हुतात्मा अनंत कान्हेरे

    18-Apr-2023
Total Views | 168
article on martyr Anant Kanhere

दि. २१ डिसेंबर १९०९... नाशिकच्या विजयानंद थिएटरमध्ये एका १८ वर्षांच्या कोवळ्या मुलाने एका जिल्हाधिकार्‍याचा वध केला. १८ वर्षे हे वय आहे का हो वध करण्याचे? पण, स्वातंत्र्यलक्ष्मीसाठी बलिदान देणारे लोक जन्माला येतात, तेच मुळी आपले स्वतःचे वेगळेपण घेऊनच! अनंत कान्हेरे आणि त्याचे साथीदार त्याच पठडीतले म्हणायला हवे. आजच्याच दिवशी १९१० रोजी त्यांना फाशी झाली. हुतात्मा अनंत कान्हेरे यांच्या स्मृतीला वंदन...

१८९१ साली रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात आयनी मेटे या छोट्याशा खेड्यात अनंत कान्हेरे यांचा जन्म झाला. छोटेसे खेडे, त्यात सुविधा त्या असणार तरी किती? अनंत शिक्षणासाठी बाहेर पडले. प्राथमिक शिक्षण इंदौर निजामबाद या गावी झाले. त्यानंतर ते आपल्या मामांकडे छत्रपती संभाजीनगरला इंग्रजी शिक्षण घेण्यास आले. अनंत आपल्या शिक्षणाबरोबरच चित्रकला हा विषयसुद्धा शिकत होते. अनंत यांनी त्यावेळी ’मित्रप्रेम’ नावाची कादंबरी लिहिली. एक चाकोरीबद्ध आयुष्य कदाचित निर्माण झाले असते, पण तसे घडले नाही...

१७५७ साली प्लासी या ठिकाणी एक लढाई झाली आणि त्यात इंग्रजांचा विजय झाला. १८१८ साली पुण्याच्या शनिवारवाड्यावरील भगवे निशाण उतरवले गेले आणि इंग्रजांचे ‘युनियन जॅक’चे निशाण फडकवले गेले. १८५०-५५च्या दरम्यान इंग्रजांचे एकछत्री साम्राज्य संपूर्ण भारतभर पसरले. आपण पारतंत्र्यात गेलो. प्रत्येक प्रांतासाठी एक जिल्हाधिकारी इंग्रजांनी नेमला होता. नाशिकला जॅक्सनची नेमणूक झाली होती. हा जॅक्सन धूर्त होता.

भारतीयांना तो अतिशय तुच्छ लेखायचा. तात्याराव सावरकर तेव्हा विलायतेत होते, त्यांनी आणि बाबाराव सावरकर यांनी स्थापलेली ’मित्रमेळा’ व ‘अभिनव भारत मंदिर’ या दोन संस्था सावरकर बंधूंच्या मार्गदर्शनाखाली देशप्रेम जागविले. त्याचवेळी बाबाराव सावरकरांना देशद्रोही ठरवून त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा जन्मठेप सुनाविण्यात आली. हे जॅक्सनने घडवून आणले. नाशिकच्या ग्रामदेवता कालिका मंदिरात नवरात्रीची यात्रा भरते, तिथे ‘अभिनव भारत’च्या कार्यकर्त्यांनी भाविकांना ’वंदे मातरम्’ची घोषणा द्यायला सांगितली. इंग्रजांना कुठल्याही प्रकारे देशप्रेम, संघटन इथल्या लोकांमध्ये जागृत होऊ द्यायचे नव्हते. जॅक्सनने ‘वंदे मातरम्’ म्हणणार्‍या सगळ्या क्रांतिकारकांवर खटला भरवला आणि त्यांना देशद्रोहाखाली तुरुंगात डांबले. जनतेमध्ये असंतोष वाढत होता. दुष्ट जॅक्सनसुद्धा आता क्रांतिकारकांना खटकू लागला होता.

