जयंतरावांचे घर कधीही दुसर्याचे घर आहे, असे वाटले नाही. गणपती, दिवाळीमध्ये काकूंना, काकांना भेटायला जयंतराव आले की, मी नेहमीच त्यांच्या मागे घरी जात असे. तेव्हा छान गप्पा होत होत्या. जेव्हा जयंतरावांकडे ‘विज्ञान भारती’चे काम येणार होते, तेव्हा ‘समतोल’ची व्यवस्था अधिक सक्षम होण्यासाठी त्यांनी काही नियोजन केले होते. त्यातील एक भाग म्हणजे ‘सेवा सहयोग’ची स्थापना...
नमस्कार, मी जयंत सहस्रबुद्धे. संघाचा प्रचारक आहे. तुला भेटायला आलो होतो. माधव जोशींनी सांगितले की, सामाजिक काम करणारा एक मुलगा विक्रोळी पार्कसाईटमध्ये राहतो. म्हणून बोलायला आलो.” मला आजही तो दिवस आठवतो, जेव्हा जयंतराव माझ्या घरी आले होते. त्यांच्यासोबत विठ्ठलराव कांबळे व ज्ञानेश्वर जाधवही आले होते. पहिल्या भेटीतच जयंतरावांनी माझे मन जिंकून घेतले होते. खरंतर जादू वगैरे काही नाही, पण बोलण्यातला गोडवा व प्रचंड सकारात्मक ऊर्जा... कदाचित यामुळेच मी त्यांच्याकडे आकर्षित झालो.
स्टेशनवरच्या घरापासून दूर होणार्या मुलांच्या बाबतीत कामाची चर्चा करताना एक दिवस स्टेशनवर भेटण्याचे ठरवले. त्यावेळी जयंतरावांशी दिवसभर गप्पा मारताना, बोलताना मला जरासुद्धा कंटाळा आला नाही. कारण, जयंतराव जास्त बोलत नव्हते, मीच खूप काही सांगण्याचा प्रयत्न करत होतो. पण, त्यांनी मला कुठेही डावलले नाही. मी अधूनमधून काही खात होतो. पण, जयंतराव यांनी काहीही चहा-पाणी घेतले नाही. जयंतराव पुढे कोकण प्रांताचे प्रचारक होते. त्यावेळेस सरसंघचालक सुदर्शनजी होते. त्यांची प्रथमतः भेट ’पितृछाया’मध्ये जयंतरावांनी घडवून आणली. ’समतोल’च्या कार्याची माहिती दिली. तेव्हा त्यांनी त्यांच्या खास भाषेत मला एक प्रकारे आदेशच दिला होता. ‘’अच्छा काम कर रहे हो तो करते रहो, बीच मे छोडना नही हैं।” मी ’नाही नाही’ म्हणत बाहेर पडलो. कारण, मला त्यांच्याबाबत काहीच माहीत नव्हते.
जयंतरावांनी त्यानंतर माझ्याबद्दल बोलताना ’प्राथमिक’ला जाणार म्हणून सांगितले. मला ’प्राथमिक’, ’प्रथम’ असे काहीच माहीत नव्हते. शिवाय त्यावेळी ’समतोल’चे कामही नवीनच होते. तरीही जयंतरावांच्या शब्दापुढे जाण्याची हिंमत झाली नाही. कारण, त्यामध्ये प्रेम आणि जिव्हाळा होता. २००७ मध्ये मी ’केशवसृष्टी’ येथे ’प्राथमिक’ केले. त्यानंतर मला थोडीफार संघकार्य पद्धत समजू लागली. ’समतोल’चे कार्य हे मुलांच्या पुनर्वसनाचे असल्याने माझा प्रवास राष्ट्रीय स्तरावर होता. ’समतोल’चे कार्य हे राष्ट्रीय स्तरावरचे कार्य आहे. २९ राज्यांतील घरातून वेगवेगळ्या कारणांनी मुंबई शहराकडे येणार्या मुलांच्या समस्या खूप वेगवेगळ्या आहेत. एकूण ५० मनपरिवर्तन शिबिरे आतापर्यंत ’समतोल’ने केली. १८ हजारांपेक्षा अधिक मुलांना कुटुंबाशी जोडून विकासात्मक पुनर्वसन केले.
