नाथ पुरी या पवित्र महाक्षेत्राची दुरवस्था नागपूरकर भोसल्यांच्या कानी पडली आणि त्रिचनापल्ली आणि कर्नाटकातील यशस्वी मोहिमेनंतर मराठा साम्राज्याने बंगालमधील मोहिमा हाती घेतल्या. या मोहिमेचे प्रमुख होते, नागपूरचे मराठा राजे श्रीमंत रघुजी महाराज भोसले. सुरवातीला रघुजी महाराज भोसल्यांनी सुभेदार भास्कर राम पंडितच्या नेतृत्वाखाली सैन्य देऊन बंगाल प्रांतात त्याला पाठवलं. भास्कर पंडित आणि त्याच्या सैन्याने तिथल्या मुघल व्यापार्यांची लूट आणली. तेव्हा ओडिशा हा बंगाल प्रांताचाच एक भाग होता. दहा वर्षांच्या कालावधीत, रघुजी महाराज भोसलेंच्या सैन्याकडून अलीवर्दी खानवर वारंवार हल्ला झाला. अखेरीस १७५१ मध्ये बंगालच्या नवाबाने ओडिशाचा प्रदेश नागपूरला देण्याचे मान्य केले. तसेच बंगालकडून वार्षिक १२ लाख रुपयांची चौथाई देण्याचे कबूल केले. जवळपास दहा वर्षे मराठ्यांच्या धाडी बंगाल आणि ओडिशामध्ये सुरू असायच्या. मराठा सैनिकांची दहशत एवढी मोठी होती की तिथल्या आया आपल्या मुलांना ‘झोप नाही, तर मराठा येतील’ या कथा सांगायच्या. रघुजी महाराज भोसलेंनी बंगालच्या नवाबाला एवढे जेरीस आणले की, अखेर त्याने मराठ्यांशी तह केला आणि ओडिशाचा भाग त्यांच्याकडे सोपवला. यातूनच पुरी येथील जगन्नाथाचे मंदिर नागपूरकर भोसल्यांच्या प्रशासकीय कक्षेत आले. राजा बिरकिशोर देव भोसल्यांना घाबरला होता. म्हणून मराठा दिवाण बहादूर खान याने १७५२ मध्ये राजाला पत्र लिहून मराठा राजवटीत जगन्नाथ मंदिरावर आक्रमण केले जाणार नाही, असे आश्वासन दिले.
जगन्नाथपुरीच्या सेवकांनी न घाबरता नेहमीप्रमाणे देवतांची पूजा चालू ठेवावी, असा आदेश नागपूरकर भोसल्यांनी दिल्यानंतर पुरी क्षेत्राला पुनर्वैभव प्राप्त झाले. आदि शंकाराचार्य, निंबार्काचार्य, मध्वाचार्य, रामानुजाचार्य आणि चैतन्य महाप्रभू यांनी ज्या स्थानाला ‘महापुण्यक्षेत्र’ संबोधले, त्या पुरीच्या पुनःप्रतिष्ठापनेकरिता नागपूरकर भोसल्यांनी अहोरात्र कष्ट घेतले. पुरी व आसपासच्या क्षेत्राचा नगरविकास, रस्ते बांधकाम, भवन आणि पुलाचे निर्माण प्रथम रघुजी महाराजांच्याच काळात झाले. पुरी मंदिरातील नित्य पूजाविधी, रथयात्रा पर्व याला वार्षिक निधी सुरू केला. भक्तनिवास, धर्मशाळा, अन्नक्षेत्र, दर्शन मंडप व इतर सोयीसुविधा निर्माण याकरिता स्थानिक राजे-महाराजे जमीनदार यांना जमिनी दान देण्याचे आदेश रघुजी महाराज भोसले यांनी दिले. रघुजी महाराजांच्या आईसाहेब श्रीमंत महाराणी चिमाबाईसाहेब भोसले यांनी जगन्नाथाला मोहनभोग प्रसाद अर्पण केला, त्याचे स्मरण म्हणून आजही हा प्रसाद पुरी मंदिरात नित्य तयार केल्या जातो. श्रावण महिन्यात झोपाळे बांधून साजर्या केल्या जाणार्या विदर्भातील ‘झुलना उत्सवा’ची परंपरा भोसल्यांनी जगन्नाथ पुरीला प्रारंभ केली.
नागपूरकर भोसल्यांच्या असाधारण कार्यकर्तृत्व आणि पराक्रमामुळेच जगन्नाथ पुरीचे मंदिर पुढे सुरक्षित राहिले व आज जी रथयात्रा दिसते आहे, ती सुसंपन्न स्वरूपात पुन्हा सुरू झाली. याचे श्रेय केवळ आणि केवळ नागपूरकर श्रीमंत रघुजी महाराज भोसले (प्रथम) यांच्या दूरदर्शी नेतृत्वाला द्यावे लागेल. नागपूरकर भोसल्यांच्या पुण्यप्रतापाचे स्मरण म्हणून, नागपूरच्या विद्यमान श्रीमंत रघुजी महाराज आणि श्रीमंत डॉ. मुधोजी महाराज भोसले यांना रथयात्रा उत्सवाचे निमंत्रण आवर्जून जगन्नाथ पुरी संस्थानातर्फे पाठविले जाते.विदेशी आक्रमकांच्या तावडीतून जगन्नाथ पुरी धाम मुक्त केल्याचा आनंदोत्सव म्हणून रघुजी महाराजांनी कोणार्क येथून अरुण स्तंभ आणला व तो पुरी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापुढे उभारला. ओडिशा-बंगालवरील विजयाचे प्रतीक आणि नागपूरकर भोसल्यांच्या पुण्यप्रतापाची साक्ष देत आजही तो अरुणस्तंभ मोठ्या दिमाखात पुरी मंदिरापुढे उभा आहे. ‘कष्टप्रद कार्य’ या अर्थी ‘जगन्नाथाचा रथ’ हा वाक्प्रचार आपण सामान्य व्यवहारात सहजपणे वापरतो. पण, आक्रमकांच्या टोळधाडीतून खुद्द जगन्नाथाचे संरक्षण करून सकल हिंदुत्वाच्या संरक्षण-संवर्धनाचा हा दिव्यरथ ज्यांनी तत्कालीन प्रजेच्या मनात हिंदुत्वाचे स्फुल्लिंग प्रज्वलित करून ओढला, त्या नागपूरकर श्रीमंत राजे रघुजी महाराज भोसले यांना रथयात्रा महोत्सवानिमित्त मानाचा मुजरा! जय जगन्नाथ!!
न वै याचे राज्यं न च कनक माणिक्य विभवं
न याचेऽहं रम्यां सकल जन काम्यां वरवधूम्।
सदा काले काले प्रमथ पतिना गीतचरितो
जगन्नाथः स्वामी नयनपथगामी भवतु मे
-डॉ. भालचंद्र हरदास