मुंबई : “जेव्हा आपण प्रामाणिकपणे काम करतो, तेव्हा त्याच्या पाठीमागे परमेश्वर उभा असतो, जनता जनार्दन उभी असते. त्यामुळे मागाठाणेच्या महापालिकेतील प्रत्येक प्रभागात भाजपचेच कमळ फुलेल,” असे प्रतिपादन भाजप विधान परिषद गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी केले आहे. भाजप मागाठाणे विधानसभेतर्फे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या पक्षप्रवेश सोहळ्यावेळी ते बोलत होते.
यावेळी नवनाथ नावडकर, पै. ठाकूर, विद्या नागलकर, बिभीषण वारे यांच्यासह असंख्य सहकार्यांनी जाहीरपणे भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी मुंबई हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष तथा मुंबई प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष प्रकाश दरेकर, उत्तर मुंबई जिल्हा सचिव मोतीभाई देसाई, मुंबई बँकेचे संचालक विठ्ठल भोसले, मंडळ अध्यक्ष दिलीप उपाध्याय, कृष्णकांत दरेकर, ललित शुक्ला, रश्मी देसाई, अमित उतेकर, माधुरी रावराणे, रेडकर ताई, लक्ष्मण कदम, रमेश विश्वकर्मा, संजय मोरे, विभीषण वारे, प्रदीप कदम, साहेबराव पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
एका चांगल्या नेतृत्वाच्या पक्षात आपला प्रवेश
प्रवीण दरेकर म्हणाले की, ‘’ज्या पक्षात तुम्ही आलात तो राष्ट्रीय पक्ष आहे. ज्या पक्षाला संस्कार, विचारधारा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे एक विश्वव्यापी असे नेतृत्व आहे. हिंदुत्वाचा विचार, संस्कार घेऊन जो पक्ष काम करतो आणि देशात विकासाचे वेगळे वातावरण ज्या नेत्याच्या नेतृत्वाखाली सुरू आहे, त्यांच्या पक्षात आपण प्रवेश करत आहात. महाराष्ट्रातही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार आहे. देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व या राज्याने पाहिले आहे. त्यामुळे एका चांगल्या नेतृत्वाच्या पक्षात आपण प्रवेश करत आहात. आपला प्रवेश फुकट गेला असे वाटणार नाही, एवढे सहकार्य व ताकद आपल्यामागे भारतीय जनता पक्षाची राहिल,” असा विश्वास दरेकर यांनी दिला.
‘जी २०’ नंतर मुंबई चकाचक होत आहे. मेट्रो, मोनो रेल होत आहे. सर्व चांगल्या सुविधा होत आहेत. त्यामुळे मुंबईला चांगला आकार येत आहे. येणार्या काळात मुंबई महापालिकेत भाजप व शिंदे यांच्या पक्षाचाच झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही,” असा विश्वासही दरेकर यांनी व्यक्त केला.
दंडेलशाही खपवून घेणार नाही
बिभीषण वारे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यावर बोलताना दरेकर म्हणाले की, “प्रत्येकाला आपला पक्ष वाढविण्याचा, राजकारण करण्याचा अधिकार आहे. मात्र, माझ्या मनासारखे होत नाही म्हणून जर कोण दंडेलशाही, झुंडशाही करणार असेल, तर खपवून घेतली जाणार नाही. जनतेच्या हितासाठी काम झाले पाहिजे. महाराष्ट्र, मुंबईत भाजपचे वारे आहेत. अजून २०-२५ वर्ष आपलेच वारे असणार आहेत,” असेही दरेकरांनी ठामपणे सांगितले.
कधीकाळी या मुंबईवर, महाराष्ट्रावर राज्य केले त्या शिवसेना पक्षाला, त्यांचे नाव आणि चिन्हही टिकवता आलेले नाही. शिंदे पक्ष घेऊन गेले. जो राष्ट्रीय पक्ष होता, त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राष्ट्रीय दर्जाही टिकवता आलेला नाही. काँग्रेस पक्षाचे अस्तित्व तर दुर्बिणीतून शोधावे लागते.(आ. प्रवीण दरेकर, गटनेते, विधान परिषद)