शिवसेनेने केवळ खुर्चीसाठी भाजपला धोका दिला-केंद्रीयमंत्री अजयकुमार मिश्रा
25-Feb-2023
Total Views | 84
17
मुंबई : "विरोधक काय बोलतात ही त्यांची निराशा आहे. आम्ही एकत्र मिळून निवडणुका जिंकल्या होत्या. महाराष्ट्रातील जनतेने भारतीय जनता पक्ष आणि त्या वेळच्या शिवसेनेला कौल दिला होता; परंतु शिवसेनेने केवळ खुर्चीसाठी भाजपला धोका दिला. स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी संपूर्ण जीवनभर विरोध केला. त्यांच्याशीच उद्वव ठाकरेंनी समझोता केला." अशा शब्दात केंद्रीयमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी शिवसेनेवर टीका केली. राष्ट्रकल्याण प्राथमिकता मानून भाजप कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी काम करावे, असे आवाहन मिश्रा यांनी केले.
मिश्रा यांच्याकडे भाजपतर्फे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत पालकत्व आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील ब्राह्मण सहाय्यक संघ सभागृहात कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिर झाले. या वेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा प्रवास योजना संयोजक अतुल काळसेकर, मुंबईचे नगरसेवक लोकसभा प्रवास प्रभारी संजय लेले, चिपळूण -संगमेश्वर विधानसभा प्रभारी हरीभाई पटेल, भाजप प्रदेश सचिव माजी आमदार प्रमोद जठार, माजी नगरध्यक्षा सुरेखा खेराडे, भाजप जिल्हाध्यक्ष केदार साठे, शेलेंद्र दळवी, तालुकाध्यक्ष वसंत ताम्हणकर, शहराध्यक्ष आशिष खातू, विधानसभा संयोजक प्रमोद अधटराव, रामदास राणे आदी उपस्थित होते.