शोध रामगडच्या अस्तित्वाचा...

    01-Apr-2023
Total Views | 176
Ramgad fort

रत्नागिरी जिल्ह्यातील खेडपासून १७ किमी अंतरावर दापोली-खेड तालुक्याच्या सीमेवर ‘रामगड’ अथवा ‘रामदुर्ग’ या किल्ल्याचा शोध लागल्याच्या बातम्या अलीकडे सर्वत्र झळकल्या. त्यानिमित्ताने या शोधमोहिमेत प्रत्यक्ष सहभागी असलेल्या संदीप परांजपे आणि डॉ. सचिन जोशी या द्वयीने रामगडच्या या शोधकथेचा मांडलेला लेखाजोखा...

 
रत्नागिरी जिल्ह्यातील खेडपासून १७ किमी अंतरावर आणि साने गुरुजींच्या पालगड गावाच्या पूर्वेस दापोली-खेड तालुक्याच्या सीमेवर ‘रामगड अथवा रामदुर्ग’ हा किल्ला वसलेला आहे. समुद्रसपाटीपासून साधारण ४०८ मीटर (१,३३९ फूट) उंचीवर असलेला हा ‘अप्रसिद्ध’ किल्ला अंदाजे एक एकर जागेवर उभा आहे. आजवर पालगडचा जोडकिल्ला असलेला ‘रामगड’ अथवा ‘रामदुर्ग’ अज्ञात होता. आता ‘अज्ञात होता’ याचा अर्थ या डोंगरावर कोणीच कधीही येऊन गेले नव्हते, असा होत नाही. स्थानिक गावकरी अनेकदा गुरे चरायला किंवा अन्य काही कारणांसाठी या डोंगरावर जात होते. परंतु, त्यांना या डोंगरावर किल्ला असल्याचे माहीत नव्हते. तसेच रामगड या डोंगरावर किल्ल्याचे जे पुरातत्त्वीय अवशेष आहे, तेदेखील त्यांना माहीत नव्हते.

या रामगड किल्याच्या शोधाची सुरवात आमचे मित्र मोडीलिपी अभ्यासक आणि इतिहास संशोधक राज मेमाणे यांच्या एका प्रश्नामुळे झाली. सवयीप्रमाणे राज मेमाणे यांनी मोडी कागदपत्र वाचत असताना रामगड किल्ला कुठे आहे, अशी विचारणा संदीप परांजपे यांच्याकडे केली. यावर त्यांनी उत्तर दिले की, असा कोणताही किल्ला रत्नागिरी जिल्ह्यात नाही. एक रामगड आहे, तो सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे, अशी माहिती दिली. मात्र, नंतर मेमाणे यांचा हा प्रश्न संदीप यांना सतावू लागला. म्हणून प्रथम ‘गुगल अर्थ’वरील उपग्रहाच्या छायाचित्रांच्या आधारे पालगडाच्या परिसरातील डोंगर पाहायला सुरुवात केली. किल्लासदृश असा कोणताही डोंगर आढळला नाही. पुढे इंग्रजांनी केलेले जुने ’सर्व्हे ऑफ इंडिया’चे नकाशे तपासत असता पालगड किल्ल्याच्या पश्चिमेस ‘रामगडमाची’ नावाचे गाव आढळले.


Ramgad fort


पुन्हा ‘गुगल’ नकाशावर ‘रामगडमाची’ नावाचे गाव शोधले असता त्या जागी ‘राणेमाची’ नावाचे गाव असल्याचे दिसून आले. नंतर प्रत्यक्ष भेटीअंती ‘राणेमाची’ हे ‘रामगडमाची’ गावाचे बदललेले नाव असल्याचे समजले. यावरुन पुन्हा उपग्रहाच्या आधारे घेतलेल्या छायाचित्रातून पालगड ज्या डोंगर रांगेवर आहे ती डोंगर रांग तपासून पाहिली. तेव्हा पालगडच्या शेजारी अदमासे ८०० फुटांवरील डोंगरमाथ्यावर काहीसे किल्ल्याच्या आकाराचे बांधकाम असल्याचे दिसले. माथ्यावर प्रचंड झाडी दिसत होती, म्हणून उपग्रहावरून घेतलेले जुने फोटो तपासले. त्यामध्ये माथ्यावर खोलगट भाग आणि सर्व बाजूला असलेला उंचवटा दिसून आला. या सर्व पाहणी वरून हे बांधकाम किल्ल्याचेच असावे, असा अंदाज आला. मात्र, हे बांधकाम किल्ल्याचेच आहे की इतर काही, याबद्दल खात्री होत नव्हती. म्हणून प्रत्यक्ष त्या जागेला भेट देण्याचे ठरवले.

प्रथम फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस संदीप व त्याचे मित्र रोहित सहस्रबुद्धे दोघे पालगडावर गेले. पालगडावरून रामगड बघताना शेजारील डोंगराच्या माथ्याच्या उतारावर दगड ढासळलेले असल्याचे दिसून आले. हा जो डोंगर पाहत होतो, तोच रामगड असावा, अशी शंका होती. पालगडावरून रामगड असलेल्या डोंगरधारेवर उतरण्याचा प्रयत्न केला. परंतु, दगड आणि मातीचा तीव्र उतार असल्याने आणि सुरक्षा साधने सोबत नसल्याने हा प्रयत्न सोडून देऊन पालगड किल्ल्यावरून रुळलेल्या वाटेनेच किल्लेमाची गावात उतरलो. खाली उतरून किल्लेमाची गावाच्या बाजूच्या डोंगरधारेवरून जात पालगड किल्ल्याच्या पोटातून जाणारी वाट पकडून पुढे रामगडाच्या दिशेने गेलो. मात्र, पुढील मार्ग काटेरी झाडा-झुडपांनी बंद झालेला असल्याने माघारी फिरलो. किल्लेमाची गावात भेटलेल्या लोकांना रामगड नावाचा किल्ला कुठे आहे, असे विचारले असता त्यांनी पालगड किल्ल्याच्या पूर्वेकडीलडोंगर दाखवत माथ्यावर कोणतेही बांधकाम नसल्याचेही त्यांनी आम्हास सांगितले. त्याचबरोबर रामगड किल्ल्याची एक दंतकथा त्यांनी सांगितली. ती पुढीलप्रमाणे होती. काही अपशकून झाल्यामुळे आणि किल्ल्यावर काचा सापडल्यामुळे पूर्वीच किल्ल्याचे बांधकाम सोडून देण्यात आले आणि शेजारी असलेल्या डोंगरावर पालगड बांधला. दुसरी दंतकथा अशी होती की, किल्ला बांधत असताना गडावर ससा दिसल्याने ते बांधकाम सोडून किल्ला दुसरीकडे बांधला आणि तो ‘पालगड’ नावाने ओळखला गेला.

मार्च महिन्यात संदीप, डॉ. सचिन जोशी, जय पाठक आणि आदेश अम्बुर्ले किल्लेमाचीत पोहोचलो. किल्लेमाचीच्या बाजूच्या डोंगर धारेवरून रामगड किल्ल्याकडे जात असताना वाटेवर पालगड किल्ल्याखाली उद्ध्वस्त चौकीचा चौथरा आढळला. किल्ल्याच्या पोटातून जाणारी वाट पकडून मार्गावरील काटेरी झाडे-झुडपे तोडत व पुढील मार्ग काढत जाताना पालगड किल्ल्याच्या पोटात असलेली दोन खांब टाकी आणि कातळात उघड्यावर कोरलेली पाण्याची टाकी नजरेस पडली. या टाकी समूहातील एका खांब टाक्यात पाणी होते. मात्र, इतर टाकी गाळ आणि दगड-गोट्यांनी बुजलेली होती. पुढे मार्ग काढत रामगड किल्ल्याच्या ढासळलेल्या तटबंदीवरून किल्ल्यात प्रवेश केला. आत डाव्या बाजूस झाडीत एक मोठ्या उद्ध्वस्त वाड्याचे अवशेष नजरेस पडले. किल्ल्याच्या पश्चिमेकडील भागात अजून काही उद्ध्वस्त जोत्यांचे अवशेष दिसून आले. किल्ल्याची तटबंदी बघता ती चहूबाजूंनी ढासळलेली असल्याचे दिसले.


