नवी दिल्ली: सामाजिक समरसतेचे ‘अग्रदूत’, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आणि हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष रमेश पतंगे यांनी हिंदू नववर्षदिनी बुधवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याहस्ते ‘पद्मश्री’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते बुधवारी ‘पद्म’ पुरस्कार विजेत्यांना राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये एका शानदार कार्यक्रमात ‘पद्मविभूषण’, ‘पद्मभूषण’ आणि ‘पद्मश्री’ पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष आणि सामाजिक समरसतेसाठी अखंड कार्यरत, भटके आणि विमुक्तांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भरीव कार्य करूनआणि हिंदुत्व चळवळीमध्ये मोलाचे वैचारिक योगदान देणारे ज्येष्ठ विचारक रमेश पतंगे यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी राष्ट्रपतींनी प्रा. बालकृष्ण दोशी यांना मरणोत्तर ‘पद्मविभूषण’ दिले. त्याचप्रमाणे ज्येष्ठ राजकीय नेते एस. एम. कृष्णा यांनादेखील ‘पद्मविभूषण’ प्रदान करण्यात आले. उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला, ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर, प्रा. कपिल कपूर आणि कमलेश पटेल यांना ‘पद्मभूषण’ प्रदान करण्यात आले. यावेळी दादा ईदाते आणि प्रभाकर मांडे यांनादेखील ‘पद्मश्री’ प्रदान करण्यात आले.दरम्यान, पद्म पुरस्काराच्या पहिल्या टप्प्यातील सोहळ्यात २ ‘पद्मविभूषण’, ४ ‘पद्मभूषण’ आणि ४७ ‘पद्मश्री’ प्रदान करण्यात आले आहे.