‘विज्ञान भारती’चे राष्ट्रीय संघटन मंत्री म्हणून बहुआयामी व्यक्तिमत्वाचे धनी असलेले जयंतराव सहस्रबुद्धे. त्यांचे आपल्यात नसणे, ही संघटनेबरोबरच राष्ट्राचीसुद्धा अपरिमित हानी होय!
पहाटे पहाटे आलेल्या बातमीवर विश्वास ठेवायला मन तयार नव्हते. जयंतराव आपल्यात नाही, ही ’विज्ञान भारती’च्या कार्यकर्त्यांसाठी असहनीय बातमी होती. मनाच्या अस्वस्थ अवस्थेत मीनाताईस फोन केला. खरीच बातमी होती ती. आत्ता आत्ता तर मी त्यांना भेटून आले होते. यावर्षीच्या गुढीपाडव्याला जयंतरावांना भेटायला मी पनवेलच्या पटवर्धन हॉस्पिटलमध्ये गेले होते. ’जयंतराव’ अशी हाक मारताच त्यांनी डोळे उघडले. क्षणभरच का होईना, परंतु निश्चितपणे ओळखीचे भाव डोळ्यात दिसले मला.
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्यावर एक चिरपरिचित स्मित चेहर्यावर झळकले. जयंतराव या सगळ्या दुष्टचक्रातून बाहेर येतील ही खात्री पटली. ’जयंतराव, तुम्ही सुरू केलेल्या विज्ञान चळवळीस आम्ही ’विभा’ कार्यकर्ते अधिक जोमाने पुढे नेऊ,’ ही खात्री देऊन मी हॉस्पिटलमधून बाहेर पडले आणि आज असा हा वज्राघात? का हो अशी घाई केलीत जाण्याची? जयंतराव म्हणजे भारतीय विज्ञानाची ओळख भारतीयांना नव्याने करून देण्यासाठी जीवाचे रान करणारा एक विज्ञानयात्री, प्रखर राष्ट्रभक्त, तीक्ष्ण बुद्धीचे लेणं घेऊन आलेला एक अनोखा प्रबुद्ध, परकीय शिक्षण प्रणालीचे झापडं डोळ्यांवर बांधून आत्मविस्मृतीस गेलेल्या भारतीय मानसिकतेस आव्हान देणारा भारतमातेचा एक मौल्यवान सुपुत्र... इतिहासात कुठेही नोंद नसलेल्या, स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय संशोधकांनी केलेल्या अद्भुत व अतुलनीय कार्यास आपल्याच लोकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य अविरतपणे करणारा एक विज्ञानसेवक.
’विज्ञान भारती’चे राष्ट्रीय संघटन मंत्री म्हणून बहुआयामी व्यक्तिमत्वाचे धनी असलेले जयंतराव सहस्रबुद्धे. त्यांचे आपल्यात नसणे, ही संघटनेबरोबरच राष्ट्राचीसुद्धा अपरिमित हानी होय. मला आठवते ’विदर्भ विज्ञान भारती’चे पहिले विज्ञान शिबीर पंडित बच्छराज व्यास शाळेत झालेले. नागपुरातून ’विभा’शी जुळलेल्या २० व्हिएसएफ शाळांमधून १४९ विद्यार्थी त्या शिबिरात सहभागी झाले होते. सहा प्रयोगशाळांतून प्रयोग करताना विद्यार्थ्यांचा उत्साह भरभरून वाहणारा असायचा.
समारोपाच्या कार्यक्रमाला जयंतराव होते. समारोपीय कार्यक्रमात एका विज्ञानसंगीत नाटिकेचेही सादरीकरण शिबिरार्थींनी केलेले. कोण म्हणून कौतुक करावे जयंतरावांनी! शिक्षकांशी बोलताना ते म्हणाले होते, ”शिक्षकाने विज्ञान पठडीबद्ध शिक्षणप्रणालीचा भाग म्हणून शिकवू नये. शिक्षकाने प्रथम विज्ञानाचे खरे अभ्यासक व्हावे व विद्यार्थ्यांमध्येही हीच प्रवृत्ती रूजवावी.” आणि मला म्हणाले, ”साठे मॅडम, अशा विज्ञान शिबिरांना ’विज्ञान संस्कार शिबीर’ असे नामकरण हवे.” या एका शब्दाने विज्ञान शिबिराला केवढा मोठा अर्थ दिला जयंतराव तुम्ही! त्यानंतर ’विज्ञान संस्कार शिबीर, म्हणजे ’विभाचे आयोजन’ अशी अनोखी ओळख ’विदर्भ विभा’स मिळाली. आम्हा कार्यकर्त्यांमध्ये विज्ञान संस्कांरांचे महत्त्व पेरून गेलाय तुम्ही!