अनंत यांचे गंगाराम नावाचे मित्र होते. त्यांच्यामुळे अनंत यांची ओळख काशिनाथ दाजी टोणपे यांच्याशी झाली. ते ‘अभिनव भारत’चे कार्यकर्तेही. गंगाराम यांनी ‘अभिनव भारता’ची शपथ देण्यापूर्वी अनंत यांची परीक्षा घेतली. तापलेला लोखंडी चिमटा अनंत यांनी सहज धरून ठेवला. दुसरी परीक्षा म्हणजे, तापलेल्या चिमणीची काच अनंत यांना धरायला सांगितली. तीही त्याने सहज धरली. अनंत परीक्षेत उत्तीर्ण झाले आणि ‘अभिनव भारत’चे सदस्यसुद्धा. बाबाराव सावरकरांना जेव्हा अटक झाली, तेव्हा त्यांना बेड्या घालून, गावातून त्यांची धिंड काढत नेले, हे अनंत यांना समजले, हे जॅक्सनमुळे झाले हेसुद्धा.

त्यामुळे त्याचा राग अनावर झाला आणि जॅक्सनला मारून टाकायची इच्छा त्याने एका भेटीत ’अभिनव भारत’चे सदस्य गोपाळराव धारप त्यांच्याजवळ व्यक्त केली. हे रागाच्या भरात काढलेले उद्गार नव्हते, तर ही वैचारिक तळमळ होती. पुढे जॅक्सनला त्याच्या विघातक कामासाठी बढती मिळाली. त्याची बदली मुंबईला झाली. त्याला संपवायचे तर नाशिकमध्ये संपवले पाहिजे, असा निर्धार झाला. तात्याराव सावरकरांनी इंग्लंडहून पिस्तुलं पाठवली. अनंत कान्हेरे, विनायक नारायण देशपांडे आणि कृष्णाजी गोपाळ कर्वे तथा अण्णा कर्वे यांनी ती पिस्तुलं आपल्या ताब्यात घेतली.

गणेश बळवंत वैद्य या ‘अभिनव भारत’च्या एका सदस्यामुळे अनंत कान्हेरे यांची ओळख विनायक देशपांडे, अण्णा कर्वे, शंकर सोमण, वामन जोशी, दत्तात्रय पांडुरंग जोशी इत्यादी मंडळींबरोबर झाली.अनंत यांनी आपल्या एका नाशिकवारीत त्यांनी कलेक्टर कचेरीत जाऊन जॅक्सनला नीट पाहून घेतले आणि नाशिकच्या बाहेर पडून एका झाडावर गोळ्या झाडण्याचा सराव केला. दोन दिवसांत ते त्यात पारंगत झाले. या नाशिक वारीत अनंत कान्हेरेंनी अजून एक काम केले, जॅक्सनला मारल्यावर आपण फासावर चढणार, हे नक्की ठाऊक होते, म्हणून आपल्या आई-वडिलांकडे आपली स्मृती म्हणून एक छायाचित्र काढवून घेतले. त्या छायाचित्रासाठीचा पोशाखसुद्धा त्यांचा स्वतःचा नाही, तो दिला त्यांच्या नाशिक मुक्कामात त्याच्या जेवणाची व्यवस्था बघणार्‍या दामूअण्णा चंद्रत्रे यांनी. आज त्यामुळे या हुतात्मा अनंत कान्हेरेंचे एक चित्र आपल्याकडे उपलब्ध आहे.

ही सगळी जुळवाजुळव करण्यापर्यंत ठीक होते, पण गणूमध्ये (गणू वैद्य) एवढी हिंमत नव्हती की, ते अनंत कान्हेरे यांना जॅक्सन वधात मदत करतील. त्यांच्यामुळेच आतापर्यंत दोनदा जॅक्सनला मारण्याचा बेत छोट्या-छोट्या कारणांमुळे पुढे ढकलण्यात आला होता. पण, अनंत आता समजून चुकले की, जॅक्सन वध आता पुढे ढकलला, तर त्याला जीवनदान देण्यासारखे होईल. विनायक देशपांडे, अनंत कान्हेरे आणि अण्णा कर्वे यांनी २१ डिसेंबर, १९०९ ही तारीख निश्चित केली. ठरल्याप्रमाणे कान्हेरे पहिला वार करतील, त्याच्याकडून जॅक्सन सुटला, तर कर्वे आणि तेथेही जॅक्सन वाचला, तर बाहेर देशपांडे या कार्यास पूर्णत्वास नेतील. जो ही कृत्यं करेल तो पुढे स्वतःला संपवून घेईल म्हणजे, जबानी वगैरे काहीच उरणार नाही. जॅक्सन जाणार म्हणून त्याला वेगवेगळे निरोप समारंभ देण्यात येत होते. त्यातलाच एक सरकारी समारंभ विजयानंद थिएटरमध्ये ठेवण्यात आला.

