संशोधनाचा महामेरू : प्रा. डॉ. प्रभाकर मांडे

    04-Feb-2023
Total Views | 229
Dr. Prabhakar Mande


‘महाराष्ट्रातील सामाजिक समरसता’ या संकल्पनेचे भाष्यकार प्रा. डॉ. प्रभाकर मांडे सर्वश्री दादा इदाते व रमेश पतंगे यांचा या प्रजासत्ताक दिनी ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर करुन राष्ट्रीय स्तरावर एकाच वेळी गौरव व्हावा, ही या चळवळीसाठी अतिशय प्रेरणादायी घटना. ‘समरसता’ या संकल्पनेचे बीज रा. स्व. संघाचे तृतीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांच्या १९७५ साली पुणे येथे झालेल्या वसंत व्याख्यानमालेतील भाषणात, त्यांनी जो राष्ट्रवादाचा सामाजिक आशय मांडला, त्यात पेरले गेलेले दिसते. त्यानंतर ‘समरसता’ विषय वैचारिक व व्यावहारिक पातळीवर पुढे नेण्याचे महत्त्वाचे काम ज्येष्ठ विचारवंत दत्तोपंत ठेंगडी यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ प्रचारक दामु अण्णा दाते यांनी समर्थपणे केले.

त्यासाठी त्यांनी जी टीम बांधली, त्यात दादा इदाते, रमेश पतंगे, अनिरूद्ध देशपांडे, नामदेवराव घाडगे, नाना नवले या विचारवंतांचा व प्रत्यक्ष जमिनीवर कार्य करणार्‍या कार्यकर्त्यांचा समावेश होता. या सर्वांनी समरसतेची पालखी सजवली. अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आपल्या खाद्यांवर ही पालखी घेतली व समरसतेचा प्रवास सुरू झाला. आज पालखीचे भोई बदलले असले तरी नव्या खांद्यावर त्या संकल्पनेचा प्रवास अखंडपणे सुरू आहे. आता तर रा. स्व. संघाच्या गतिविधीचा ती एक आविभाज्य भाग बनल्यामुळे समरसतेला राष्ट्रीय आशय व महत्त्व प्राप्त झाले आहे. या सर्व वैचारिक, व्यावहारिक चळवळीला डॉ. प्रभाकर मांडे यांचे अतिशय महत्त्वपूर्ण योगदान लाभले. त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याचा थोडक्यात परिचय करून देणे हा लेखाचा उद्देश आहे.

डॉ. प्रभाकर भानुदास मांडे, ‘एम.ए.बी.एड’ ‘पीएच.डी’, ‘डि.लिट.’ त्यांचा जन्म दि. १६ डिसेंबर, १९३३ रोजी मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यात झाला. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते औरंगाबाद शहरात आले. त्यांनी आपले संपूर्ण उच्च शिक्षण याच नगरीत पूर्ण केले. १९५५ ते १९९३ अशी ३९ वर्षे ते शिक्षण क्षेत्रात कार्यरत होते. शिक्षक, व्याख्याता,प्रपाठक, प्राध्यापक व मराठी विभाग प्रमुख अशा विविध पदांवर शालेय, महाविद्यालयीन व विद्यालयीन स्तरावर त्यांनी श्रमदान व संशोधनाचे कार्य केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठयेथून मराठी विभाग प्रमुख या पदावरून ते तेथील २० वर्षांच्या सेवेनंतर १९९३ साली निवृत्त झाले. निवृत्ती नंतरही धुळे येथील का. स. वाणी प्रगत मराठी अध्ययन केंद्रांत संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले. महाराष्ट्र राज्य प्रौढ शिक्षण संस्थेचे ते दोन वर्षे संचालक होते. त्यानंतरही त्यांनी आपलेसंशोधन व ग्रंथ लेखन हे कार्य अविश्रांतपणे सुरू ठेवले. आपल्या कार्यकाळात त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्रे व परिषदेत २५ हून अधिक शोधनिबंध सादर केले. ते आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संशोधन पत्रिकेत प्रसिद्धही झाले. यासाठी त्यांनी युरोप व अमेरिकेत अभ्यास दौरेही केले. आज त्यांनी ९०व्या वर्षांत प्रवेश केला असला तरी त्यांचे लेखन, वाचन, मनन, चिंतन अखंडपणे सुरू आहे. अनेक प्रकल्पांवर ते काम करीत आहेत व दररोज चार-चार तास डिक्टेशन नियमितपणे देत आहेत. त्यांचा हा उत्साह तरुणालाही लाजविणारा आहे.

