श्री सदस्यांच्या मृत्यूच राजकारण करू नका : डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी

    17-Apr-2023
Total Views |
Dr. Appasaheb Dharmadhikari

मुंबई
: 'महाराष्ट्रभूषण' पुरस्कार सोहळा दि.१६ एप्रिल रोजी महाराष्ट्र शासानाने आयोजित केला होता. यामुळे प्रंचड उन्हाच्या झळा सहन करत श्री सदस्य खारघर येथील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मैदानावर 'महाराष्ट्रभूषण' पुरस्कारासाठी उपस्थित राहिले.मात्र त्यावेळी काही श्री सदस्यांना उष्माघाताचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. पंरतू काही श्री सदस्यांचा यावेळी दुर्देवी मृत्यू झाला.

आता या सर्व प्रकरणावर स्वत: महाराष्ट्रभूषण पुरस्कारांचे मानकरी असलेल्या डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी एक पत्र जारी केले आहे. त्यात आप्पासाहेब लिहतात की, महाराष्ट्र शासानाने आयोजित केलेल्या महाराष्ट्रभूषण' पुरस्कार सोहळ्यासाठी खारघर येथे आलेल सारे श्री सदस्य हे माझ्या कुंटुबाचे सदस्य आहेत. श्री सदस्यांचा हा परिवार देशविदेशात पसरला आहे. या पुरस्कार सोहळ्यावेळी उष्माघाताने काही श्री सदस्यांना त्रास झाला आणि त्यातील काहींचा दुर्दैवाने मृत्यू झाला. ही घटना माझ्यासाठी अत्यंत क्लेषदायक आहे. माझ्या कुटूंबातीलच सदस्यांवर कोसळलेली ही आपत्ती आहे. आपल्याच कुटूंबातील लोकांवर घाला येण्याच्या या घटनेने मी व्यथित आहे. माझे हे दुःख शब्दात व्यक्त करण्यापलिकडचे आहे.

त्यामुळे मृत्यू झालेल्या या सदस्यांच्या कुटूंबियांची आणि माझी वेदना सारखीच आहे. श्री सदस्य परिवाराची एकमेकांच्या सोबत राहण्याची पिढ्यानपिढ्यांची पंरपरा आहे त्यानुसार आम्ही सारेजण या आपदग्रस्तांसोबत कायम आहोत. यातील मृतांना सद्गती लाभो, तसेच त्यांच्या कुटूंबाला हा आघात सहन करण्याची शक्ती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. झाला प्रकार दुर्दैवीच होता. त्याचे कोणत्याही पद्धतीने राजकारण होऊ नये, अशी आमची अपेक्षा आहे, असे डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी म्हणाले.