नाशिकनगरीतील सावरकरांचा लेखनाविष्कार

    27-May-2023
Total Views | 143
litterateur Historian Swatantryaveer Savarkar

‘सावरकरस्य वीरस्य चरितं लक्ष विस्तराम्।
एकैकाही कृतिस्तस्य महाविस्मयकारिणीम्॥’

प्रा. नौरे यांनी म्हटल्याप्रमाणे, सावरकरांच्या चरित्रातील त्यांची प्रत्येक कृती ही अद्वितीय आणि असामान्य आहे. सावरकर क्रांतिकारक, समाजसुधारक, देशभक्त तर होतेच, पण त्याचबरोबर ते एक प्रगल्भ लेखक, कवी, नाटककार आणि इतिहासकारही होते. त्यांच्या नाशिकमधील वास्तव्यातील लेखनाविष्काराचा या लेखात घेतलेला हा आढावा...

सावरकरांच्या लेखनाची सुरुवात ही त्यांच्या बालपणापासूनच झाली, असे म्हणायला हरकत नाही. असं म्हणतात की, वाचन माणसाला सगळ्याच दृष्टीने समृद्ध करत असतं. भगूरमध्ये असताना सावरकरांनी जे पुस्तक हाती पडलं ते वाचून पूर्ण केलं. वयाच्या ११व्या-१२व्या वर्षीच अगदी महाभारतापासून ते इतिहासाच्या निरनिराळ्या बखरी, काव्यसंग्रह, मासिके, चरित्रांपर्यंत त्यांनी अनेक पुस्तके वाचून काढली. एवढेच नव्हे, तर ‘केरळकोकीळ’, ‘गुराखी’, ‘केसरी’ यांसारखी अनेक वृत्तपत्रे ते वरचेवर वाचत असत आणि याच वाचनामुळे सावरकरांच्या लेखनामध्ये ‘राष्ट्रीय बाणा‘, ‘देशभक्ती‘, ‘स्वदेशी‘ या संकल्पनांचा प्रभाव जाणवत असावा.

खरंतर भगूरमध्ये शालेय शिक्षण घेत असतानाच, अप्रत्यक्षपणे सावरकरांच्या काव्यलेखनाची सुरुवात झालेली दिसते. सावरकरांना मराठ्यांच्या इतिहासाबद्दल आणि मराठी कवितांबद्दल पुरेसं ज्ञान असल्याने चौथी-पाचवीत असतानाच ते मराठ्यांच्या इतिहासावर ओव्या रचून दाखवत आणि त्याही साजेसं यमक असणार्‍या! म्हणजे ज्या वयात मराठीच्या पाठ्यपुस्तकातल्या कविता आपण पाठ करायचो, त्या वयात सावरकरांनी आपली काव्यलेखनाची पहिली पायरी पार केली. बालपणी सावरकरांनी लिहिलेल्या कविता, आर्या या शास्त्रशुद्ध नसल्या तरी त्यांच्या काव्यलेखनातला ताजेपणा, त्यांच्या अंतर्मनातली तळमळ आणि त्यांची काव्यकल्पना वाखाणण्याजोगी होती. भगूरच्या मराठी शाळेत पाच इयत्तांचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर सावरकरांचं पुढचं शिक्षण नाशिकच्या ’शिवाजी स्कूल’ या इंग्रजी शाळेत सुरू झालं. त्याकाळी नाशिकचं वातावरण राजकारणाच्या दृष्टीने फारसे चैतन्याचं नव्हतं आणि म्हणून साहजिकच सावरकरांचा भगूरकडेच ओढा होता.