साप्ताहिक मिटींगच्या निमित्ताने विविध वैज्ञानिक विषयांच्या चर्चेतून सहज बाहेर पडलेले विद्यार्थीप्रणित विषय म्हणजे ‘व्हिएसएफ’, प्रगती, नवीन, कुतूहलसारखे प्रकल्प यशस्वीपणे राबविलेले बघून जयंतरावांची कौतुकाची थाप हमखास आम्हा कार्यकर्त्यांच्या पाठीवर पडायची. भारतीय वैज्ञानिकांनी स्वातंत्र्यपूर्व काळात केलेले कार्य गोष्टीरूपात विद्यार्थ्यांसमोर आणण्यासाठी साहित्यर्निर्मिती होण्याची गरज आहे, अशी इच्छा जयंतरावांनी व्यक्त केली आणि ’विभा विदर्भ’ने या कार्यासाठी समन्वयक म्हणून माझ्यावर जबाबदारी सोपविली.
कार्यकर्त्यांनी चौफेर सर्व आयामांवर लक्ष ठेवत भारतीय विज्ञान प्रभावीपणे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे, ही जयंतरावांची दूरदृष्टीता. १५ भारतीय वैज्ञानिकांच्या जीवनचरित्रांचे व कार्याचे आढावे घेणारी ’विज्ञान सेनानी’ नावाची पुस्तिका ’विज्ञान सर्वत्र पूजन्ते’च्या समारोपीय कार्यक्रमात प्रकाशित झाली. परंतु, व्यस्ततेमुळे जयंतराव या कार्यक्रमास येऊ शकले नव्हते. पुढे जेव्हा जयंतराव नागपुरात आले, तेव्हा एक दिवस आमच्याकडे रात्रीच्या जेवणास आलेले.
दिवसभराच्या व्यस्त कामाचा थकवा चेहर्यावर कुठेही नव्हता. जाताना मला म्हणाले, ”साठे मॅडम! पुस्तकाचे काय झाले?” त्यांना द्यायचे म्हणून मराठी, हिंदी, इंग्रजी असे तीनही ’विज्ञान सेनानी’चे अंक हातात ठेवलेच होते मी. ते जयंतरावांना दिल्यावर मीही कृतकृत्य झाले. ”काय? तीनही भाषांतून प्रकाशित केले?” असे कौतुकमिश्रीत शब्द त्यांच्या तोंडून ऐकताना काय आनंद झाला होता. कार्यकर्त्याला प्रेरित करण्याची एक अद्भुत कला जयंतरावांकडे होती.
पुढे १५ दिवसांनी जयंतरावांचा फोन आलेला म्हणाले, ”चांगले कार्य केले आहे विदर्भ प्रांताने.” पुढच्या भेटीत पुस्तिका लेखन करणार्या लेखिका, लेखक यांच्याशी संवाद करता येईल, असे म्हणाले. पण, तो प्रसंग येणे नियतीला मान्य नव्हते. पुढे महिन्याभरातच जयंतरावांच्या अपघाताची दुर्दैवी बातमी समजली. मृत्यूशी नऊ महिन्यांच्या चिवट संघर्षानंतर ईहलोकीची यात्राही संपुष्टात आली. जयंतराव का हो अवेळी जाण्याची घाई केलीत? तुमच्या पावन स्मृतीस मनोभावे त्रिवार वंदना!
वसुंधरा साठे
(लेखिका विज्ञान भारती, विदर्भ प्रांत कार्यकारिणी सदस्य आहेत.)