स्वातंत्र्यवीर सावरकरांनी युवावस्थेत आपल्या क्रांतिकार्याचा आरंभ पुण्यातूनच केला. परंतु, भगूरच्या सावरकरांचे सुपुत्र विनायक हा शालेय जीवनापासूनच चळवळ्या वृत्तीचा मुलगा. १९०१ मध्ये ते मॅट्रिक झाले व उच्च शिक्षणासाठी १९०२ मध्ये विनायक सावरकर पुण्यात दाखल झाले. तेव्हा, या पुण्यनगरीतील सावरकरांच्या कार्याचा आढावा घेणारा हा लेख...
पुण्यनगरीत स्वातंत्र्य चळवळीतील बरीच व्यक्तिमत्वे कार्यरत होती. १९०२ मध्ये न्यायमूर्ती रानडे यांचे निधन झाले होते. त्यावेळेला गोपाळ कृष्ण गोखले फर्ग्युसन कॉलेजमधून निवृत्त होणार होते. लोकमान्य टिळक यांच्या रूपात क्रांतिकारक आणि स्वातंत्र्यप्रेमींना आश्वासक नेतृत्व दिसत होते व याच काळामध्ये स्वा. विनायक दामोदर सावरकर पुण्यातल्या फर्ग्युसन महाविद्यालयामधे दाखल झाले.भारताचा ब्रिटिश व्हॉईसरॉय लॉर्ड कर्झन याने दि. २० जुलै, १९०५ मध्ये बंगालची फाळणी केली. धर्माच्या आधारावर भारताचे तुकडे करणे, ही कल्पना भारतीय स्वातंत्र्यसैनिकांना मुळीच पटली नाही. बंगालच्या फाळणीनंतर स्वदेशी चळवळ भारतभर सुरू झाली. भारतभर असंतोषाची लाट उसळली. बंगालमध्ये ’संजीवनी’ या नियतकालिकातून १८८३ मध्ये परदेशी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन क्रिशाकुमार मित्रा यांनी केले.
परदेशी वस्तूंचा वापर न करता, स्वदेशीवर भर देऊन भारतीय उद्योगाला चालना देण्याचा नारा महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने लोकमान्य टिळकांनी दिला.भारतीयांना स्वतःच्या फायद्यासाठी वापरणे, त्यांच्या संस्कृती व परंपरांचा आदर न करणे आणि आता हिंदूराष्ट्राची धर्माच्या आधारावर फाळणी करणे, या गोष्टी सावरकरांना डाचत होत्या. टिळकांचा स्वदेशीचा हा नारा पुढे सावरकरांनी प्रामुख्याने विद्यार्थी आणि युवकांसाठी दिला. विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी ते प्रयत्नरत होते. विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून सावरकरांनी अनेक युवकांना स्वातंत्र्य आणि क्रांती यासाठी जागृत केले, अनेकांच्या विचारांना दिशा दिली.
त्यांनी फर्ग्युसन कॉलेजमधील विद्यार्थ्यांचे संघटन केले. भारतीय मूल्यांचा, संस्कृतीचा आणि विचारांचा प्रचार-प्रसार केला. विद्यार्थी संघटनांमधून त्यांनी ’आर्यन’ या साप्ताहिकाची सुरुवात केली. ज्यात त्यांनी भारतीय संस्कृती, इतिहास व राष्ट्रीय मूल्यांबद्दल प्रभावी लेखन केले. या हस्तलिखित साप्ताहिकात त्यांचा ’सप्तपदी’ हा सुप्रसिद्ध लेख सर्वांसमोर आला. या लेखात एखाद्या राष्ट्राच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या सात महत्त्वाच्या पायर्यांबद्दल त्यांनी चिंतन मांडलेले आहे.
इतक्या लहान वयामध्ये लिहिलेला हा लेख त्यांच्या अभ्यासू वृत्तीचा आणि प्रगल्भ बुद्धिमत्तेचा नमुनाच आहे. नेदरलॅण्ड्स, इटली, अमेरिका येथील क्रांतीबद्दल त्यांचा विशेष अभ्यास होता. फक्त इतिहास, राजतंत्र व संस्कृतीच नव्हे, तर सावरकरांनी साहित्य व भाषेचादेखील अभ्यास केला होता. भवभूती, कालिदास, शेक्सपियर, मिल्टन, वर्ड्सवर्थ अशा प्रसिद्ध साहित्यकारांच्या साहित्यकृतींचा अभ्यास करून त्यांनी स्वतःची भाषा अतिशय प्रभावी बनवली होती.फक्त लेखनच नव्हे, तर सावरकर आपल्या प्रभावी वक्तृत्वानेदेखील विद्यार्थी व शिक्षक दोघांनाही भारतीय मूल्यांचे महत्त्व पटवून देत असत. वीर तानाजी व बाजीप्रभू देशपांडे यांच्या जीवनावर आधारित प्रभावी, जोशपूर्ण पोवाडे सावरकरांनी लिहिले. आपल्या मित्र व सहकार्यांनाही ते गायनासाठी प्रोत्साहित करत असत.विद्यार्थी व युवकांच्या साहाय्याने भारतात स्वतंत्रतेची मोठी क्रांती होऊ शकते. देशाच्या उद्धारासाठी, प्रगतीसाठी युवकांची महत्त्वाची भूमिका असते, हे वेळोवेळी ते सर्वांना पटवून देत होते. सावरकरांच्या या प्रोत्साहनामुळे बर्याच विद्यार्थ्यांमध्ये स्वातंत्र्यप्रेमाची ज्योत पेटून उठली.