नाटक ’शारदा’चा खास प्रयोग ठेवण्यात आला. तारीख होती दि. २१ डिसेंबर, १९०९. नाटकाचा अंक सुरू झाला. अण्णा कर्वे जॅक्सनच्या अगदी पाठीमागच्या खुर्चीवर बसले, तर अनंत कान्हेरे अगदी दारानजीक आणि विनायक देशपांडे थिएटरच्याबाहेर पिस्तुल घेऊन हजर होते. जॅक्सन थोडा उशिराने आला. त्याचे स्वागत करण्यात येत होते, अनंत गर्दीतून उठले आणि त्यांनी पहिली गोळी झाडली, ती जॅक्सनच्या हाताखालून निघून गेली. पण, अनंत थांबले नाहीत, चपळाईने पुढे झाले आणि समोरून जॅक्सनवर चार गोळ्या झाडल्या, अजून जॅक्सनच्या स्वागतातून बाहेर यायला तयार नसलेल्या लोकांना काय घडले, हे कळायला वेळ लागला. कान्हेरेंनी तिथून पळ काढला नाही. ते तिथेच उभे राहिले आणि त्यांनी आत्मर्पणसुद्धा केले नाही, किंबहुना तो त्यांचा कधी विचारच नसावा.

त्याचदिवशी रात्री १२ वाजता त्यांची जबानी घेतली गेली, एक १८ वर्षांच्या कोळ्या तरुणाने निर्भीडपणे सांगितले की, जॅक्सनचा वध त्याने स्वतःच्या मनाने केला आहे, त्याला कोणाचेही साहाय्य किंवा मार्गदर्शन नाही, आपल्या एकही क्रांतिकारी सहयोगांची नावे त्यांनी घेतली नाही. दि. २१ डिसेंबर, १९०९ रोजी अनंत कान्हेरे यांनी जॅक्सनचा वध केला आणि दि. १९ एप्रिल, १९१० रोजी कान्हेरे, देशपांडे आणि कर्वे यांना फाशी झाली. इंग्रजांनी आणि त्यांचे देह नाहीच, तर त्यांची राखसुद्धा घरच्यांना दिली नाही. पण, त्यांच्या राखीची धग मात्र इंग्रज समाजात पसरविण्यापासून वाचून रोखू शकले नाही. या हुतात्म्यांचा त्याग आणि बलिदानावरच आज आपल्या देशाचे वैभव उभे आहे.

सोनाली तेलंग

९८८११३२३९३


अग्रलेख
जरुर वाचा
लालू प्रसाद यांचा मुलगा तेज प्रतापचा बिहार पोलिसांनी मोडला माज, विना हेल्मेट प्रवास केल्याने फाडले चलन

लालू प्रसाद यांचा मुलगा तेज प्रतापचा बिहार पोलिसांनी मोडला माज, विना हेल्मेट प्रवास केल्याने फाडले चलन

Tej Pratap Yadav जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादवचे थोरले पुत्र आणि माजी मंत्री तेज प्रताप यादव यांच्यावर बिहार पोलिसांनी कारवाई दाखल केली आहे. त्यांनी विनाहेल्मेटचा वापर करत दुचाकी वाहन चालवल्याने पाटणा पोलिसांनी दंडत्मक कारवाई केली आहे. एवढेच नाहीतर ज्या पोलिसाला धुलीवंदना दिवशी नाचण्यास भाग पाडले होते त्यानाही त्या ठिकाणी उपस्थि राहण्यास सांगितले. पटणाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक राजीव मिश्रा म्हणाले की, संबंधित अपमानित पोलिसाला त्या ठिकाणी हजर राहण्यास सांगितले होते. बिहार पोलिसांनी याविरोधात कारवाई ..