क्रांतिकारकांचे क्रांतिगुरु: लहुजी राघोजी साळवे (वस्ताद)

    17-Feb-2023
Total Views | 190
 
परकीयांच्या जुलमी राजवटीत अन्यायाविरोधात पेटून उठणारे थोर क्रांतिकारक, क्रांतिकारकांच्या अनेक पिढ्या घडवणारे वस्ताद, आपल्या युद्धकौशल्याने, बुद्धीचातुर्याने इंग्रजांना सळो की पळो करुन सोडणारे, वस्ताद लहुजी राघोजी साळवे यांच्या स्मृतीदिनी जाणून घेऊया वस्ताद लहुजी राघोजी साळवे यांनी ब्रिटिशशाहीविरोधात दिलेल्या लढ्याबद्दल, तसेच त्यांच्या कर्तृत्वाबद्दल...
 
Lahuji Raghoji Salve
 
शरीरसंपदा काय असते? याचा प्रात्यक्षिक पाठ त्या व्यक्तीच्या शरीराकडे पाहूनच मिळावा, असे अफलातून शरीरधन ज्यांनी प्राप्त केले होते, त्यासाठी अपार मेहनत त्या इतिहास पुरुषाने घेतली. शरीरसामर्थ्य कमावण्याची उपजत आवड या व्यक्तित्वात होती. ही आवड त्यांनी आपल्यापुरती मर्यादित ठेवली नाही. आपल्यासारखे निधड्या छातीचे अनेक वीर निर्माण झाले पाहिजे, ज्यांच्या रोमारोमात राष्ट्रप्रेम असेल. त्याग बलिदान, आत्मसमर्पणाची भावना सदैव प्रवाही असेल. आत्मविश्वास ओसंडून वाहत असेल, अशी राष्ट्राची मानवी संपत्ती घडविण्याचे काम अखंडितपणे लहुजींनी सुरू ठेवले.चावडीवरच्या चिलमी गप्पा मारून जांभया देत आपले फुटकळ मनोरंजन करणारे किडकिडीत किड्यासारखे तरुण पाहिले की, वस्तादांच्या तळपायाची आग मस्तकात जाई.
 
पुण्याच्या दक्षिणेस गुलटेकडीवर आपल्या सहकार्‍यांनाव शिष्यपरिवाराला घेऊन युद्धकला प्रशिक्षणातून ब्रिटिश साम्राज्यशाहीचा अंत करणार्‍या समर्पित क्रांतिकारकांची निर्मिती हेच त्यांच्या जगण्याचे इप्सित होते.लहुजी वस्तादांच्या मार्गदर्शनात तयार होणार्‍या त्यांच्या शिष्यपरिवारात तोंडात हत्यार धरून पाठीने भिंत चढून जाणे. डोंगरकिल्ल्यावर चढून जाण्यासाठी घोरपडीचा उपयोग कसा करावा, दोन्ही हातात दोन पट्टे चढवून मानवी गराड्यावरूनउड्डाण मारून कसे जावे, पट्ट्याची फेक करून पुरुषभर उंचीचे निवडुंग फड उड्डाण मारून पार करणे, धावत्या घोड्यावर बसून निशाणेबाजी करणे, अंधार्‍या रात्री रानावनातल्या काट्याकुट्यातून चपळतेने भरधाव पळणे, डोंगराच्याचढणी हा-हा म्हणता चढून जाणे, तुटक्या कड्यावरून उड्या मारणे, डोंगरपट्टीच्या बाजूच्या वाटेने भरधाव पळणे, नदीच्या भर पुरात उडी मारून पोहत जाणे, पाण्याच्या पोटातून पोहत जाऊन दूरवर निघणे. हे सर्व धाडसी प्रयोग क्रांतिकार्यकरण्यासाठी आवश्यक होते. ब्रिटिश राजवटीच्याविरोधात बंड करून उठणार्‍या समस्त क्रांतिकारकांना या प्रशिक्षणाची आवश्यकता होती. ते ब्रिटिशांच्या नाकात दम आणणारे मर्दानी प्रशिक्षण लहुजी वस्तादांच्या तालमीत मिळत होते. या सर्व प्रशिक्षणाचा लाभ महान क्रांतिकारक उमाजी नाईक, लोकमान्य टिळक, महात्मा फुले, वासुदेव बळवंत फडके आणि चाफेकर बंधूंसारख्या दिग्गजांना झाला.
 
लहुजी साळवे यांचे घराणे अत्यंत पराक्रमी. शौर्यपरंपरा असलेले साळवे घराणे शस्त्र विद्येत निष्णात. अत्यंत झुंजार वृत्ती व इमानी बाणा असल्यामुळे शिवाजी महाराजांनी पुण्याजवळील पुरंदर किल्ल्याची जबाबदारी लहुजी साळवेंच्या पूर्वजांवर सोपविली होती. पुरंदर किल्ला सांभाळणे अत्यंत धाडसाचे काम होते. घनदाट जंगल आणि हिंस्त्र श्वापदाची देण असलेला परिसर. त्यामुळे पुरंदर सांभाळण्याचे काम शूर साळवे घरानेच करू शकेल, याबद्दल शिवरायांना संपूर्ण विश्वास होता. ‘राऊत’ (सर्जनशील) हा सन्मान शिवरायांनीच साळवे घराण्याला बहाल केला होता. या साळवे वंशपरंपरेतील राघोजी साळवे व विठाबाई या जोडप्याला दि. 14 नोव्हेंबर, 1794 रोजी पुत्ररत्न प्राप्त झाले, नाव ठेवले लहू. राघोजींच्या आजोबांचे नावही लहुजीच होते.
 
लहुजींवर शस्त्रविद्येचे संस्कार बालपणापासूनच होऊ लागले. शस्त्र हीच या बाळाची खेळणी. जखमांना अलंकार समजणारे साळवे घराणे, शस्त्रांपासून दूर राहा, असे आपल्या वंशातील बालकांना सांगू शकत नव्हते. रक्ताने हात माखणे हीच होळी आणि हीच दिवाळी असा दृढ विश्वास ठेवून दुष्ट प्रवृत्तीचा संहार करत राहणे, हेच आपले मानवी कार्य आहे, हे संस्कार साळवे घराण्याच्या अंतःकरणावर कोरले गेले होते. दर्‍याखोर्‍या, जंगले, हिंस्त्र प्राणी यांची भीती त्यांना कधी वाटली नाही. राघोजी साळवे या लहान बालकाला किल्ला बाहेरून पाहण्यासाठी घेऊन जात आणि जंगलसफर घडवून आणत.
 
शस्त्रविद्या, मल्लविद्या यांचे पाठ बालवयापासून सुरूच होते. निशाणेबाजी, दांडपट्टा, तलवारबाजी, मल्लखांब, घोडेस्वारी या कलेबरोबरच युद्ध शास्त्रातील अनेक कलांमध्ये ते तरबेज झाले. एकनिष्ठतेने स्वराज्याची सेवा करणे, हे ब्रीदवाक्य साळवे घराण्याचा श्वास. त्यासाठीच जगणे त्यासाठीच मरणे, हेच या योद्ध्यांना माहीत. एकदा राघोजींनी जीवंत वाघाला पकडले. गावातील सर्व लोक वाघाला पाहण्यासाठी आले. हे वृत्त पुण्यात पेशव्यांच्या कानी पडले. त्यांना या बहाद्दराला भेटण्याची इच्छा झाली. राघोजी जेरबंद वाघासह शनिवारवाड्यात हजर झाले. त्यांचा पराक्रम पाहून दरबारातील शिकारखान्याच्या प्रमुखपदी राघोजींची नियुक्ती झाली. पुरंदरवरून पेशवे दरबारात राघोजी पोहोचले. मल्लविद्येत कमावलेले शरीर आणि शस्त्रनैपुण्य यामुळे सोळाव्या वर्षी पेशवे दरबारात लहुजींना नाकेदार ही नोकरी मिळाली. बाहेरून येणारा चोरटा माल पुण्यात येऊ नये, यासाठी राघोजींच्या सूचनेवरून पेशव्यांनी रामोशी गेट बांधले. तिथेच लहुजी नाकेदार म्हणून नियुक्त झाले.
 