भगूरच्या गणेशोत्सवाची सावरकरांवर अशी काही छाप पडली होती की, पुन्हा नाशिकला आल्यावर त्यांनी भगूरच्या गणेशोत्सवाचे वर्णन करणार्‍या आर्या वृत्तातल्या १३ कविता शब्दबद्ध केलेल्या आहेत. त्यावेळी सावरकरांना नाशिकचे ते वातावरण उदासीन वाटत असले तरी त्यांच्या बुद्धीचे तेज, काव्यलेखन कौशल्य या गोष्टी त्यांच्या शिक्षकांना भुरळ घालत होत्या. म्हणूनच सावरकरांनी त्या सुमारास लिहिलेला ’हिंदू संस्कृतीचा गौरव’ हा निबंध ’नाशिकवैभव’ या पत्राच्या दोन अंकात संपादकीय लेख म्हणून प्रकाशित झाला. खरंतर सावरकरांच्या स्फूर्तिदायक वक्तृत्व कौशल्याची सुरुवातसुद्धा नाशिकच्या वेगवेगळ्या वक्तृत्वाच्या चढाओढींपासूनच झाली. १८९७ साली चापेकर बंधूंनी रॅण्ड आणि आयर्स्ट यांची हत्या करून त्यावेळी होणार्‍या व्हिक्टोरिया राणीच्या राज्यारोहणाच्या हीरकमहोत्सवाच्या मर्मावर आघात केला.

त्यानंतरच्या सगळ्या घटनांचं सविस्तर वर्णन त्याकाळच्या वृत्तपत्रांमध्ये छापून येत असे. या घटनांचं वर्णन वाचून सावरकरांच्या बालमनावर निश्चितच या गोष्टीचा परिणाम होत होता. तेव्हाच ’चापेकरांचं कार्य कुणीतरी चालवणं अवश्य असेल, तर ते कार्य मीच का चालवू नये’ हा प्रश्न सावरकरांच्या मनात उद्भवू लागला. त्यावेळी आपल्या अस्वस्थ मनाला शांत करण्यासाठी सावरकर आपल्या घरातील्या अष्टभुजा देवीसमोर चित्त एकाग्र करून बसत असत. आपल्या मनातल्या अस्वस्थतेला वाङ्मयात रूपांतरित करण्याचं सावरकरांनी ठरवलं आणि चापेकर बंधूंवर एक ‘फटका‘ रचायला सुरुवात केली. सावरकर हा ‘फटका‘ लिहिताना इतके मग्न होत की, त्या तंद्रीत कधी कधी मध्यरात्रसुद्धा उलटून जात असे. १८९९ ला सावरकरांनी हा ‘फटका‘ लिहून पूर्ण केला. या ‘फटक्या‘त सावरकरांनी मोरोपंती वळणाचे प्रास, अनुप्रास, यमके या सगळ्यांचा साजेसा वापर केलेला आहे. याच सुमारास सावरकरांनी ’स्वदेशी कापड’ या शीर्षकाचा ‘फटका‘सुद्धा लिहून पूर्ण केला आणि तो पुण्याच्या ’जगदहितेच्छु’ या पत्रात प्रसिद्धही झाला.

एकीकडे इंग्रजी शाळेतून मुख्य शिक्षण घेत असताना दुसरीकडे मराठी व्याकरणाला धरून ‘फटक्या‘सारखा वाङ्मयाचा प्रकार सावरकरांनी बालपणी हाताळला तो ही ११४ चरणांचा! यावरूनच सावरकरांची शिक्षणाबाबत आणि लेखनाबाबतची तळमळ दिसते आणि मला असं वाटतं की, सावरकरांची ही तळमळ, त्यांचा लेखनाचा आणि शिक्षणाचा ध्यास आजच्या युवापिढीला आदर्श ठरणारा आहे. पुढे चापेकर बंधूंच्या प्रकरणातल्या काही घटनांचाही सावरकरांच्या मनोवृत्तीवर परिणाम झाला. ज्यावेळी एकीकडे चापेकर बंधूंसाठी वृत्तपत्रांमध्ये ‘माथेफिरू‘, ‘वेडा‘ असे शब्द वापरले जात होते, त्यावेळी दुसरीकडे सावरकरांनी टिळक, चापेकर आणि रानडे यांचा गौरव करणारे नाटक लिहायचे ठरवले. सावरकरांनी हे एक अंकी नाटक लिहून पूर्ण केल्यावर त्याचे प्रयोगही बसवले गेले. सावरकर पुन्हा नाशिकमध्ये आल्यावर त्यांनी कवी गोविंद यांच्यासोबत अनेक धार्मिक विषय वाङ्मयाच्या वेगवेगळ्या प्रकारातून मांडण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी सावरकरांची ’चुकलेले कोकरू’ ही कविता ’करमणूक’ या वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाली.

