कृष्णाखोर्यातील अन्यायाच्या विरोधात झुंज देणारा एक क्रांतिकारक नायक म्हणजे बापू बिरु वाटेगावकर होय. बापूचा संघर्ष एका विशिष्ट जातीविरूद्ध नव्हता, तर तो समाजप्रधान व्यवस्थेतील अन्यायी समाजरचनेविरूद्ध होता. त्यामुळे ते लोकविलक्षण क्रांतिकारक नायक ठरतात, असा संदेश डॉ. विठ्ठल बापूजी ठोंबरे यांनी आपल्या ‘कृष्णाकाठचं भयपर्व’ या कादंबरीद्वारे दिला आहे.
भारतीय सामाजिक इतिहास हा शिवकाळ वगळता शोषणाचा व शोषितांच्या लुटीचा इतिहास आहे. या लुटीत सामान्य माणूस भरडला गेला आहे. मुख्यत: स्त्रियांच्या लुटीचाही एक स्वतंत्र संशोधनात्मक ग्रंथ निर्माण होऊ शकेल. असो. स्त्रियांची अब्रू लुटणार्यांविरोधात, सरंजामी प्रवृत्तीविरोधात ज्यांनी आवाज उठवला, त्यातील ठळक नाव म्हणजे बापू बिरू वाटेगावकर होय. बापूवर मराठीत लोकप्रिय चित्रपट निर्माण करण्यात आला आहे. त्यापुढे जाऊन या लोकविलक्षण नायकावर चरित्रात्मक कादंबरी लिहिणे तसे कठीण कार्य होते. त्यासाठी लेखकांच्या अंगी संशोधकवृत्तीची आवश्यकता असणे महत्त्वाचे. याशिवाय लेखन करताना चरित्रनायकाचा काळ, कौटुंबिक जीवन, समाजजीवन, त्याच्या स्वरूपाविषयी नव्याने वेध घ्यावा लागतो. हे गुण डॉ. विठ्ठल बापूजी ठोंबरे यांच्या ठायी दिसून येतात.
बापू बिरू वाटेगावकर यांच्या चरित्रात्मक कादंबरीतून ते उपेक्षित घटकांचे अंतरंग शोधतात. सामान्य माणसाचे दुःख, दैन्य, वासनांध वृत्ती, सवंगपणा, अगातिक मनोव्यथाच्या कंद गाभ्याला ते हात घालून सामाजिक इतिहासातील एक दुर्लक्षित पान उलगडतात. एकूण ३२० पृष्ठसंख्या असलेली ‘कृष्णाकाठचं भयपर्व’ ही एक आशयसंपन्न कादंबरी आहे. या कादंबरीत भयंकर वास्तवता आहे आणि या वास्तवेतून बापू बिरूचे बंडखोर जीवन उलगडत जाते. बापूच्या आयुष्यातील निवडक घटना आणि संघर्षाची माळ या कादंबरीत गुंफली आहे.१९६५ची गोष्ट आहे. देश स्वतंत्र झाला आणि खेडी पारतंत्र्यात गेली, असा तो काळ होता. असंख्य गावकरी अन्याय, अत्याचार सहन करीत होते. सग्यासोयर्यांची भलावण, दहशती वर्तन, गुंडगिरी आदी भांडवलावर गावातील सरंजामी प्रवृत्ती मजबूत बनत चालली होती. गावकरी दिवसेंदिवस स्वाभिमानशून्य होत चालले होते. अशा समाजाला स्वाभिमानाची जाणीव करून देणारा नायक दर्याखोर्यात धडपडत होता. तो नायक म्हणजे बापू बिरू वाटेगावकर होय.
बोरगाव हे छोटसे गुण्यागोविंदाने नांदणारे गाव आहे. गावात रंगा शिंदे, त्याचा सावत्र भाऊ आनंदा व त्याची टोळी गरीब गावकर्यांवर अन्याय, अत्याचार करीत होती. गरीब, असाहाय्य समाजातील स्त्रियांची बिनदिक्कत अब्रू लुटणारा रंगा गावात दरारा निर्माण करतो. पौरूषत्वाला आव्हान देणारी ही घटना होती. गावातील पैलवान, प्रामाणिक, कष्टाळू मेंढपाळ धनगर बापू बिरू वाटेगावकर हा सामान्य तरुण अन्यायग्रस्तांच्या हक्कांसाठी पुढे सरसावतो. गावकर्यांच्या सहकार्याने तो रंग्याच्या दहशतीला लगाम घालतो. रंग्याचा खून करून बापू भूमिगत होतो. येथूनच बापूच्या कार्याला कलाटणी मिळते. गरीब, असाहाय्य लोकांच्या अन्यायाचा हिशोब मागण्यास बापू प्रवृत्त होतो. त्यासाठी तो रस्त्यावर उतरतो.
