संघ प्रचारक, ‘विज्ञान भारती‘चे संघटनमंत्री जयंतराव सहस्रबुद्धे यांचे प्रदीर्घ आजाराने दि. २ जून रोजी पहाटे दुःखद निधन झाले. जयंतराव यांची माझी खूप जुनी ओळख. म्हणजे २००५ पासूनची. तेव्हा ते कोकण प्रांत प्रचारक होते. त्यावर्षी चिपळूणच्या नागालॅण्ड विद्यार्थिनी वसतिगृहाची सुरुवात झाली. त्यानिमित्ताने जयंतरावांसोबत बैठकी होत असत. तेव्हा १३ मुलींची व्यवस्था वसतिगृहात होती. व्यवस्थापिका सुचिताताई भागवत, मदतनीस पुष्पाताई दांडेकर होत्या. दोन-तीन मोठ्या महिला, मी आणि माझ्या दोन-तीन मैत्रिणी वसतिगृहात नियमित असायचो. मुलींचा अभ्यास घेणे, त्यांच्याशी खेळणे, दुखलंखुपलं पाहणे, त्यांचे कपडे, अभ्यास इत्यादींकडे लक्ष देणे आम्ही अगदी मजेत, आनंदाने करायचो. मुली अगदीच शाळकरी असल्याने त्यांना घरची, आई-वडिलांची आठवण येई. मग त्यांना प्रेमाने जवळ घेणे, मायेने समजावणे हेही सहजपणे करायचो.
पण, अगदी सुरुवातीला आम्हाला मुलींशी कसे, काय बोलावे? भाषा अशा अनेक अडचणी होत्या. त्या काळात जयंतराव, अतुलजी जोग असे वरिष्ठ आमची बैठक घेत. नागालॅण्डमधील परिस्थिती, मुलींची परिस्थिती, आपल्याला नक्की काय करायचे आहे? कोणत्या उद्दिष्टाने मुली इथे आल्या आहेत? त्यांची काळजी घ्यायची म्हणजे काय करायचे? अशा अनेक विषयांवर चर्चा होत असे. मीही अगदी कॉलेजकन्या असल्याने हे सगळे प्रत्यक्ष संघसंस्कारच जणू माझ्यावर होत होते. ईशान्य भारताची पहिली ओळख झाली ती अशा बैठकांमधून! नागा मुलींसाठी ते ‘जयंत अंकल‘ होते. मुलींशी थोडावेळ का होईना, पण गप्पा मारल्याशिवाय कधी चिपळूण सोडत नसत. पूर्वांचल समजलेले आणि पूर्वांचलावर मनापासून प्रेम केलेले आमचे गुरू, मार्गदर्शक म्हणजे जयंतराव. माझं शिक्षण पूर्ण होण्याच्या मार्गावर असताना त्यांनी मला ‘नागालॅण्डला निदान सहा महिने दे‘ असे सांगितले होते.
तेव्हा मला वैयक्तिक आकांक्षांची क्षितिजे दिसत होती आणि मी त्यांना स्पष्ट ‘नाही‘ म्हणून सांगितले. इतक्या मोठ्या व्यक्तीने आपल्यावर विश्वास ठेवून काही सांगितले जे आपण करत नाही, याची बोच माझ्या मनात कायम राहिली. पण, मग संधी मिळताच ईशान्य भारताचा मार्ग धरला. उशिराने आणि कणभर तरी का होईना, आपण सांगितलेले काम करतो आहोत, याचे समाधान आहे. ‘कोविड’च्या अगदी आधी एका लग्नात भेट झाली होती. तेव्हा ते मला म्हणाले, “तुझे उद्योग कानावर येतायत, “ असं कौतुक करणारे जयंतराव मात्र गेले.त्यांच्या अपघाताची बातमीही अपघातानेच मला कळली. हे कधी ना कधी घडणार याची धाकधूक गेले अनेक महिने मनात आहे. तरी आज बातमी आल्यावर फार वाईट वाटतेय. सौम्य भाषा, सुस्पष्ट विचार, समोरच्याची अडचण समजून योग्य मार्गदर्शन करणारे, अत्यंत सालस, कुशाग्र बुद्धीचे, तासून तासून घडवलेले व्यक्तित्व असे अकारण आपल्यातून निघून जावे, ही फार फार मोठी सामाजिक आणि माझ्यासाठी वैयक्तिक हानी आहे.
जड अंतःकरणाने श्रद्धांजली.... श्रीराम!
अमिता आपटे