मुंबई : मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावरील हल्लाप्रकरणी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून तपासासाठी विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली होती. त्यानंतर अखेर आज दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यापैकी एक आरोपी अशोक खरात हा ठाकरे गटाचा पदाधिकारी असल्याची माहिती समोर आली असून यासंदर्भात आज संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेत काल हल्लेखोरांनी माझ्या हातापायावर मारण्याऐवजी थोबाडावर मारायला पाहिजे होते. कारण मी घोटाळ्यांवर बोलत राहणार आणि घोटाळे बाहेर काढणार, असे स्पष्ट केले आहे.
दरम्यान संदीप देशपांडे यांनी काल घडलेला घटनाक्रम सांगितला असून मी घाबरणार नाही. मला घाबरवण्याचा प्रयत्न करू नये. पोलिस तपास करत आहेत. त्यांचा तपास पूर्ण व्हायचा आहे. तेव्हा सर्व बाहेर येईल. हे सर्व कोणी केले हे आम्हाला माहीत आहे. मी माझे सविस्तर म्हणणेएफआयआर मध्ये सांगितले असल्याचे संदीप देशपांडे म्हटले आहे.
तसेच हल्लेखोरांचे कोच देखील आम्हाला माहीत असून पोलिसांचा तपास योग्य रीतीने सुरू आहे. तो पूर्ण होईपर्यंत मी काहीही बोलणार नाही, तर या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आला होता. त्यांनी विचारपूस केली. सुरक्षेच्या कारणास्तव २ पोलिस नेमले, परंतु मी कोणाला घाबरत नाही त्यामुळे मी विनम्रपणे सुरक्षा परत करत असल्याचेही देशपांडे यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान आम्ही कोरोना काळातील घोटाळा उघडकीस आणणार होतो आणि त्याआधीच माझ्यावर हा हल्ला करण्यात आला. आता पोलिसांनी मला नाही तर त्यांना सुरक्षा द्यावी. मी कोणाला घाबरत नाही. मी दोन दिवसात नवा घोटाळा बाहेर काढणार होतो त्याचा सुगावा हल्लेखोरांना लागला असेल त्यामुळे त्यांनी माझ्यावर हल्ला केला असावा अशी शंकाही देशपांडे यांनी यावेळी उपस्थित केली आहे.
तसेच मी यांचे घोटाळे बाहेर काढणारच आहे आणि तक्रारीही दिल्या आहेत. काल हल्लेखोरांनी माझ्या हातापायावर मारण्याऐवजी थोबाडावर मारायला पाहिजे होते. कारण मी घोटाळ्यांवर बोलत राहणार आणि घोटाळे बाहेर काढणार, असेही असं संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केले आहे.