हे प्रभो हर्षविसि यासी।
परि मला रडत बसवीसी।
मम माता कां लपवींसी। अजुनि रे॥

’चुकलेले कोकरू’ या त्यांच्या कवितेच्या शेवटच्या चरणावरून सावरकरांची त्यांच्या आईविषयीची तळमळ व्यक्त होताना दिसते. सावरकरांनी सगळ्या ढंगाच्या कविता लिहिल्या त्याही व्याकरणाच्या नियमांना धरून. एवढंच नव्हे, तर सावरकरांनी 'The lady of the lake’चा मराठीत सारांशवजा भाषांतरही करण्याचा प्रयत्न त्या वयात केला. अर्थातच, सावरकरांचे मराठी भाषेवर जितके प्रभुत्व होतं, तितकचं इंग्रजी भाषेवरदेखील प्रभुत्व होतं, हे लक्षात येतं. पुढे सावरकरांनी पुण्याच्या ’जगदीतेच्छु’ या पत्रात बातमीपत्राचं लेखन केलं. जसजशी सावरकरांच्या काव्यलेखनाला प्रसिद्धी मिळत गेली, तसे काही लावणीवाल्यांनी सावरकरांकडून काही लावण्यांच्या रचना करून घेतल्या. १८९९ साली देशभक्तीच्या विचारांनी एकत्र येऊन सावरकर आणि त्यांच्या साथीदारांनी ’मित्रमेळा’ नावाची संस्था स्थापन करून, त्याद्वारे राष्ट्रभक्ती, राष्ट्रवीरांचे, धर्मवीरांचे उत्सव साजरे करण्याचे ठरवले. त्यावेळीसुद्धा सावरकरांनी विविध गेय लेखनप्रकारांचा वापर करून अनेक ऐतिहासिक आणि धार्मिक विषय हाताळले.

एकूणच काय, तर सावरकरांनी वयाच्या १६व्या वर्षापर्यंतच काव्यलेखनाचा पोवाडा, कविता, आर्या, अभंग, लावणी अशा एक ना अनेक प्रकारांना अगदी प्रामाणिकपणे आणि प्रभावीपणे हाताळले. अशाप्रकारे भगूर आणि नाशिकमध्ये शालेय शिक्षण घेत असतानाच सावरकरांच्या काव्यलेखनाची जोरदार सुरुवात झाली आणि त्यानंतर कवी, नाटककार, शाहीर, कादंबरीकार, निबंधकार, पत्रलेखक, चरित्रकार, आत्मचरित्र लेखक, व्याकरणकार, इतिहासकार, पत्रकार अशा विविध भूमिकांतून त्यांनी मराठी साहित्यात आपले मोलाचे योगदान दिले. खरोखरंच बालपणी सावरकरांकडे असणारी प्रतिभा, देशभक्ती, भाषेप्रती असणारा आदर, काव्यलेखन कौशल्य या गोष्टी आजच्या आमच्या युवा पिढीला आदर्श ठरणार्‍या आहेत.

रेणुका धुमाळ


अग्रलेख
जरुर वाचा
तुला घाबरण्याची गरज नाही..., शमीच्या लेकीने धुलीवंदन सण साजरा केल्याप्रकरणी मध्य प्रदेश मंत्र्याने पत्राद्वारे शमीला दिला धीर

"तुला घाबरण्याची गरज नाही...", शमीच्या लेकीने धुलीवंदन सण साजरा केल्याप्रकरणी मध्य प्रदेश मंत्र्याने पत्राद्वारे शमीला दिला धीर

Mohmmed Shami टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने उपवास सुरू असताना पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यादरम्यान ज्यूस प्यायल्याने त्याला एका मौलवीने इस्लामचा धर्म भ्रष्ट केल्याप्रकरणी टीका केली. उपवास सुरू असतानाही तो ज्यूस पित होता. त्याने उपवास पाळल्यावरून काही धर्मांधांनी त्याला धारेवर धरले. त्यानंतर आता त्याच शमीच्या लेकीने धुलीवंदन सणाचा आनंद घेतल्याने टीका करण्यात आली. यामुळे आता मध्य प्रदेशचे मंत्री विश्वास सारंग यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. कट्टरपंथींनी अनेक सीमा ओलांडल्या असल्याचे..