स्वा. सावरकर आणि नाशिकचे ऋणानुबंध...

    27-May-2023
Total Views |
Swatantryaveer Savarkar and nashik relation

स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नाशिकनगरी यांचे एक दृढ नाते आहे. नाशिक नगरी हे तीर्थक्षेत्र आहे, प्रभू श्री रामचंद्र यांच्या पदस्पर्शाने आणि वास्तव्याने पावन झालेली अशी ही भूमी आहे. तपोवन, रामकुंड, पंचवटी परिसर त्याचप्रमाणे अनेक मंदिरांनी हे शहर गजबजलेले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे क्रांतिकार्य हे नाशिकमध्येच खर्‍या अर्थाने सुरू झाले, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

दि. २२ जून, १८९७ मध्ये चापेकर बंधूंनी रँड आणि आयर्स्ट या ब्रिटिश अधिकार्‍यांचा गोळ्या घालून वध केला होता. पिसाळलेल्या ब्रिटिश सरकारने ‘प्लेग’च्या नावाखाली केलेली दडपशाही व हुकूमशाही अजूनच मोठ्या प्रमाणात सुरू केली. ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?’ असा प्रश्न करणार्‍या आणि चापेकर यांना क्रांतिकार्यासाठी प्रवृत्त करणार्‍या लोकमान्य टिळकांनाही कारावासात धाडण्यात आले. दररोज वृत्तपत्रांतून येणारा या सार्‍या घटनांचा व खटल्यांचा तसेच दामोदर आणि बाळकृष्ण चापेकर यांना फाशी दिल्याचा सविस्तर वृत्तांत विनायक नियमित वाचत होता आणि अस्वस्थ होत होता. आपण सुद्धा त्यांचे हे कार्य पुढे का चालवू नये, असे विचार त्याच्या मनात येऊ लागले होते आणि याच भावनेतून वीर विनायकाने आपली कुलदेवता अष्टभुजा देवीसमोर नतमस्तक होऊन शपथ घेतली. ती अशी की, “माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी मी सशस्त्र युद्धात शत्रूस मारीत चापेकारांसारखा मरेन किंवा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा विजयी होऊन मातृभूमीच्या मस्तकी स्वराज्याचा राज्याभिषेक करवेन.“

१८९८ मध्ये बाबाराव, तात्याराव सावरकर हे दोघे सावरकर बंधू नाशिकच्या तीळभांडेश्वर गल्ली येथील वर्तकांच्या वाड्यात वास्तव्यास आले. भगूर व तेथील इतर सर्व आजूबाजूच्या गावांमध्ये ‘प्लेग’ची महामारी सुरू झाली होती. नाशिकमध्ये तीळभांडेश्वर गल्लीमध्येच रामभाऊ दातार व वामन दातार या दातार बंधूंशी सावरकर बंधूंचा स्नेह निर्माण झाला होता. तेव्हा याच दातार बंधूंनी सावरकर कुटुंबीयांना नाशिकमध्येच वास्तव्यास येण्यास सांगितले. सुरुवातीला वर्तकांच्या वाड्यात राहणारे सावरकर कुटुंबीय नंतर तो वाडा सोडून दातारांच्या घरात वास्तव्य करू लागले. ही सर्व मंडळी राष्ट्रभक्ती व राष्ट्रप्रेम या राष्ट्रीय भावनेने भारावलेली होती. ‘आपला भारत देश या जुलमी व अत्याचारी ब्रिटिश राजवटीत अडकला आहे. भारतीय जनता भरडली जात आहे. आपण आपल्या परीने जमेल तशी सशस्त्र क्रांती करून इंग्रजांच्या विरोधात लढले पाहिजे,‘ असे या सर्वांचे ठाम मत होते. यातूनच नोव्हेंबर १८९९ मध्ये या सर्व मित्रांनी म्हणजेच सावरकर बंधू, दातार बंधू, वर्तक, चिपळूणकर, म्हसकर, पागे या सर्वांनी मिळून ‘राष्ट्रभक्त समूह‘ ही गुप्त संघटना स्थापन केली. याची प्रकट शाखा म्हणून दि. १ जानेवारी १९०० ला ‘मित्रमेळा’ या संस्थेची स्थापना केली. ‘मित्रमेळा’च्या बैठकांमध्ये तत्कालीन इंग्रज करत असलेले जुलूम-जबरदस्ती व अन्याय कृतींबाबत चर्चा केली जात असे. तसेच, त्या काळात नाशिकमध्येसुद्धा ‘प्लेग’ महामारी उद्भवली होती. तेव्हा याच ‘मित्रमेळ्या‘च्या सदस्यांनी मृत्युमुखी पडलेल्या त्या प्रेतांची अग्निसंस्काराची कार्ये केली.

