स्वातंत्र्यसेनानी वामन नारायण उर्फ दाजी जोशी

    09-May-2023
Total Views | 133
swatantrata-senani Vaman Narayan

वामन जोशींना राजद्रोहाच्या गुन्ह्यावरून काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली. सावरकर बंधू आणि स्वातंत्र्यसेनानी वामन नारायण उर्फ दाजी जोशी अंदमानाच्या काळकोठडीत स्वातंत्र्यासाठी त्यागाची परिसीमा गाठत अक्षरशः नरकयातना भोगत होते. या देशनिष्ठांचा त्याग अतुलनीय आहे. मातृभूमीप्रती त्यांचे प्रेम शब्दातीत आहे. वामन जोशी यांच्या देशकार्यासंबंधी माहिती देणारा हा लेख...
 
१८५०च्या जवळपास इंग्रजांचे एकछत्री साम्राज्य संपूर्ण भारतवर्षात स्थापन झाले. १८५७चा लढा यशस्वी होऊ शकला नाही. इंग्रजांनी जरी त्याला ’बंड’ असे नाव दिले असले तरी सावरकरांनी त्याला ‘स्वातंत्र्य समर’ असे नाव दिले आणि त्या लढ्याने देशभक्तीची ज्योत प्रत्येक भारतीयाच्या मनात तेवती ठेवण्याचे काम नक्कीच केले. आता पारतंत्र्याच्या बेड्या प्रत्येक भारतीय व्यक्तीला त्याच्या पायात टोचू लागयला सुरुवात झाली होती. हे स्वातंत्र्य म्हणजे केवळ काही घटनांचे मर्यादित फळ नाही, तर हा लढा संपूर्ण भारतात वेगवेगळ्या स्तरावर लढला गेला. केवळ भारतातच नाही, तर भारताबाहेरूनसुद्धा या लढ्याला वेळोवेळी पाठिंबा मिळाला.

महाराष्ट्रात इंग्रजांविरूद्ध दोन यशस्वी कट झालेत, एक चापेकर बंधूंनी केलेला रँडचा वध, तर दुसरा हुतात्मा कान्हेरेंनी केलेला जॅक्सनचा वध. जॅक्सनचा वध १९०९ साली नाशिकमधील विजयानंद थेटरमध्ये झाला. कान्हेरे, कर्वे आणि देशपांडे थेट सहभागी म्हणून तिघांना पकडले गेले. पण, एवढ्यावरच इंग्रज थांबले असते, तर कदाचित या खटल्याची व्याप्ती सार्‍या देशभर झाली असती आणि परिणामी इंग्रजांची दहशत कमी झाली असती, हेच तर त्यांना नको होते. आपल्या एकसुरी साम्राज्यात त्यांना कोणताच अडथळा नको होता. त्या काळात महाराष्ट्रात अनेक गुप्त संघटना, ‘अभिनव भारत’च्या अनेक शाखा आणि त्यांचे अनेक सभासद क्रांतीची मशाल घराघरातून जागृत करत होते. आता इंग्रज चवताळले होते, त्यांनी सरसकट धरपकड सुरू केली. या समराग्नीमधले एक योद्धे वामन जोशी!

वामन नारायण जोशी मूळचे समशेरपूरकर. अण्णा कर्वेंच्या शाखेतील अतिशय उत्साही, कार्यतत्पर, पक्के देशभक्त होते. पंचवटीतील एका शाळेत देशपांडेंप्रमाणे तेसुद्धा मास्तर होते. गुप्त संघटनेचे सभासद, मात्र ते धुळ्यापासून म्हणजेच त्यांच्या महाविद्यालयीन काळापासून होते. धुळ्यातल्या महाबळांच्या शाखेचे ते सभासद होते. जोशी निकोप प्रकृतीचे तसेच निधड्या छातीचे होते, असे वर्णन आढळते. त्यामुळेच काळ्या पाण्याची शिक्षा भोगून परत आल्यावर ते आपल्या भावाच्या संसाराचे आधारस्तंभ झालेत. अनंताचा विचार पक्का झाला, तसे गणूच्यामार्फत नाशिकमधील गुप्त संघटनेच्या सभासदांना तो कळवला गेला. त्यावेळी कर्वे मुंबईला होते. त्यामुळे देशपांडे, सोमण आणि जोशी त्यांना कळविण्यात आले. या तिघांनी कर्वेंशी सल्लामसलत करून कान्हेरेंना नाशिकमध्ये बोलावले. त्यावेळी कान्हेरेंना जॅक्सन ऑफिसपर्यंत नेऊन त्याची ओळख व्हावी, यासाठी मदत करणे, त्यांना पिस्तूलं चालवायचा सराव करण्यासाठी नाशिकबाहेर घेऊन जाणे, ही सगळी कामे जोशी स्वतः करत असतं.
 
