जागर सावरकर विचारांचा...

    27-May-2023
Total Views | 91
Maharashtra State Tourism Minister Mangalprabhat Lodha on V D Savarkar

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनकार्याबद्दल आपल्या भविष्यातील पिढ्यांना माहिती व्हावी, यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाच्या माध्यमातून दि. २१ मे ते २८ मेच्या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात ‘वीरभूमी परिक्रमा’ याअंतर्गत ‘स्वातंत्र्यवीर सावरकर विचार जागरण सप्ताह’ आयोजित करण्यात आला आहे. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पदस्पर्शाने महाराष्ट्रातील पावन झालेली शहरे ‘वीर सावरकर सर्किट’अंतर्गत पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाने एक कार्यक्रम हाती घेतला आहे. यानिमित्ताने स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावेत हाच मूळ उद्देश...

महाराष्ट्राने देशाला जी रत्ने दिली, मातृभूमीच्या रक्षणासाठी लढणारी आणि देशाचं नाव विश्वात मोठं करणारी जी काही मान्यवर मंडळी महाराष्ट्रात होऊन गेली, त्या सर्वांमध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. वीर सावरकर हे केवळ एक व्यक्ती नव्हे, तर तो एक विचार आहे. देशप्रेमासह विविध अंगी कर्तृत्वाने मातृभूमीची सेवा करणारे वीर सावरकर हे आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान आहेत. देशभक्ती, स्वदेशीचा पुरस्कार, प्रखर क्रांतिकारक म्हणून केलेले कार्य, विज्ञाननिष्ठ व्यक्तिमत्व, तर्कसिद्ध हिंदुत्वाचा भाष्यकार, संघटन कौशल्य, समाजाप्रती आग्रही भूमिका घेणारे समाजसुधारक, इतिहासकार, नवनवीन शब्द देऊन मराठी भाषेला समृद्ध करणारे भाषातज्ज्ञ, भविष्याची रूपरेषा ओळखणारा राजकारणी, ओजस्वी वक्ते आणि प्रतिभाशाली साहित्यिक अशा अनेक गुणांच्या माध्यमातून आपले संपूर्ण जीवन केवळ धर्म, मातृभूमी आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी झोकून देणार्‍या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज जयंती.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे महाराष्ट्राचे सुपुत्र आणि त्यांनी केलेल्या देशसेवेचा भाग म्हणून आपण सर्वजण देशाला मिळालेले स्वातंत्र्य आज अनुभवतो आहोत, याचा सार्थ अभिमान वाटतो. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनकार्याबद्दल आपल्या भविष्यातील पिढ्यांना माहिती व्हावी, यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाच्या माध्यमातून दि. २१ मे ते २८ मेच्या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात ‘वीरभूमी परिक्रमा’ याअंतर्गत ’स्वातंत्र्यवीर सावरकर विचार जागरण सप्ताह’ आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने वीर सावरकरांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावेत हाच मूळ उद्देश...

“सावरकर माने तेज, सावरकर माने त्याग, सावरकर माने तप, सावरकर माने तत्व, सावरकर माने तर्क, सावरकर माने तारुण्य, सावरकर माने तीर, सावरकर माने तलवार, सावरकर माने तिलमिलाहट... सागरा प्राण तळमळला, तड़फड़ाती हुई आत्मा, सावरकर माने तितिक्षा, सावरकर माने तीखापन, सावरकर माने तिखट। कैसा बहुरंगी व्यक्तित्व!” अशा शब्दांत देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. कारण, वीर सावरकर खरे तर एक युगपुरुष होते. वीर सावरकरांनी त्यांच्या जीवनकार्यात आपल्या साहित्यातून, लिखाणातून हिंदू धर्माबाबतचे विचार वेळोवेळी मांडले. वीर सावरकर जगातील पहिले असे कवी आहेत, ज्यांनी अंदमानच्या बंदिवासात असताना भिंतींवर कोळशाने कविता लिहिल्या आणि त्या पाठ केल्या. पाठ केलेल्या अशा दहा हजार ओळी त्यांनी तुरुंगातून सुटल्यावर पुन्हा लिहिल्या. त्यामुळे त्यांचे बुद्धीचातुर्य आणि कौशल्य याची कोणीही बरोबरी करू शकत नाही.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पदस्पर्शाने महाराष्ट्रातील अनेक ठिकाणे पावन झालेली आहेत. त्यांनी रत्नागिरी, मुंबई, पुणे, नाशिक अशा ठिकाणी वास्तव्य केले. ही सर्व शहरे ‘वीर सावरकर सर्किट‘अंतर्गत पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाने एक कार्यक्रम हाती घेतला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जन्मभूमी असलेल्या भगूरमध्ये भव्य थीम पार्क आणि संग्रहालय बांधण्यात येणार आहे. सामाजिक समरसतेचे प्रतीक अधोरेखित करत असताना, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी रत्नागिरी येथे हिंदू समाजाच्या एकतेचा आणि सर्वसमावेशक हिंदुत्वाचा पाया रचला. त्यांनी याठिकाणी सर्व जातीच्या हिंदूंना मुक्त प्रवेश असलेले पतितपावन मंदिर उभारले आणि मुलींसाठी शाळाही सुरू केली. अंदमाननंतर येथील कारागृहात त्यांनी दोन अडीच वर्षे कारावास भोगला. तसेच, १३ वर्षे स्थानबद्धतेची शिक्षा भोगली. याठिकाणी देखील माहिती फलकासह पर्यटकांना वीर सावरकर यांच्या जीवनकार्याची माहिती करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