आजारी माणसांचा विरह, नातलगांचा आक्रोश हे सर्व बघत असतानाच, या नातलगांना धीर देणे व त्यांची घरातील कामे करण्यासाठी व थोडीफार आर्थिक मदत करण्यासाठी ‘मित्रमेळ्या‘चे सदस्य नेहमीच पुढे असत. ‘स्वातंत्र्य हेच साध्य आणि सशस्त्र क्रांती हेच साधन’ हे ‘मित्रमेळ्या’चे ब्रीदवाक्य होते. ‘मित्रमेळ्या‘त जातीभेद नव्हता, शिवजयंती व गणेशोत्सव हे दोन्ही सण मोठ्या उत्साहाने ‘मित्रमेळा‘ समूहातर्फे नाशिकमध्ये साजरे केले जात. विनायक सावरकर हा तरुण मुलगा तेथीलच जवळील पिंपळाच्या पारावर उभा राहून देशाची सध्याची परिस्थिती आपल्या भाषणातून सांगत असे. ‘देश स्वतंत्र व्हावा, यासाठी सर्वांनी आपापसातील वैयक्तिक हेवेदावे विसरून राष्ट्रभक्ती हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून इंग्रजांविरोधात लढले पाहिजे,‘ असे हा तरुण विनायक सर्व नाशिककरांना सांगत असे. विनायकाची भाषणे ऐकण्यासाठी दुरून लोक नाशिकला येत असत. पिंपळपार परिसरामध्ये जमत असत. ‘स्वातंत्र्यलक्ष्मी की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, टिळक महाराज की जय’ अशा घोषणांनी हा संपूर्ण परिसर दुमदूमून जात असे. आबा दरेकर अर्थात कवी गोविंद हेसुद्धा पुढील काही काळातच ‘मित्रमेळ्या‘त येऊ लागले. सुरुवातीला लावणी, वग सवाल-जवाब इत्यादींचे लिखाण करून त्यावर आपला व आपल्या आईचा उदरनिर्वाह करणारा व पायाने अधू असणारा हा तरुण म्हणजेच आबा दरेकर सुरुवातीला सावरकरांची व त्यांच्या ‘मित्रमेळ्या‘ची टिंगलटवाळी करत असे. “अशी संस्था स्थापन करून किंवा एखादा समूह स्थापन करून, शपथा वगैरे घेऊन देश कधी स्वतंत्र होईल का??” असे तो थट्टेने बोलत असे. मात्र, एकदा सावरकरांनी “तू आमच्या बैठकांना येत जा आणि आम्ही तिथे काय चर्चा करतो ती ऐकत जा,“ असे त्यांना सांगितले.

कवी गोविंद एकदा तात्यारावांच्याच पाठीवर बसून ‘मित्रमेळ्या‘च्या कार्यालयात आला व पुढील काळात तो या सर्व बैठकीस उपस्थित राहू लागला. हळूहळू राष्ट्रप्रेम, स्वातंत्र्य, भारतमाता त्याचप्रमाणे १८५७चा उठाव देशात व परदेशात झालेली स्वातंत्र्ययुद्धे हे सर्व विषय तो आवडीने समजून घेऊ लागला, अभ्यासू लागला. परिसाचा स्पर्श लोखंडाला होतो, तेव्हा त्या लोखंडाचे सोने होते, असे नेहमी म्हटले जाते. अगदी असेच तात्याराव सावरकरांच्या सान्निध्यात आलेला हा आबा दरेकर आता राष्ट्रभक्तीने, राष्ट्रप्रेमाने भारून गेला होता. नाशिकमधील गंजमाळ परिसरात लावण्यांचे फड लागत. तेथे जाऊन लावण्या लिहिणारा हा आबा दरेकर आता सावरकरांनी सांगितल्याप्रमाणे राष्ट्रभक्तीच्या पुस्तकांचे वाचन करू लागला होता. “आबा, तुझ्या अंगी प्रतिभाशक्ती आहे. तुझी शक्ती तू राष्ट्रकार्यासाठी वापरलीस व तुझ्या लेखणीतून भारतमाता त्याचप्रमाणे भारतमातेचे आत्ताचे रूप समस्त देशाला समजेल, असे काव्य जर तुझ्या लेखणीतून लिहिले गेले, तर समस्त भारतीय पुढील काळात तुझे उपकार कधी विसरू शकणार नाहीत,“ असे तात्याराव एकदा त्यांना म्हणाले असता, खरोखरच आबा दरेकर तेव्हापासून राष्ट्रीय कविता व राष्ट्रीय लेख लिहू लागले. आबा दरेकर अर्थात स्वातंत्र्यकवी गोविंद यांनी रचलेली राष्ट्रविषयक पदे, वीर सावरकरांचे पोवाडे ठिकठिकाणी गायले जात असत.