बोरगाव व पंचक्रोशीत सरंजामी प्रवृत्तीमुळे भयाण, कठीण बनत चाललेल्या परिस्थिती विरोधात गरज ओळखून बापू लढण्याचे सामर्थ्य दाखवतो. अन्यायाने, शोषणाने मुर्दाड बनलेल्या अगतिक ग्रामीण रयतेला जागे करण्याचे कार्य बापू करतो. बापूंचा संघर्ष, भयंकर प्रसंग, लढा, विचार, साहस, धाडस, समजावून घ्यायचा असेल, तर त्यासाठी प्रस्तुत कादंबरी वाचणे जरूरीचे आहे.भूमिगत असताना बापूने निर्व्यसनी, अध्यात्मिक मूल्यांचा अंगीकार करून घेतलेला हा निर्णय सुधारणावादाकडे झुकणारा आहे. कष्टकरी शेतकर्यांच्या जमिनी भाऊबंदकीच्या व हडपणार्यांच्या तावडीतून सोडविणे, कर्जबाजारी शोषित, पीडित कुटुंबांना कर्जमुक्त करणे, स्त्रियांच्या अब्रूचे रक्षण करणे, गरजूंना मदत करणे अशा लोककल्याणकारी कामात उडी घेऊन बापू बिरू मानवतावादाचा जाहीरनामा मांडतात. यावरून बापूचा सत्याचा दृष्टिकोन किती व्यापक होता, हे लक्षात येते. बापूचे बंड म्हणजे त्या काळातील पुरूषधार्जिण्या व्यवस्थेला दिलेली सणसणीत चपराक आहे.
या काळात बापूंनी पुरुषी दांभिकता दाखवली नाही, कुठेही लुटमार वा चोरी केली नाही, कधीही आणि कुणालाही खंडणी मागितली नाही, कोणत्याही स्त्रीचा छळ केला नाही. उलट परस्त्रीच्या अब्रूला हात घालणार्या पोटच्या थोरल्या मुलास (तानाजी वाटेगावकर) यमसदनास पाठवले. बापूची ही नैतिकता स्त्रियांची प्रतिष्ठा वाढवणारा आहे. अशी ही बापूची कहाणी दंतकथा ठरत नाही, अनैतिक घटना रंगवून लबाडीचा इतिहास होत नाही, तर ती एक वास्तवतेची खरीखुरी कहाणी बनते.संपूर्ण कादंबरीचा आणि त्यातील प्रकृती संघर्षाचा, त्यातील ताणतणावाचा संदर्भ शोधताना आणखीन एक महत्त्वाची गोष्ट जाणवत राहते की, प्रत्येक परिस्थितीला आणि नियतीला सामोरे जाणारे धम्मवा आणि तिचा पती संगाप्पा, ब्राह्मण जगन्नाथ व त्याची मुलगी, सुंगधा, बापूच्या भावकितील एक महिला यांचा संघर्ष. म्हटले तर संघर्षच दिसत नाही, तर एका सबलाने दुसर्या दुर्बलांवर केलेला अत्याचारी, अन्यायी जीवघेणा खेळ वाटतो.
गोंदील पिता-पुत्र खून प्रकरण, पोलीस मदन पाटीलची खेळी व बापूला झालेली अटक, येरवडा कारागृहातील दिवस, जन्मठेपची शिक्षा हे सर्व प्रसंग वाचताना बापूवरचा नवा चित्रपट उभा राहतो. एकूणच डॉ. विठ्ठल ठोंबरे यांनी ही कादंबरी शास्त्रशुद्ध आणि कमालीच्या आत्मीय तळमळीतून साकार केली आहे. यातून विचारांची सहजता आणि भाषेची स्वाभाविकता प्रत्ययास येते. कृष्णाकाठच्या भाषेचा लहेजा, वाक्प्रचार, म्हणी, चटकदार शब्दयोजना यामुळे ही कादंबरी अधिक वाचनीय झाली आहे.
पुस्तकाचे नाव : कृष्णाकाठचं भयपर्व
लेखक : डॉ. विठ्ठल बापूजी ठोंबरे
प्रकाशन : जयमल्हार प्रकाशन, पुणे
-विकास पांढरे