
पाच किलोचा मुळा
बीड : जिल्ह्यातील शेतकरी ज्ञानदेव नेटके यांच्या शेतात पाच किलोच्या मुळ्याची राज्यभर चर्चा होत आहे. नेहमीच दुष्काळाचा सामना करणाऱ्या जिल्ह्यातील शेतात असा चमत्कार घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पाच किलोचे एकूण १५ मुळे नेटके यांच्या शेतातून मिळाले आहेत.
कोळेवाडीचे शेतकरी नेटके यांनी मिळवलेल्या या उत्पन्नाची चर्चा सोशल मीडियावरही होत आहे. नेटके हे यांची उपजिवीका पारंपारिक शेतीवर अवलंबून आहे. अडीच एकरात भुईमूग लावल्यावर त्याच ठिकाणी भाजीपाल्याची लागवड केली. यात मुळाही होता. अर्धा गुंठ्यावर लावलेला मुळा जेव्हा मोठा झाला त्यावेळी पाच किलोचा भरला. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. अर्धा गुंठ्यात पाच किलोचे तब्बल १५ मुळे भरले. मुळ्याचे वजन हे जास्तीत जास्त एक किलोपर्यंत असल्याचे आत्तापर्यंतचे नोंद आहे.
कृषी अभ्यासक येणार भेटीला
पाच किलोच्या मुळ्याची चर्चा सोशल मीडियापासून सर्वदूर पसरल्यानंतर नेटकेंच्या घरी रांग लागली. अनेक शेतकरी त्यांच्या घरी भेट देऊन गेले. कृषी अभ्यासक आणि संशोधकांनी त्यांच्या शेताला भेट दिली. परिसरातील नागरिकही आता नेटकेंच्या शेतावर येत आहेत.
प्रमाणापेक्षा मुळ्याचे वजन का भरले?
मुळ्याचे वजन का भरले हा संशोधनाचा विषय असला तरीही प्रार्थमिक माहितीद्वारे कृषी अभ्यासकांनी काही ठोकताळे बांधले आहेत. नेटकेंनी मुळ्याच्या शेतीसाठी सेंद्रीय खतांचा वापर केला होता. शेणखत आणि १०-२६-२६ व सुपर फॉस्फेट खतही दिले. वेळच्यावेळी पाणी आणि इतर देखभालीअंती त्यांना मुळ्याचे भरगच्च पीक मिळाले.