मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथे प्रस्तावित असलेल्या रिफायनरीला काही घटकांकडून सातत्याने विरोध केला जात आहे. प्रकल्पाच्या ठिकाणी जाऊन आंदोलन करणाऱ्या शंभरहून अधिक आंदोलनकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड देखील करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर सरकारने सामंजस्याची भूमिका घेत गुरुवार, दि. २७ एप्रिल रोजी आंदोलनकर्त्यांसोबत चर्चा करणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
उदय सामंत म्हणाले की, "काल बारसू येथे आंदोलन करणाऱ्या काही महिला आंदोलकांना पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. मात्र त्यांना आता सोडून देण्यात आले आहे. शासन स्थानिकांचा पाठिंबा घेऊनच हा प्रकल्प राबविण्यासाठी प्रयत्नशील आहे. उद्या गुरुवारी जिल्हा प्रशासनाने स्थानिकांशी चर्चा करण्यासाठी एक बैठक बोलावली आहे. त्यांच्याशी चर्चा करून त्यांना विश्वासात घेऊनच पुढील हालचाली केल्या जातील," असे मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे.