रत्नागिरी : दापोली तालुक्यातील दाभोळ बंदरामध्ये बोटींवर जप्त करण्यात आलेल्या डिझेल साठ्याच्या मुळाशी जावून कस्टम विभाग शोध घेणार आहे. शुक्रवार दि. १० फेब्रुवारी २०२३ रोजी सायं. ५ च्या दरम्यान डिझेल तस्करी करणार्या सोन्याची जेजुरी बोटीवर रत्नागिरी कस्टम विभागाच्यावतीने कारवाई करण्यात आली होती. बोटीतील १७ कंपार्टमेंटमधील २ कंपार्टमेंट रिकामे होते.
उर्वरित १५ कंपार्टमेंटमध्ये डिझेलचा साठा आढळून आला होता. दरम्यान या बोटीवर तब्बल ३७ हजार लिटर इतका डिझेलचा साठा कस्टमने जप्त केला होता. मात्र हा साठा पाठवणारा अथवा हस्तांतरित करणारा कोण आहे याचा शोध आता रत्नागिरी कस्टम विभागाच्यावतीने घेण्यात येत आहे. दरम्यान ही बोट रेवस या ठिकाणाहून आली असल्याची माहिती कस्टम विभागाच्यावतीने देण्यात आलेली आहे. त्यामुळे रेवसपासून देखील कस्टम कसून तपास करत आहेत.