जॅक्सनला मारण्याचा कट दोनदा काही ना काही कारणामुळे मागे पडला. पण, आपल्या आसपासच्या घडणार्‍या घटना अनंतासाठी प्रेरणादायी ठरल्या. अनंताने जोशींना पत्र पाठवले, ’माझा विचार पक्का झाला, मला कोणीही सहकारी नको, मी एकटाच कामाला तयार आहे.’ जोशींनी त्यावेळी लागलीच उत्तर पाठवले, ’तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही तयार आहोत.’ ते पत्र अनंताने फाडून आपल्या ट्रंकेत ठेवले, ते जाळायचे राहून गेले. नंतर दाजींचे दुसरे पत्र आले- ‘आम्ही सध्या व्यापार करण्यास तयार नाही.’ ही पत्रे जॅक्सन वधानंतर अनंताच्या खोलीच्या झडतीत इंग्रजांच्या हाती लागली. हे २८ तुकडे जोशींच्या शिक्षेचे कारण बनले.

हस्ताक्षरावरून आणि गणूच्या माहितीवरून इंग्रजांनी वामन जोशींना दि. २३-२४ डिसेंबरला पकडले. हाच पुरावा इंग्रजांना पुरेसा होता, वामन जोशींना पहिल्याच खटल्यात गोवण्यासाठी. इंग्रजांनी एक नवा हुकूम काढून त्याअंतर्गत केस चालवली. यात चौकशीही अतिशय गुप्तपणे चालत असे. त्यात छळाच्या सगळ्या परिसीमा गाठल्या होत्या. अनन्वित छळ करून प्रत्येक क्रांतिकारकाला जबानी द्यायला लावली. दाजी जोशी याला अपवाद नव्हते. जोशींना राजद्रोहाच्या गुन्ह्यावरून काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली. नाशिकमधून अंदमान येथे दोन नाही, तर तीन कैदी पाठवले गेले, सावरकर बंधू आणि स्वातंत्र्यसेनानी वामन नारायण उर्फ दाजी जोशी.

वय केवळ १८-१९. या कोवळ्या वयात त्यांनी आपले सर्व जीवनच देशसेवेला वाहून टाकले. ते आजन्म अविवाहित राहिले. पण, जबाबदारीपासून कधीही दूर गेले नाही. काळ्या पाण्याची शिक्षा भोगून परत आल्यावर त्यांनी आपल्या मयत भावाचा संसार सांभाळला. सरकारी मानमरातब त्यांना कधीही लाभला नाही. या सगळ्या भारतमातेच्या पुत्रांना कधी त्याची गरजही भासली नाही. पण, आपल्या इतिहासाची पाने विसरून भविष्याचे स्वप्न बघता येत नाही. पुढच्या पिढीला ही बलिदानाची गाथा पदोपदी लक्षात ठेवायलाच हवी. देशाला मिळालेले स्वातंत्र्य जोशींनी बघितले, हीच काय ती त्यांच्या कामाची पावती असं म्हणू या. १९६५ साली वृद्धापकाळाने त्यांचा मृत्यू झाला. त्या नि:स्पृह स्वातंत्र्य सेनानीला आमचे शब्दरूपी वंदन.

॥ वंदे मातरम् ॥


-सोनाली तेलंग



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121