दिव्यत्वाची प्रचिती : लोकनेते रामशेठ ठाकूर

    01-Jun-2023
Total Views |
Article on Politician Ramsheth Thakur

‘दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती!’ या शीर्षकानुसार, सर्व स्तरातील माणसाच्या मनात त्यांच्याप्रती नेहमीच आदराचे स्थान असलेल्या, सर्वसामान्यांचे ‘आधारवड’ असलेल्या लोकनेते रामशेठ ठाकूर यांना त्यांच्या ७२व्या वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन...

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा दानशूरपणा सर्वांना परिचित आहे आणि त्या अनुषंगाने एक श्लोक आहे- शंभरामध्ये एक शूर असू शकतो, हजारामध्ये एखादा पंडित असू शकतो, दहा हजारांमध्ये एखादा वक्ता असू शकतो आणि लाखांत एखादा दाता असू शकतो आणि हीच गोष्ट लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या रुपाने समाजाला मिळाली आहे. त्यांची कीर्ती, कार्याचा आदर्श एवढा मोठा आहे की, त्यांच्या शिकवणीतून अनेक जण शिक्षित झाले आणि त्यांनीही त्यांच्या पाऊलांवर पाऊल टाकत समाजसेवेचे व्रत हाती घेतले आहे. समाजामध्ये जे पीडित, शोषित, दुःखी आहेत, त्यांना आर्थिक मदत करणे ईश्वर सेवा आहे. हे मानूनच लोकनेते रामशेठ ठाकूर काम करीत असतात.

सामाजिक बांधिलकी हे तत्त्व लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सुरूवातीपासून अंगीकारले आहे. दररोज हजारो लोक त्यांना भेटण्याकरिता येतात. त्यामध्ये अडचणींची सोडवणूक करण्याबरोबरच मदतीच्या अपेक्षेने अनेक जण येतात. साहेबांकडे आलेली व्यक्ती रिकाम्या हाताने परत कधीच जात नाही. अनेकांचे अश्रू पुसण्याचे काम साहेब करतात. जिद्द, चिकाटी, प्रामाणिकपणा, कठोर परिश्रम घेण्याची तयारी या गुणांचे बाळकडू त्यांना लहान वयातच आई-बाबांकडून मिळाले. त्यामुळे जीवनातील संघर्षाला तोंड देत असताना आपल्या अंतर्मनात शिक्षणाविषयीची आस त्यांनी जागृत ठेवली. ’रयत शिक्षण संस्थे’च्या सातारा येथील विद्यालयात त्यांनी ’कमवा आणि शिका’ या तत्त्वाने आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांनी शिक्षणाची जाण ठेवत ’रयत शिक्षण संस्थे’च्या सक्षमीकरणासाठी सातत्याने मदतीचा हात देऊ केला आहे.

कष्टकरी, गोरगरीब घरातील मुलांना शिक्षण मिळावे, यासाठी ’जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थे’च्या माध्यमातून उभे केलेल्या विद्यालयांमुळे कष्टकरी माणसांच्या झोपडीपर्यंत इंग्रजी भाषेचे ज्ञान आणि आधुनिक शिक्षण पोहोचले आहे. समाजातील सर्वसामान्य माणसांच्या न्याय हक्कासाठी सतत पुढे राहणे, प्रसंगी स्वजनांशी संघर्ष करणे, हा लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा स्थायीभावच. सामाजिक बांधिलकी, दूरदृष्टी, सकारात्मक विचारसरणी, कठोर परिश्रम घेण्याची तयारी, प्रामाणिकपणा, अचूक निर्णयक्षमता, कर्तव्यनिष्ठा, श्रद्धा या गुणांमुळे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी समाजजीवनातील यशाची अनेक शिखरे पादाक्रांत केली आहेत.