या चळवळ्या, देशप्रेमी विद्यार्थ्यांच्या टोळीने दि. ७ ऑक्टोबर, १९०५ मध्ये पुण्यात भारतातली पहिली विदेशी कपड्यांची होळी पेटवली. लोकमान्य टिळक व शिवरामपंतांच्या उपस्थितीत पुण्यातल्या लकडी पुलाजवळ भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी व भारतीय सामान्यांच्या हक्कासाठी सावरकरांनी आपल्या विद्यार्थी संघटनेसह विदेशी वस्तूंवर व कपड्यांवर बहिष्कार टाकायचा नारा दिला. विद्यार्थ्यांच्या मनामनात सावरकरांनी पेटवलेली ही ज्योत दूरवर पसरली.सावरकरांना फर्ग्युसन कॉलेजमधून व विद्यार्थी वसतिगृहातून निलंबित करण्यात आले. शिवाय, दहा रुपयांचा दंडदेखील ठोठावण्यात आला. अशा तर्हेने महाविद्यालयातून निलंबित झालेले स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर हे पहिले भारतीय विद्यार्थी ठरले.टिळक हे सावरकरांचे प्रमुख प्रेरणास्थान होते. टिळकांनी सावरकरांच्या नेतृत्व गुणांचे आणि धाडसी वृत्तीचे महत्त्व ओळखले. ते खंबीरपणे सावरकरांच्या पाठीशी उभे राहिले. सर्व समस्यांवर मात करत सावरकरांनी आपले फर्ग्युसनमधले पदवीचे शिक्षण पूर्ण केले.
टिळकांनी त्यांना उच्चशिक्षणासाठी शिष्यवृत्तीदेखील मिळवून दिली. या शिष्यवृत्तीच्या जोरावर सावरकर लंडनमध्ये शिकायला गेले. तिथूनही त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी चळवळ सुरूच ठेवली. ब्रिटिशांनी तिथून सावरकरांना अटक केली व जहाजाद्वारे भारतात परत आणण्याची तयारी केली. वाटेत फ्रान्समध्ये मार्सेलिस बंदरावर जहाज उभे असताना सावरकरांनी समुद्रात उडी मारली व किनार्यावरच्या अधिकार्यांकडे फ्रान्समध्ये राजकीय संरक्षण द्यावे, अशी मागणी केली. परंतु, त्या अधिकार्यांना याचे काही महत्त्वच कळले नाही. त्यांनी सावरकरांना परत ब्रिटिशांच्या ताब्यात दिले. नंतर जेव्हा फ्रान्स सरकारला याबद्दल कळले तेव्हा त्यांनी ब्रिटिश सरकारविरूद्ध मोठी केस लढवली.फ्रान्समधून परत आणल्यावर ब्रिटिशांनी सरकारच्या विरोधात काम केल्याबद्दल सावरकरांवर खटला दाखल केला. ’अभिनव भारत’ या संस्थेतर्फे क्रांतिकारकांना मदत केल्याबद्दल सावरकरांवर गंभीर आरोप करण्यात आले. त्या खटल्यानंतर सावरकरांना अंदमानमधल्या कुप्रसिद्ध सेल्युलर जेलमध्ये ठेवण्याची शिक्षा देण्यात आली.
सावरकर पुण्यात खरेतर फार काळ राहिले नव्हते. पण, त्यांच्या पुण्यातील युवक जागृतीच्या कार्याची चर्चा वणव्यासारखी दूरवर पसरली. युवकांमध्ये देश घडवण्याची शक्ती आहे, असे मत स्वामी विवेकानंदांनीदेखील स्पष्टपणे व्यक्त केले आहे. ‘उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्नि बोधत।‘ हे कठोपनिषदातले तत्त्व सावरकरांनी प्रत्यक्षात आचरणात आणले. अगदी शालेय पातळीपासून महाविद्यालयात शिकणार्या विद्यार्थ्यांपर्यंत सावरकरांनी भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःचे योगदान देण्यास विद्यार्थ्यांना उद्युक्त केले. त्यांचा विद्यार्थ्यांवरचा हा विश्वास आजदेखील युवकांना प्रोत्साहित व प्रबोधित करणारा आहे.या महान स्वातंत्र्यवीराच्या स्मरणार्थ पुण्यात कर्वे रोड येथे सावरकर स्मारक आणि अध्यासन केंद्र स्थापन केले आहे. दि. १० एप्रिल रोजी ‘सावरकर गौरव यात्रा‘ आयोजित करण्यात आली होती. मुसळधार अवकाळी पाऊसदेखील या गौरवयात्रेत सहभागी झाला. पावसाची पर्वा न करता हजारो युवकांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना आदरांजली वाहिली. फर्ग्युसन कॉलेजमधील मुलांच्या वसतिगृहातल्या ब्लॉक १- खोली क्र. १७ मध्ये सावरकरांचे, त्यांच्या कार्याचे, विचारांचे व योगदानाचे स्मरण केले जाते. असे हे पुणे शहर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पदस्पर्शाने पावन झाले आहे.