श्री क्षेत्र जोतिबाचे दर्शन घेऊन मानाच्या सासनकाठीचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडून पूजन
05-Apr-2023
Total Views | 53
23
कोल्हापूर : जिल्ह्यातील श्री क्षेत्र जोतिबा (वाडी रत्नागिरी) येथे जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेनिमित्त पालकमंत्री दीपक केसरकर यांनी श्री जोतिबाचे सपत्नीक दर्शन घेऊन पूजा केली. यावेळी त्यांच्या हस्ते सातारा जिल्ह्यातील निनाम पाडळी येथील सासन काठी क्र. १ या मानाच्या सासन काठीचे पुजन करण्यात आले.
यावेळी त्यांच्यासमवेत राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, माजी सहकार मंत्री आमदार बाळासाहेब पाटील, माजी पालकमंत्री आमदार सतेज पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव सुशांत बनसोडे, शाहुवाडी-पन्हाळा प्रांताधिकारी अमित माळी, तहसीलदार रमेश शेंडगे उपस्थित होते.
"जोतिबाच्या नावानं चांगभल...!" च्या जयघोषात महाराष्ट्रासह, आंध्रप्रदेश, गोवा, कर्नाटक आदी राज्यातून लाखोंच्या संख्येने भाविक या यात्रेत उंच सासन काठ्या नाचवत देहभान विसरुन सहभागी झाले आहेत. या सर्व भाविकांना पालकमंत्री श्री. केसरकर यांनी जोतिबा यात्रेनिमित्त शुभेच्छा दिल्या. पालकमंत्र्यांच्या हस्ते पूजा पार पडल्यानंतर राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनीही श्री जोतिबाचे दर्शन घेऊन मानाच्या सासन काठ्यांचे पूजन केले.
पालकमंत्र्यांकडून वैद्यकीय सेवा व प्रथमोपचार केंद्राची पाहणी
रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईज यांच्यावतीने आणि डी. वाय. पाटील हॉस्पिटल व केमिस्ट असोसिएशन यांच्या सहकार्याने जोतिबा मंदिरात भाविकांसाठी मोफत वैद्यकीय सेवा व प्रथमोपचार केंद्राचे दालन सतत 24 तास कार्यरत ठेवले असून या केंद्राची पाहणी पालकमंत्री दीपक केसरकर व उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केली.