मुंबई : बहुचर्चित आणि लोकप्रिय ठरलेल्या 'चॅट जीपीटी'नंतर हिंदूंचा पवित्र ग्रंथ असलेल्या भगवद्गीतेवर आधारित 'गीता जीपीटी'ची निर्मिती करण्यात आली आहे. बंगळुरूस्थित 'गुगल इंडिया'तील सॉफ्टवेअर डेव्हलपर सुकूरू साई याने हे अॅप विकसित केल आहे. आपल्या दैनंदिन आयुष्यातील प्रश्न सोडविण्यासाठी 'गीता जीपीटी' या आर्टिफिशिअल इंटिलिजन्सचा (कुत्रिम बुद्धिमत्ता असलेले टूल) वापर केला जाऊ शकतो. या चॅटमध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे गीतेचे सार लक्षात घेऊन सांगितली जातात. त्यामुळे गीताभ्यास करणाऱ्यांसाठी आणि जीवनात मार्गदर्शन मिळवणाऱ्यांसाठी हे अॅप पर्वणी ठरेल, अशी खात्री निर्मात्यांनी व्यक्त केली आहे.
सामान्य ज्ञान, दैनंदिन जीवनातील समस्यांवर गीतेच्या सारानुसार समाधान मिळू शकते, असा दावा निर्मात्या अभियंत्याने केला आहे. महाभारतात युद्धभूमीवर ज्याप्रमाणे अर्जूनाला भगवान श्रीकृष्ण गीतेचे सार कथन करत मार्गदर्शन करत होते. त्याच प्रमाणे समस्येशी समर्पक श्लोक आणि त्याच्या भावार्थासह गीता जीपीटीद्वारे उत्तर मिळणार आहे. भगवद्गीतेतील माहितीच्या आधारे हे एआय टूल विकसित करण्यात आले आहे. पवित्र ग्रंथ असल्याने गीतेच्या साराला आध्यात्मिक शास्त्रही मानले जाते. गीता जीपीटीद्वारे मिळालेली माहिती ही भगवद्गीतेच्या संकल्पनेशी, शिकवणीशी आणि तत्त्वज्ञानाशी संबंधित आहे, असा दावा निर्मात्याने केला आहे.
गीता जीपीटीकडे भगवद्गीतेतील सार आणि भावार्थ युझर्सच्या प्रश्नानुसार अचूक सांगण्याची तंत्रसुसज्जता आहे. उदाहरणार्थ, जर एखाद्या युझरने अंतरात्म्याच्या शांतीबद्दल प्रश्न विचारला तर गीता जीपीटीद्वारे त्यावर शास्त्राच्या आधारे कसे लागू केले जाईल, याचे मार्गदर्शन मिळते. गीता जीपीटीद्वारे विशिष्ट परिस्थितीवर सल्ला देण्याचीही हातोटी आहे. गीतेतील ज्ञानयोग, कर्मयोग, भक्ती योग, राजयोग आदी विषयांशी निगडीत जे प्रश्न उपस्थित होतील, त्याची उत्तरे मिळू शकतील. या ग्रंथातील यात १८ अध्याय आणि सातशे श्लोकांच्या आधारे गीता जीपीटीचा डाटाबेस तयार करण्यात आला आहे.
अचूकता आणि विश्वासार्हतेची कसोटी!
अद्याप हे एआय टूल प्रार्थमिक अवस्थेत आहे. इतर एआय टूल्सप्रमाणे पूर्ण विकसित होण्यासाठी आर्थिक पाठबळासह प्रोत्साहनाचीही गरज निर्मात्यांना आहे. इतर एआय टूल्सप्रमाणेच गीता जीपीटीद्वारे केलेल्या मिळवलेल्या माहितीची अचूकता आणि विश्वासार्हता या कसोटचा टप्पा अद्याप पार करायचा असून तसे शक्य झाल्यास भारतीय तंत्रज्ञान क्षेत्रातील मैलाचा दगड ठरणार आहे.