केवळ संघटनेपुरते मर्यादित न राहता, देशहितासाठी आवश्यक विज्ञान क्षेत्रातील सर्वच घडामोडींवर जयंत सहस्रबुद्धे यांचे लक्ष होते व प्रत्येक कार्यकर्त्याला तशी दृष्टी असण्यावर त्यांचा आग्रह होता. ते स्वत: सर्व स्तरातल्या वैज्ञानिकांशी मोकळेपणाने अनेक विषयांवर चर्चा करीत व संपूर्ण विषय समजून घेण्याचा प्रयत्न करीत असायचे. अर्थात, जे राष्ट्राच्या हिताचे असेल ते स्पष्टपणे सांगणे, हा त्यांचा मूळ स्वभाव होता.
सतत सक्रिय जयंत सहस्रबुद्धे यांचा गेल्या नऊ महिन्यांपूर्वी अपघात झाला व त्यानंतर त्यांच्या जीवनाचा सतत संघर्ष सुरूच होता. परंतु, २ जूनला अखेर आशा संपली व ते स्वर्गवासी झाले. परिवाराने त्यांचा मुलगा, भाऊ, दीर इत्यादी नात्यातला जयंत व संघाने एक कर्तृत्ववान प्रचारक गमावला. परंतु, याही पलीकडे विज्ञानजगत एका अत्यंत मूल्यवान व्यक्तीस मुकले.जयंत सहस्रबुद्धे गोव्यात अनेक वर्षं संघाचे प्रचारक होते. त्या काळात संघकार्याला व्यापक स्वरूप मिळाले, ते अजूनही सर्वांच्या स्मरणात आहे. कामावर पूर्णत: लक्ष्य केंद्रित करून खोलात जाऊन जमिनीवर प्रत्यक्ष कार्य उभे करणे, ही त्यांची विशेषता सुरुवातीपासूनच ध्यानात येत होती. पुढे त्याची प्रचिती ते २००१ ते २००९ महाराष्ट्राच्या कोकण परिसरात प्रांत प्रचारक म्हणून कार्य करताना आली.
या वाटचालीत एका टप्प्यावर त्यांच्याकडे संघप्रेरित संघटन ‘विज्ञान भारती’चे अखिल भारतीय संघटन मंत्री म्हणून जबाबदारी आली व त्यांच्यामधील अन्य अनेक गुणांची नव्याने ओळख व्हायला सुरुवात झाली. आपल्या नि:स्वार्थ बुद्धी व सतत परिश्रमामुळे लवकरच त्यांची ‘विज्ञान भारती’च्या केंद्रीय व तसेच वेगवेगळ्या स्थानिक कार्यकर्त्यांसोबत मैत्री झाली. याचा परिणाम म्हणून गेल्या काही वर्षांत संघटनेच्या कार्याला अधिक गती मिळाली. जुन्या व नव्या सर्वच आयामांना व्याप व अपेक्षित स्वरूप प्राप्त व्हायला सुरुवात झाली व आता हळूहळू त्याची अनुभूती इतरांना येऊ लागली.
स्वत: अभियांत्रिकी शिक्षण घेतलेले जयंतराव लवकरच ‘विज्ञान भारती’च्या कार्यात रममाण झाले. केवळ संघटनेपुरते मर्यादित न राहता, देशहितासाठी आवश्यक विज्ञान क्षेत्रातील सर्वच घडामोडींवर त्यांचे लक्ष होते व प्रत्येक कार्यकर्त्याला तशी दृष्टी असण्यावर त्यांचा आग्रह होता. ते स्वत: सर्व स्तरातल्या वैज्ञानिकांशी मोकळेपणाने अनेक विषयांवर चर्चा करीत व संपूर्ण विषय समजून घेण्याचा प्रयत्न करीत असायचे. अर्थात, जे राष्ट्राच्या हिताचे असेल ते स्पष्टपणे सांगणे, हा त्यांचा मूळ स्वभाव होता. त्यामुळे कधी कधी सोबतच्या कार्यकर्त्याला याचा विपरीत परिणाम होईल, अशी शंका मनात असायची. परंतु, जयंतरावांच्या सात्विकतेचा प्रभाव म्हणून शेवटी परिणाम सकारार्थीच होत असे. या प्रक्रियेत त्यांनी अनेक प्रमुख वैज्ञानिकांना जोडले. या सर्वांशी बोलताना त्यांचा आग्रह असे की, विज्ञान म्हणजे सर्व पूर्वाग्रह बाजूला ठेवून मोकळेपणाने ज्ञान जुने की नवे, पश्चिमेतले की भारतातले, नवीन व्याख्येतले की परंपरेने आलेले, प्रयोगशाळेतून आलेले किंवा अनुभवाने सिद्ध झालेले, सर्वांकडे समान दृष्टीने बघून योग्य पद्धतीने तपासून स्वीकारले पाहिजे.
कदाचित हे करताना ते-ते ज्ञान तपासण्याची प्रक्रिया वेगवेगळी असू शकेल. ते भारतीय ज्ञानाच्या विज्ञाननिष्ठ परंपरेवर आधारित ज्ञानाच्या अनेक विषयांवर सविस्तर विषय मांडीत असत. यासाठी वर्तमानातील विज्ञानाची प्रगती व त्यातील दृष्टिकोन याची माहिती घेण्याचा त्यांचा सतत भर होता. बरोबरीने योग, आयुर्वेद, गणित, भारतीय परंपरेतील ग्रहांच्या गणितांपासून धातूशास्त्राच्या विकसित परंपरेपर्यंत अनेक विषयांवर त्यांचे सतत अद्यतन अध्ययन सुरू असायचे. मागील काही काळात ‘राष्ट्रीय दिनदर्शिका’ यावर त्यांनी बरीच भाषण दिली व पुन्हा ही दिनदर्शिका जीवित केली.
आयुर्वेदावर आधारित आहारावरसुद्धा त्यांचा अभ्यास होता व ‘आहार क्रांती’च्या अभियानात ‘विज्ञान भारती’च्या सहभागावर त्यांचा भर होता. त्यांची मूळातून विचार करण्याची प्रवृत्ती असल्यामुळे चिंतनापोटी नव्या-नव्या कल्पना जन्म घेत. स्वाधीनतेच्या अमृत महोत्सवानिमित्त कसे वैज्ञानिकांनी स्वातंत्र्याच्या लढ्यात आपल्या ‘स्व’च्या आग्रहामुळे युरोपच्या दबावास बळी न पडता, भारतीय ज्ञानाला जोपासत आधुनिक विज्ञानाच्या क्षेत्रात भारतीय बुद्धीचा अमिट ठसा उमटवला, याचा अभ्यास करीत त्यांनी हेच अभियान बनविले. यावरील त्यांच्या भाषणांमध्ये आपल्याला देशभक्तीच्या अज्ञात राहिलेल्या नव्या आयामाची ओळख होत असे. पुढे हे एक व्यापक अभियानच बनले.कुठलाही विषय समजावून घेण्याचे स्थान, ही जयंतरावांची ओळख कार्यकर्त्यांप्रमाणे अनेक वैज्ञानिकांमध्ये देखील परिचित होती. त्यांच्या जाण्याने झालेली ही पोकळी सर्व कार्यकर्त्यांनी मिळून लवकरच भरून काढावी, हीच जयंतरावांची खरी इच्छा असेल, असे वाटते.
-सुनील आंबेकर
(लेखक रा. स्व. संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख आहेत.)