व्याख्यानातून, मिरवणुकीतून स्वातंत्र्याच्या, स्वदेशाच्या, स्फूर्तीदायक संदेशावाचून इतर कुठलेही बोलणे-वागणे या तरुणाला आता अजिबात माहीत नव्हते. ‘मित्रमेळा‘च्या सदस्यांची संख्या व शाखांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली होती. याचवेळी वयाच्या १८व्या वर्षी एप्रिल महिन्यात १९०१ मध्ये तात्यारावांचं लग्न जव्हारच्या रामचंद्र त्र्यंबक अर्थात भाऊराव चिपळूणकरांची मुलगी यमुनाशी झालं. भाऊरावांनी आपल्या जावयाच्या महाविद्यालयीन शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली. लग्नानंतर मॅट्रिकच्या परीक्षेसाठी वीर सावरकर पुण्यात दाखल झाले. मॅट्रिकची परीक्षा देऊन १९०२ मध्ये त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि तेथेही समविचारी तरुणांना संघटित केले. १९०४ मध्ये सावरकरांनी नाशिकमध्ये देशस्वातंत्र्याची शपथ घेतलेल्या ‘मित्रमेळ्या‘च्या २०० सदस्यांचा मेळावा भरवला. या मेळाव्यातच गुप्त क्रांतिकारक संघटनेचे नामकरण ‘अभिनव भारत’ असे करण्यात आल. इटलीचा जोसेफ मॅझिनी यांच्या ‘यंग इटली’ या संस्थेच्या धर्तीवर हे नाव दिले गेले होेते. हातात पुरेसे चाकू नसलेली १००-२०० मूलं तरुण सावरकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रभक्ती व स्वातंत्र्यप्राप्ती या हेतूने व उद्देशानेच एकत्र आली होती. हळूहळू ‘अभिनव भारत‘च्या शाखांचे जाळे भारतभरच नव्हे, तर देशभर पसरले.

१९०४ मध्ये वीर सावरकर ‘एलएलबी’च्या पहिल्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. ऑक्टोबर १९०५ मध्ये त्यांनी पुण्यात परदेशी कपड्यांची होळी केली आणि अवघ्या महाराष्ट्रानेच नव्हे, तर अवघ्या देशाने या कृतीचे कौतुक व समर्थन केले. यानंतर वीर सावरकर यांनी ओळखले होते की, भारताला स्वातंत्र्य हवे आहे, हे आपल्यावर राज्य करणार्‍या ब्रिटिशांना कळावं, सार्‍या जगाला कळावं, आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचावं ही वीर सावरकर यांची इच्छा होती. लंडनमध्ये येणार्‍या इतर देशांच्या क्रांतिकारकांना त्यांना भेटायचं होतं, शस्त्रे जमवायची होती, बॉम्ब तयार करायची कृती मिळवायची होती व पुढेही शस्त्रे व हे बॉम्ब बनवायची कला भारतातील आपल्या सहकार्‍यांपर्यंत पोहोचवायची होती आणि म्हणूनच ते लंडनला गेले. इकडे नाशिकमध्ये एकदा एका शेतकर्‍यास विल्यम नावाच्या अधिकार्‍याने खूप मारले. त्याच्या पोटात लाथा मारल्याने त्याच्या यकृताला जबर दुखापत झाली व पुढे दोन दिवसांत तो शेतकरी मृत्यू पावला. नाशिकच्या बाबासाहेब खरे या वकिलांनी या विरोधात आवाज उठवला आणि विल्यमविरूद्ध अभियोग भरावा लागला. पण, याचा काही उपयोग झाला नाही. ‘रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळेना’ ही कविता आबा दरेकर अर्थात स्वातंत्र्यकवी गोविंद यांनी लिहिली होती आणि बाबाराव सावरकरांनी ही कविता छापून ‘अभिनव भारत’ संघटनेच्या सदस्यांना तसेच नाशिकमधील सर्व तरुणांना वाटली होती व घरोघरी त्या कवितेचे वाटप केले होते. ही घटना इंग्रजांनी लक्षात ठेवली होती.