‘हे मातृभूमी तुजसाठी मरण ते जनन, तुजविण जनन ते मरण‘ म्हणत आयुष्यभर मातृभूमीची सेवा करणार्‍या स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थान भगूर आणि नाशिकमध्ये त्यांच्या क्रांतिकारी उपक्रमांची सुरुवात आणि ‘अभिनव भारत’ची स्थापना झालेली आहे. वीर सावरकरांचे थोरले बंधू बाबाराव सावरकर हे काही काळ सांगली येथे वास्तव्यास होते आणि तेथेच त्यांचे निधन झाले. याठिकाणी त्यांचे स्मारक आहे. वीर सावरकर महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुण्यात वास्तव्यासाठी होते आणि परदेशी उत्पादनांवर बहिष्कार टाकण्यासाठी परदेशी कपड्यांची होळी याच ठिकाणी करण्यात आली होती. त्याचप्रमाणे आयुष्याच्या शेवटच्या काळात वीर सावरकर मुंबईत वास्तव्याला होते. वैचारिक आणि साहित्यिक दृष्टिकोनातून विचार करताना त्यांनी अनेक प्रकारचे साहित्य याच ठिकाणी मांडले. ‘सावरकर सदन‘ मध्ये त्यांनी आत्मर्पण केले. त्यामुळे रत्नागिरी, पुणे, सांगली, नाशिक आणि मुंबई या पाच स्थानावर ’स्वातंत्र्यवीर सावरकर विचार जागरण सप्ताह’च्या कालावधीत विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते आणि यापैकी काही कार्यक्रमांना उपस्थित राहून, वीर सावरकरप्रेमी व्यक्तींचे विचार ऐकण्याचे भाग्य मला या काळात लाभले आहे.

या काळात वीर सावरकर अभिवादन यात्रा, लिटरेचर फेस्टिव्हल, गीत वीर विनायक, ‘वीरता पुरस्कार’ वितरण, महानाट्य सादरीकरण, कौतुक सोहळा, कीर्तनसेवा असे कार्यक्रम सादर करण्यात आले. यावेळी वीर सावरकर यांचे विचार सर्वसामान्य नागरिकांपर्यंत आणि आपल्या भावी पिढ्यांपर्यंत पोहोचावेत, हाच एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवण्यात आला होता. स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची आरती वीर सावरकरांनी लिहिली होती. त्यांच्या लेखणीतून असे अनेक विषय कागदावर उतरले होते. त्यामुळेच भारत देशाच्या आधुनिक इतिहासातील एक सुवर्णपान म्हणून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर म्हणजेच आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान वीर सावरकर यांचा उल्लेख केला जातो.

देशासाठी क्रांतिकार्य करत असताना त्यांना मृत्यूची कधीही भीती वाटली नाही. ‘मृत्यू हा माझा दास आहे,‘ असे ते म्हणत असत. ‘अनादि मी, अनंत मी, अवध्य मी भला, जिंकील रिपू कोण ऐसा जगती जन्मला’ असे ते आपल्या काव्यात्म भाषेत म्हणत असत. त्यामुळेच अशा महान युगपुरुषाला अभिवादन करण्याच्या हेतूने, पर्यटन विभागाच्या माध्यमातून ’स्वातंत्र्यवीर सावरकर विचार जागरण सप्ताह’चे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये अनेकांनी आपला सहभाग नोंदवला व वीर सावरकरांच्या विचारांना जागृत केले. येणार्‍या काळात अधिक मोठ्या स्तरावर वीर सावरकर यांचे विचार पोहोचवण्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे.

मंगलप्रभात लोढा
(लेखक महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, महिला व बालविकास, कौशल्य व रोजगार मंत्री आहेत.)


अग्रलेख
जरुर वाचा
तुला घाबरण्याची गरज नाही..., शमीच्या लेकीने धुलीवंदन सण साजरा केल्याप्रकरणी मध्य प्रदेश मंत्र्याने पत्राद्वारे शमीला दिला धीर

"तुला घाबरण्याची गरज नाही...", शमीच्या लेकीने धुलीवंदन सण साजरा केल्याप्रकरणी मध्य प्रदेश मंत्र्याने पत्राद्वारे शमीला दिला धीर

Mohmmed Shami टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने उपवास सुरू असताना पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यादरम्यान ज्यूस प्यायल्याने त्याला एका मौलवीने इस्लामचा धर्म भ्रष्ट केल्याप्रकरणी टीका केली. उपवास सुरू असतानाही तो ज्यूस पित होता. त्याने उपवास पाळल्यावरून काही धर्मांधांनी त्याला धारेवर धरले. त्यानंतर आता त्याच शमीच्या लेकीने धुलीवंदन सणाचा आनंद घेतल्याने टीका करण्यात आली. यामुळे आता मध्य प्रदेशचे मंत्री विश्वास सारंग यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. कट्टरपंथींनी अनेक सीमा ओलांडल्या असल्याचे..