किल्ल्याची तटबंदी ढासळून त्यातील दगडांचे झालेले ढिगारे दृष्टीस पडले. या डोंगरावर मानवी हस्तक्षेपाच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. किल्ल्याच्या दक्षिणेकडे उतारावर पडकोट, त्यातील एक अर्धवट बुरुज, तर पश्चिमेकडील तटबंदीत दोन बुरुज आढळून आले. किल्ल्यावरील अवशेषात एका रेजगीर (बंदुकीची गोळी) आणि मोठ्या प्रमाणात खापरांचे तुकडे सापडले. पालगडाला जोडणार्‍या डोंगरधारेच्या दिशेला असलेल्या उद्ध्वस्त तटबंदीत किल्ल्याचा पूर्वाभिमुख दरवाजा पूर्णपणे बुजलेल्या अवस्थेत आढळून आला. किल्ल्याच्या उत्तरबाजूस मोठ्या प्रमाणात झाडे आणि गवत माजलेले असल्याने तो भाग तपासता आला नाही. सर्व अवशेषांचे पुरातत्त्वीयदृष्ट्या फोटो काढून आम्ही परतलो.तिसर्‍या वेळेस जेव्हा आम्ही रामगड सर्वेक्षणासाठी गेलो, तेव्हा आमच्याबरोबर ‘दुर्गवीर प्रतिष्ठान’चे दुर्गसंवर्धक मित्र होते. किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून किल्ल्याच्या साफसफाईस संस्थेच्या दुर्गमित्रांनी प्रारंभ केला. प्रथम पूर्व आणि उत्तरेकडील तटबंदीवर उगवलेली झाडे-झुडूपे साफ केली असता तेथे किल्ल्याला असलेल्या दुसर्‍या उद्ध्वस्त दरवाजाचे अवशेष दिसून आले. या दरवाजाखालील उतारावर गवतात काही पायर्‍या आढळून आल्या. मात्र, किल्ल्याच्या पूर्ण पाहणीत पाण्याची कोणतीही व्यवस्था आढळली नाही.

किल्ल्याचे कागदोपत्री पुरावे


किल्ल्याचा शोध घेताना त्याचे कागदोपत्री पुरावे मिळणे गरजेचे होते. मी (संदीप) गेली काही वर्षे प्रसिद्ध झालेले ऐतिहासिक साधन ग्रंथ वाचून किल्ल्यांसंबधी नोंदी संकलित करण्याचे काम करत आहे. या नोंदी तपासताना मला रामगड किल्ल्याच्या काही नोंदी सापडल्या. यात कर्नाटकातील आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रामगडाव्यतिरिक्त या आजवर अज्ञात असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील रामगडाच्या नोंदीदेखील होत्या. या नोंदी असलेले मूळ संदर्भ ग्रंथ तपासून त्यातून रत्नागिरी जिल्ह्यातील रामगड किल्ल्याच्या नोंदी बाजूला काढल्या. याच नोंदींवरून किल्ल्याचा उपलब्ध इतिहास आजपुढे आला आहे.

वर्णन आणि इतिहास

 
किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार ईशान्येस असून दुसरा दरवाजा वायव्येस आहे. या दरवाजाची रुंदी सात फूट असून आतील बाजूस पहारेकर्‍यांचे चौथरे असावेत. मात्र, हे आज पडलेल्या तटबंदी खाली गाडले गेले आहेत. दोन्ही दरवाजांना ढासळलेले संरक्षक बुरुज असून किल्ल्याची चहूबाजूची तटबंदी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. तटबंदीत एकंदर सात बुरूज असून किल्ल्यावरील अवशेषात काही इमारतींची जोती दिसून येतात. आज किल्ल्याच्या आतील बाजूस आणि उत्तर बाजूस मोठ्या प्रमाणात पालापाचोळा असून झाडे-झुडूपे वाढलेली आहेत. किल्ल्याच्या आतील भागातील साफसफाई केल्यावर अनेक अवशेष उघडकीस येऊ शकतील. किल्ल्यावर पाण्याची कोणतीही व्यवस्था नाही. मात्र, रामगडच्या वाटेवर पालगडच्या पोटात दोन खांबटाकी व खडकात कोरलेली तीन टाकी आहेत. यातील एक खांब टाके वगळता बाकी टाकी गाळ आणि दगड-धोंड्यांनी भरलेली आहेत. काही थडगीदेखील किल्ल्यावर अवशेष स्वरुपात दिसतात.