दि. २१ डिसेंबर, १९०९ रोजी नाशिकच्या विजयानंद नाट्यगृहात किर्लोस्कर मंडळींचा ‘शारदा’ नाटकाचा प्रयोग बघण्यासाठी नाशिकचा क्रूर जिल्हाधिकारी जॅक्सन आला होता. अनंत कान्हेरे, कृष्णाजी कर्वे, विनायक देशपांडे या तीन तरुणांनी जॅक्सनचा वध करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सर्व नियोजित कट करून अनंत कान्हेरे या १७ वर्षीय युवकाने जॅक्सनचा गोळ्या घालून वध केला. यानंतर नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात ‘अभिनव भारत’च्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू झाली. नाशिकच्या अनेक तरुणांना या काळात अटक करण्यात आली व अत्यंत जुलूम-जबरदस्ती करून त्यांना कारागृहात बंदिस्त ठेवण्यात आले होते. अनंत कान्हेरेला दिलेले पिस्तुल हे लंडन येथून सावरकरांनीच पाठवले आहे, असा आरोप इंग्रजांनी केला व सावरकरांना अटक झाली.

तत्पूर्वी ‘रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळेना’ ही कविता केवळ छापली म्हणून बाबाराव सावरकरांना ‘अभिनव भारत‘ मंदिर, तिळभांडेश्वर गल्ली येथून नाशिकच्या सेंट्रल जेलपर्यंत अत्यंत अपमानास्पद वागणूक देऊन हातापायात बेड्या, तोंडाला काळे फासून बाबाराव सावरकर यांची धींड काढण्यात आली होती. नाशिकमध्ये ‘वंदे मातरम्’चा जयघोष केला म्हणून अनेक तरुणांना बेदम मारहाण करण्यात आली होती. या सर्वांचा बदला म्हणून अनंत कान्हेरेने जॅक्सनचा वध केला होता. यानंतर सावरकरांना अटक झाली. पुढे अंदमान येथे काळ्यापाण्याची शिक्षा देण्यात आली. यानंतर ११ वर्षे अंदमानात शिक्षा भोगल्यानंतर पुढे सावरकर बंधूंची सुटका झाली व त्यांना १३ वर्षे रत्नागिरीत स्थानबद्ध करण्यात आले. पुढे दि. १५ ऑगस्ट, १९४७ रोजी आपला देश स्वतंत्र झाला.

दि. १० ते १२ मे, १९५२ मध्ये ‘अभिनव भारत’ संघटनेचा सांगता समारंभ पुण्याच्या एसपी कॉलेज येथे मोठ्या उत्साहात पार पडला. दि. १० मे, १९५३ या दिवशी वीर सावरकरांनी नाशिकला ‘अभिनव भारत मंदिरा‘ची स्थापना केली. ‘एक धक्का ओर दो पाकिस्तान तोड दो’ ही ऐतिहासिक घोषणा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी नाशिक येथेच दिली होती. या दरम्यान नाशिकच्या सावरकरप्रेमींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची जंगी मिरवणूक काढली. वाद्यांच्या गजरात, फुलांच्या वर्षावात, गुलालाच्या उधळणीत ‘स्वातंत्र्यलक्ष्मी की जय, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विजय असो’ या घोषणांनी अवघे नाशिक दुमदूमून गेले. मिरवणूक ‘अभिनव भारत मंदिर‘ या वास्तूत आली.

सावरकर व सर्व नाशिककर जनतेने येथे प्रवेश केला. नगरपालिकेच्यावतीने आयोजित समारंभात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केल्यावर नाशिकच्या ‘अभिनव भारत मंदिर‘ या वास्तूत सावरकरांनी स्वातंत्र्यलक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना केली होती. या देवीच्या चारही हातांमध्ये शस्त्रे आहेत. देवीच्या या स्वरूपाचं पूजन, ध्यान, मनन, चिंतन प्रत्येक भारतीयाने करावं, असे सावरकर यावेळेस म्हणाले होते. त्याचप्रमाणे याच वास्तूमध्ये १८५७च्या समरात ज्या वीरांनी हौतात्म्य पत्करलं अशा क्रांतिकारकांच्या आत्म्यांना शांती मिळावी व त्यांचे स्मरण कायम नवीन पिढीला व्हावे, या हेतूने सावरकरांनी एका तुळशी वृंदावनाची स्थापना केली. सावरकरांनी दि. ११ मे, १९५३ ला आपल्या जन्मगाव भगूर येथे आपल्या अष्टभुजा देवीचे दर्शन घेतले. आपल्या जन्मघराचे दर्शन घेतलं आणि तिथे भव्य व विराट अशी सभा झाली. यानंतर मात्र स्वातंत्र्यवीर सावरकरांचे येणे नाशिक व भगूर येथे कधी झाले नाही.

प्रसाद धोपावकर


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.