मुंबई : यंदाच्या आयपीएल मोसमाचा शेवटचा सामना दि. २८ मे राजी रविवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रंगणार आहे. सायंकाळी साडे सात वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. चेन्नई सुपर किंग्जचा कप्तान महेंद्रसिंग धोनीचा हा शेवटचा सामना असणार का, याकडे धोनीच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे. निवृत्तीबाबत धोनीने गेल्या मोसमात तसे सुतोवाच दिले होते. त्यामुळे आजच्या अंतिम सामन्यानंतर धोनी आपली निवृत्ती जाहीर करणार का, याकडे क्रिकेटजगताचे लक्ष आहे.
दरम्यान, धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. ट्विटरवरही #MSDhoni ट्रेंड होत आहे. त्यामुळे धोनीचे हे शेवटचे पर्व असल्याचे युझर्स म्हणत आहेत. आतापर्यंत धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्जने चारवेळा आयपीएल विजेतेपद आपल्या नावावर केले आहे. आज होणाऱ्या सामन्यात विजय मिळविला तर ते पाचव्यांदा विजेतेपद असेल. त्याचप्रमाणे, गतविजेता गुजरात टायटन्स दुसऱ्यांदा विजेतेपद मिळविण्यासाठी मैदानात उतरेल.
तसेच, आयपीएलच्या सांगता समारंभात अनेक दिग्गज कलाकर स्टार्स सामील होणार आहेत. स्टार रणवीर सिंह आणि संगीतकार ए. आर. रहमान, रॅपर डिव्हाईन, गायक किंग, गायक जोनिता गांधी आणि न्यूक्लिया या सोहळ्याला उपस्थिती लावणार आहेत.