पण, हे करताना ज्या मुलांचे मनपरिवर्तन झाले पाहिजे, अशी नैसर्गिक जागा शोधून तिथे ‘स्वामी विवेकानंद मनपरिवर्तन केंद्र’ उभे करण्याचे कार्य व त्याचा पाया जयंतरावांनी ‘हिंदू सेवा संघा’बरोबर समतोल साधून केला. त्यावेळी डोंबिवलीचे श्रीपाद जोशी-स्वयंसेवक जयंतरावांबरोबर होते. २००७ मध्ये ही मुहूर्तमेढ रोवली गेली. आज ‘मामणोली हिंदू सेवा संघा’त ’समतोल’ने आपली स्वतःची वेगळी ओळख तयार केली असून, प्रचंड विस्तार व कार्यपद्धत सक्षम केली आहे. त्याचे संपूर्ण श्रेय जयंतरावांना जाते. भटक्या मुलांबरोबर भटकत कार्य करणारा विजय भटकत राहू नये, त्यालाही निवारा असावा, त्याचेही घर असावे म्हणून जयंतरावांची आई म्हणजे आपल्या काकू त्यांनी खूप मोठी मदत घर घेण्यासाठी जयंतरावांमार्फत मला केली होती. काका तर आमच्यासोबत मित्रासारखे वागत होते.
जयंतरावांचे घर कधीही दुसर्याचे घर आहे, असे वाटले नाही. गणपती, दिवाळीमध्ये काकूंना, काकांना भेटायला जयंतराव आले की, मी नेहमीच त्यांच्या मागे घरी जात असे. तेव्हा छान गप्पा होत होत्या. जेव्हा जयंतरावांकडे ’विज्ञान भारती’चे काम येणार होते, तेव्हा ’समतोल’ची व्यवस्था अधिक सक्षम होण्यासाठी त्यांनी काही नियोजन केले होते. त्यातील एक भाग म्हणजे ‘सेवा सहयोग’ची स्थापना. अशी एखादी मातृसंस्था असावी जी इतर संस्थांना मदत करेल, या विचाराने ’सेवा सहयोग’ची निर्मिती झाली तीसुद्धा जयंतरावांच्या प्रेरणेमुळेच! परंतु, ’समतोल’च्या कार्यात ’सेवा सहयोग’चा मदतीचा हात नेहमीच कमी राहिला. ’समतोल’च्या कार्यपद्धतीमध्येसुद्धा सक्षम व्यक्ती असतात म्हणून संजय हेगडे, किशोर मोघे, डॉ. जान्हवी केदारे, माधव जोशी अशा ज्येष्ठ, श्रेष्ठ व्यक्ती जयंतरावांनी ’समतोल’शी जोडल्या. म्हणूनच ’समतोल’चा समतोल अबाधित राहिला आणि वाढला.
जेव्हा त्यांच्या अपघाताची बातमी आली, तेव्हा आमच्या कुटुंबातील कोणीही त्या रात्री जेवले नाही; इतके प्रेम ते घरात नसतानाही घरातील लोक त्यांच्यावर करत होते. मुले, बायको, सासू-सासरे सर्व त्यांचे झालेले होते. त्यांनी आपले करून घेतले होते. खूप काही गोष्टी लक्षात आहेत, मनात घर करून आहेत, आठवणी जाता जात नाहीत. दि. २ जून मनावर कोरली गेलेली तारीख आहे. यापलीकडे नि:शब्द आहे. संगीत, विज्ञानाचे ज्ञान, हसतमुख चेहरा, शांत स्वभाव... अशा कितीतरी पैलू असणारे आमचे जयंतराव सखा, मित्र, गुरुवर्य, मार्गदर्शक सर्व काही होते. शेवटी ’समतोल’चे एक वाक्य त्यांना तंतोतंत जुळते-
उगता सूरज राह दिखाये, भाग रहा हैं अंधेरा,
आंधियों से, तूफानों से कब रुका हैं सबेरा!!!
विजय जाधव
(लेखक ‘समतोल फाऊंडेशन’चे संस्थापक आहेत.)