 
औरंगाबाद येथे १९९९ साली झालेल्या दुसर्‍या समरसता संमेलनाचे अध्यक्षपद डॉ. प्रभाकर मांडे यांनी भूषविले. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी ‘समरसता’ या संकल्पनेची सखोल, सविस्तर अशी तात्त्विक मांडणी केली व तिच्या व्यावहारिक आशयाचा सोदाहरण उहापोह केला. या संकल्पनेची सैद्धांतिक बैठक त्यांनी पक्की केली. १९५५ पासून लोकसंस्कृती, लोककला व लोकसाहित्य यांचा त्यांनी धांडोळा घेतला. तेव्हा, त्यांच्या अभ्यासाच्या केंद्रस्थानी समाजातील दलित,वंचित, पीडित हे घटक जसे होते, तसेच वनवासी व गिरीवासी समाजघटकही होते. त्यासाठी त्यांनी महाराष्ट्रभर प्रवास केला. साधनसामग्री गोळा केली. लोकजीवनाचा अभ्यास केला. सातपुड्यातील सर्व भागांत संचार करून त्यांनी वनवासी व गिरीवासी समाजाची माहिती संकलित केली. त्यावर संशोधन करून कधी विषयवार, तर कधी जातवार ग्रंथरचना केली. ‘समरसता’ ही भावना समाजाच्या सर्व स्तरांतील घटकांच्या मनात रूजावी म्हणून आवश्यक ती नांगरणीच जणू मांडे सरांनी या ग्रंथरचनेच्या माध्यमातून केली. आज हिला जी सार्वत्रिक मान्यता मिळताना दिसते, त्यात मांडेसरांचे योगदान मोठे आहे.

प्रा. मांडे यांचा पहिला ग्रंथ ‘मराठवाड्यातील कलगीतुर्‍याची आध्यात्मिक शाहिरी’ मराठवाडा विद्यापीठाने १९६६ साली प्रसिद्ध केली. त्यानंतरच्या ५५ वर्षांत सरांनी विचारविश्वात ५० इंग्रजी व मराठी ग्रंथांची भर टाकली. सरांचा ५१वा ग्रंथ म्हणजे भारतातील लोकनृत्ये, तो २०२१ साली प्रसिद्ध झाला. डॉ. सर आजही काही ग्रंथप्रकल्पावर काम करीत आहेत. सरांचा प्रत्येक ग्रंथ हा संशोधन, मनन, चिंतन यावर आधारित असून सबळ पुराव्याशिवाय वा संदर्भाशिवाय ते काहीही लिहीत नाहीत. गेल्या पिढीतील सरोजिनी बाबर, प्रा. तारा भवाळकर, डॉ. रा. चिं. ढेरे या लोकसंस्कृती क्षेत्रात ग्रंथलेखन करणार्‍या विद्धानांच्या मांदियाळीतील प्रा. मांडे हे लखलखीत नाव आहे. त्यांनी भारतीय शिक्षण, हिंदुत्व व समरसता याविषयावरही विचारप्रवर्तक न सकस लेखन केले आहे.

डॉ. मांडे यांनी अनेक सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक संस्थात व विद्यापीठीय व्यवस्थापनात महत्त्वाच्या जबाबदार्‍या संभाळल्या. आतापर्यंत २३ संस्थांनी त्यांना पुरस्कार देऊन गौरविले आहे. डिसेंबर २०२२ मध्ये ‘चतुरंग’ या संस्थेने त्यांना प्रतिष्ठेचा ‘जीवनगौरव’ पुरस्कार दिला. आताच मिळालेला ‘पद्मश्री’ पुरस्कार हा कळसाध्याय ठरावा.आयुष्याच्या शतकी दशकात असताना सरांचा सळसळता उत्साह, त्यांची संशोधनाची जिद्द व लेखनक्षमता ही आजच्या तरुणाईसमोर आदर्शच ठरावी अशी आहे. समाजाच्या सर्व क्षेत्रात विशेषतः बौद्धिक व वैचारिक क्षेत्रातील वातावरण झपाट्याने दूषित होत आहे. विचारविश्व संकुचित होत आहे. अशा काळात डॉ. मांडे यांचे आपल्यात असणे, कार्यरत असणे मला आशादायी व प्रेरक वाटते. सरांची ऊर्जा आपल्याला अशीच सतत मिळत राहो. मांडेजी, ‘जीवेत शरद शतम्’ हीच या निमित्ताने शुभेच्छा!



-प्रा. श्याम अत्रे


अग्रलेख
जरुर वाचा
सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर

सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर 'आयटीआयच्या' हजारो विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

( ITI students get lessons in disaster management ) जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम इथे दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान सीमेवर सध्या तणावाचे वातावरण आहे. पार्श्वभूमीवर कौशल्य विभाग आणि अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात येत आहेत. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते ठाणे येथील राजमाता जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आज या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. राज्यातल्या सर्व औद्योगिक प्रशिक्षण ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121