आतापर्यंतच्या आयुष्यात त्यांना जो लौकिक मिळाला. त्याचे श्रेय द्यायचे असेल, तर ते कुणा एका व्यक्तीला न देता परिस्थितीला द्यावे लागेल, परिस्थितीने त्यांना घडविले. विशिष्ट प्रकारच्या परिस्थितीमुळे काही माणसे, काही व्यक्ती त्यांच्या सान्निध्यात आल्या. परिस्थिती शहाणं बनविते, या वास्तवाची जाण करून दिली, मार्गदर्शन केले, आयुष्य सदैव समृद्ध केले, अनुभवाची क्षितीजे विस्तृत झाली, म्हणूनच आयुष्यात जे काही चांगलं घडलं, त्याचं श्रेय परिस्थितीला दिले पाहिजे. प्रत्येक पुरूषामागे प्रेरणा असते, स्त्रीशक्तीची, ती त्यांना लाभली पत्नी शंकुतला यांची व पुढील कार्याला साथ लाभली, ती आमदार प्रशांत ठाकूर व परेश ठाकूर या सुपुत्रांची व आशीर्वाद लाभले ते माताजी भागूबाई, पिताजी चांगू व सासरे जनार्दन भगत साहेबांचे, म्हणूनच लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे भविष्य उज्वल घडू शकले असे म्हटलं, तर वावगं ठरणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज , महात्मा फुले, भारतरत्न आंबेडकर, ’पद्मश्री’ कर्मवीर अण्णा यांचा आदर्श घेऊन ते नेहमी कार्यरत राहिले असून, त्यांचा माणसांवर अधिक विश्वास आहे.

राजकीय व आर्थिक शक्ती लोककल्याणासाठी सार्थकी लावणारा नेता म्हणून त्यांची ओळख नेहमीच अधोरेखित झाली आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर हे गरीब कुटुंबातून पुढे आलेले नेतृत्व आहे. जे काही मिळवले आहे, ते संघर्ष करून मिळवले. कोणतेही सत्ता पद नसताना लोकसभेवर निवडून जाणे, हे भल्याभल्यांना तोंडावर आपटण्यासारखे आहे. फक्त आपल्या कर्तृत्वाच्या आणि दातृत्वाच्या बळावर लोकनेते रामशेठ ठाकूर हे दोनदा खासदार झाले. आपली ख्याती सर्वदूर पसरली आहे, हे माहिती असूनही, त्यांनी कधी मीपणा बाळगला नाही. राजकारणात सत्तापद मिळवण्याच्या आधीपासून त्यांनी समाजसेवेचे व्रत घेतले होते.

माणुसकी व कर्तव्याची जाण ठेवून लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांच्याजवळ असलेली आर्थिक शक्ती लोककल्याणासाठी सार्थकी लावण्याचे ठरविले आणि त्यांनी तसे केले आणि आताही करीत आहेत. गरीब गरजूंना मदत, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक क्षेत्रांना भरघोस मदतीचा हात, रुग्ण, खेळाडू, शिक्षण क्षेत्रात उच्च शिक्षणासाठी सहकार्य, आपत्ती, दुष्काळ अनेक घटकांना मदत हे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे समाज व्रत अजूनही सुरूच आहेे आणि तो सार्थकी लागत आहे, म्हणूनच लोकनेते रामशेठ यांच्या मनाला समाधान वाटत आहे. आदरणीय लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या कार्यरुपी तेजाने शैक्षणिक, सामाजिक व राजकीय आघाड्यांवर जे जबरदस्त परिवर्तन घडून आले आहे. त्यातून त्यांच्या दिव्यत्वाची प्रचिती येते. त्यामुळे ’दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती!’ या शीर्षकानुसार, सर्व स्तरातील माणसाच्या मनात त्यांच्याप्रती नेहमीच आदराचे स्थान आहे, त्यामुळे सर्वसामान्यांचे ’आधारवड’ असलेले लोकनेते रामशेठ ठाकूर यांना त्यांच्या ७२व्या वाढदिवसानिमित्त निरोगी व दीर्घायुष्य लाभो, ही साईचरणी प्रार्थना!

हरेश साठे


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.