‘इतिहास कट्टा : गप्पा इतिहासाच्या, गोष्टी माणसांच्या’

    16-May-2023
Total Views | 86
sashti

भारतीय इतिहास संकलन समिती कोकण प्रांत बोरिवली भाग व बोरिवली सांस्कृतिक केंद्राच्यावतीने बोरिवलीच्या एक्सर येथील वनविहार उद्यान येथे रविवार, दि. १४ मे रोजी ‘इतिहास कट्टा: गप्पा इतिहासाच्या, गोष्टी माणसांच्या’ या मासिक गप्पांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना लेखिका, इतिहास संशोधक व डोंबिवलीच्या पेंढरकर महाविद्यालयाच्या माजी प्राचार्य डॉ. अनुराधा रानडे म्हणाल्या की ”प्राचीन काळी साष्टीच्या परिसरातील कल्याण, सोपारा व चौल ही भारतातील आंतरराष्ट्रीय व्यापाराची महत्त्वाची बंदर होती.” इतिहास कट्ट्यावर गेल्या सहा महिन्यांहून अधिक काळ सुरू असलेल्या ‘साष्टीच्या गोष्टीच्या’ पहिल्या पर्वातील सातवी गोष्ट : ‘अल्याड साष्टी-पल्याड कल्याण : प्राचीन व्यापारी इतिहास’ या विषयावर तेथे जमलेल्या इतिहासप्रेमी श्रोत्यांशी दृकश्राव्य पद्धतीने संवाद साधत त्या बोलत होत्या.

त्यांच्या या गप्पांच्या कार्यक्रमात त्या पुढे म्हणाल्या की, “कोणत्याही प्रांतातील समाजाच्या आणि संस्कृतीच्या उत्कर्षाचा एक महत्त्वाचा बिंदू असतो व्यापार. जेवढा मोठा व्यापार तेवढीच मोठी अर्थव्यवस्था, तेवढेच प्रगतशील जीवन आणि तेवढाच सामाजिक विकास. प्राचीन काळी भारताचा पश्चिम किनारपट्टीवरून पाश्चात्य देशांशी ग्रीस, रोम, इजिप्त, इराण, आणि अरब देशांशी समुद्रमार्गे चालणारा व्यापार भरभराटीस आला होता. साष्टीच्याबाबत सांगायचे झाले, तर प्राचीन काळी तिच्या भोवतालची सोपारा, चौल आणि कल्याण ही बंदरे आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी प्रसिद्ध होती. साष्टीच्या विकासात या तीनही बंदरांचा मोठा वाटा होता. कल्याण हे तर उत्तर कोकणातील प्रमुख व्यापारी केंद्र होते.

शिवाय, समुद्रापासून बरेचसे आत उल्हास आणि काळू नद्यांच्या संगमाजवळ असल्यामुळे ते अधिक सुरक्षित होते. ”आपल्या गप्पांचा समारोप करताना, डॉ. अनुराधा रानडे असे म्हणाल्या की, “दख्खन आणि पश्चिमी देशांत चालत असलेल्या आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या साखळीतील कल्याण ही एक महत्त्वाची कडी होती. दख्खनच्या आयात-निर्यातीचे अनेक व्यापारी मार्ग कल्याणहून पुढे सोपारा बंदराकडे जात ते मुख्यत: उल्हास नदीतून. या व्यापार आणि दळणवळणात, उल्हास नदीपल्याड असलेली साष्टी आणि व्यापाराने गजबजलेले कल्याण हे भरभराटीला आलेले नगर होते. विविध धर्मपंथांना इथले धनिक व्यापारी, व्यावसायिक, शेतकरी, अधिकारी भरभरून दाने देत. त्यामुळे कल्याण नगर व्यापाराबरोबरच संस्कृतीचेही आश्रयदाते होते.”

याप्रसंगी भारतीय इतिहास संकलन समितीच्या कोकण प्रांताचे उपाध्यक्ष, इतिहास अभ्यासक रविराज पराडकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व डॉ. अनुराधा रानडे यांच्या इतिहास संशोधन क्षेत्रातील कार्याचा विस्तृत परिचय करून दिला, तर भारतीय इतिहास संकलन समितीच्या बोरिवली भागाचे अध्यक्ष सुरेंद्र तन्ना व बोरिवली सांस्कृतिक केंद्राचे अध्यक्ष तरुणभाई मोटा यांच्या हस्ते इतिहास कट्ट्याचे स्मृतिचिन्ह देऊन डॉ.अनुराधा रानडे यांचे स्वागत केले. तसेच, या प्रसंगी विशेष उपस्थित असलेले कच्छ युवक संघाचे संस्थापक व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कोमलभाई छेडा यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. बोरिवली सांस्कृतिक केंद्राचे पदाधिकारी, प्रायोजक जनसेवा केंद्र व बोरिवलीतील इतिहासप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे मीडिया पार्टनर ‘व्हिजनरी स्टुडियोज’ यांनी कार्यक्रमाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले, तर इतिहास संकलन समिती बोरिवलीचे कार्यवाह ललित पवार यांनी आभार प्रदर्शन केल्यानंतर कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक व दिल्ली येथील अखिल भारतीय इतिहास संकलन योजनेचे संस्थापक हरिभाऊ वझे यांच्या बेळगाव येथे नुकत्याच झालेल्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना तेथे उपस्थितांनी श्रद्धांजली वाहिली.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121