 
किल्ल्याचा इतिहास बघता रामगड अथवा रामदुर्ग हा किल्ला नक्की कोणी बांधला, याविषयी ठोस माहिती ऐतिहासिक कागदपत्रात मिळत नाही. १७२८ मध्ये हा किल्ला कान्होजी आंग्रे यांच्या ताब्यात होता. यावरून या किल्ल्याचे अस्तित्व १७२८च्या आधीपासून असल्याचे दिसून येते. इ.स. १७३५ मध्ये बाजीराव पेशवे आणि सिद्दी यामध्ये झालेल्या तहात हा किल्लादेखील सिद्दीच्या ताब्यात गेला. पुढे इ.स. १७४५ मध्ये सिद्दीवरील कोकण मोहिमेत परिसरातील रसाळगड बरोबर रामगडदेखील पेशव्यांच्या ताब्यात आला. अखेर दि. ४ मार्च, १८१८ रोजी इंग्रजांनी किल्ल्यावर पहाटेच्या वेळी तोफांचा मारा करण्यास सुरुवात केली. किल्ल्यावर लागलेली आग खूप दूरवरून दिसत असल्याचे धोंडो विश्वनाथ याने निळोपंत पुरंदर्‍यांना पाठवलेल्या पत्राद्वारे पेशव्यांना कळवण्यात आले. याशिवाय पुण्यातील मोडी अभ्यासक आणि इतिहास संशोधक राज मेमाणे यांना पालगड आणि रामगड किल्ल्यांचे काही अप्रसिद्ध कागद मिळाले असून ते लवकरच प्रसिद्ध करणार आहेत.

दंतकथा, शोध आणि त्यावरील चर्चा
 
स्थानिक लोकांच्या माहितीमध्ये थोडी मतभिन्नता दिसते. काही लोक रामगडची दंतकथा सांगत होते, तर काहींनी असं सांगितलं की, इथे किल्ला बांधलेला नाही तो पालगडवर बांधला. या किल्ल्यासंबंधी दोन दंतकथा प्रचलित असून त्यात ‘किल्ल्याचे बांधकाम प्रथम मधल्या डोंगरावर न होता आयताकार डोंगरावर होणार होते, ज्याला ‘रामगड’ म्हणतात. पण, डोंगरावर खोदकाम करताना काचा आढळल्या आणि त्यावेळच्या समजुतीनुसार आपण शत्रूपासून भविष्यात कच खाऊ या भावनेला अनुसरून किल्ला बांधण्याची जागा बदलण्यात आली, असे सांगितले जाते. दुसर्‍या कथेत, ‘किल्ला बांधते वेळी ससा दिसला म्हणून किल्ल्याचे बांधकाम करण्यात आले नाही’ असेही सांगितले जाते. परंतु, दंतकथा बाजूला ठेवून किल्ल्याचे बांधकाम बघितले, तर ते पूर्णत्वास गेल्याचे किल्ल्यावरील अवशेष आणि मिळालेल्या कागदोपत्री पुराव्यांवरून सिद्ध होते. प्रसिद्धी माध्यमात तर असं दिसून येतं की, स्थानिकांना हा किल्ला माहीत होता. परंतु, रामगडावर असलेले अवशेष उदा. तटबंदी, बुरुज, दरवाजे, जोती, इ. बांधकामाविषयी स्थानिक लोकदेखील अनभिज्ञ होते. काही मराठी बातम्यांमध्ये माहिती रामगडची आणि चित्रफीत (शूटिंग) पालगड किल्ल्याचे असे चुकीचे दाखविले गेल्यामुळे संभ्रम निर्माण झाला. वास्तविक पालगड हा किल्ला सर्वांना माहीत होता, पण रामगड मात्र महाराष्ट्राला माहीत नव्हता. योगायोग असा की, रामनवमीच्या काही दिवस आधी महाराष्ट्रात अजून एक ‘रामगड’ नावाचा किल्ला समोर आला.

संदर्भ :
राज मेमाणे यांनी दिलेली अप्रसिद्ध माहिती
संपादक, गो. स. सरदेसाई आणि कृ. पां. कुलकर्णी, या. म. काळे :
ऐतिहासिक पत्रव्यवहार, समर्थ भारत छापखाना, पुणे., १९३३.
संपादक, गो. स. सरदेसाई, पेशवे दप्तरातून निवडलेले कागद- खंड ४१- गव्हर्नमेंट सेन्ट्रल प्रेस, मुंबई, १९३४.
संपादक, गो. स. सरदेसाई, पेशवे दप्तरातून निवडलेले कागद- खंड ४५ - गव्हर्नमेंट सेन्ट्रल प्रेस, मुंबई, १९३४.

-संदीप परांजपे

-डॉ. सचिन जोशी


 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121