
माहीमची मजार जमीनदोस्त
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी माहीम समुद्रातील मजारीबाबत केलेल्या धक्कादायक आरोपानंतर मुंबईचं राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. त्यातच मुंबई महापालिका, मुंबई जिल्हा प्रशासन आणि स्थानिक पोलीस प्रशासनाच्या नेतृत्वाखाली ही मजार तोडण्यात आली आहे.
गुरुवार, दि. २३ मार्च रोजी मुंबई महापालिका, जिल्हा प्रशासनाचे अधिकारी पोलिसांचा मोठा फौजफाटा घेऊन घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर कडक पोलीस बंदोबस्तात या कथित मजारीवर तोडक कारवाई करण्यात आली आहे. राज ठाकरेंच्या सभेनंतर लगेचच मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी समुद्रातील त्या अनधिकृत बांधकामाची तातडीने पाहणी करून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. तसेच मुंबई महापालिका प्रशासनाच्या वतीने देखील काल रात्रीच या संदर्भात कारवाईचे निर्देश देण्यात आले होते.