दुसर्‍या बाजीरावांनी इंग्रजांच्या विरोधात उठाव करण्याचा निर्धार केला तेव्हा बापू गोखले हे सेनापती होते. शस्त्रास्त्र भांडारप्रमुख म्हणून कार्य करण्याची जबाबदारी तेव्हा लहुजींवर सोपविण्यात आली. ती कामगिरी तर त्यांनी खूप कर्तव्यदक्षतेने पार पडली. या खडकी युद्धात राघोजींना वीरमरण आले. लहुजींचा संताप अनावर झाला, पण बापू गोखल्यांच्या घोड्याला गोळी लागल्यामुळे त्यांनी युद्धातून माघार घेतली. मराठी सैन्य जीव वाचवण्यासाठी पळत सुटले होते, अशावेळी पित्याचे प्रेत उचलून त्यांनी घरी आणले. त्यासोबत रक्ताने माखलेला एक दगड आपल्या बंडीच्या खिशात टाकून घरी आणला.मराठी सैन्याचा पराभव झाला. दुसर्‍या बाजीरावांनी पुण्यातून पळ काढला. शनिवार वाड्यावर ‘युनियन जॅक’ फडकू लागला. लहुजी तेव्हा 23 वर्षांचे होते.
 
वडिलांचे बलिदान त्यांच्या कायम स्मरणात होते. ब्रिटिश राजवट संपवण्याचानिर्धार त्यांनी केला. साम्राज्यशाही विरोधात पेटलेली, युवाशक्ती एकत्र करणे आणि आपल्या जवळील युद्धकला त्यांना देणे हे असीम व्रत त्यांनी स्वीकारले. त्यासाठी आजन्म ब्रह्मचारी राहणे, हा लहुजींचा त्याग शब्दातीत होता. लहुजींनी गंजपेठ, पर्वती व गुलटेकडी इथे आखाडे सुरू केले. अनेक तरुण तिथे प्रशिक्षणासाठी येऊ लागले. अत्यंत गोपनीयता राखून हे कार्य सुरू केले.
 
अज्ञातवासात राहून स्वातंत्र्याची ज्योत पेटविण्याच्या या मौल्यवान कार्याला तोड नाही.त्यांच्या शिष्यपरिवाराचे प्रथम कार्य : गरिबांचे रक्त पिऊन धनाढ्य झालेल्या सावकारांना धडा शिकवणे, इंग्रजांचे मांडलिक होऊन त्यांचे पाय चाटणार्‍या अस्मिताशून्य दोन पायांच्या कुत्र्यांना वठणीवर आणणे, तारायंत्र बंद पाडणे, टपाल व सरकारी खजिना लुटणे, तारांचे खांब वाकवणे. जनतेच्या मनात ब्रिटिश सत्तेविषयी तिरस्कार निर्माण करणे. हे कार्य करून स्वातंत्र्याच्या दिशेने वाटचाल करणे. हे कार्य अत्यंत चोखपणे करीत. लहुजींचा आखाडा स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक बांधिलकीचे व्यासपीठच. आपण आणि आपल्या समाजाला या व्यवस्थेकडून जो अन्याय भोगावा लागतो, हे वास्तव पचवून त्यांनी त्यांच्या आखाड्यावर मात्र कोणताही भेदभाव न ठेवता त्यांच्याजवळ असलेले शस्त्रविद्येचे ज्ञान सर्वांना दिले आणि स्वातंत्र्यप्राप्ती हे लक्ष ठेवले.लहुजींचे कार्य अखंडपणे चालूच होते. त्यांचे अनेक शिष्य 1857च्या उठावातही सहभागी होते. स्वातंत्र्यलढ्यात पुणे परिसरातून क्रांतिकारी पाठवले जातात. ही खबर इंग्रजांना समजल्यावर त्यांच्यावर पाळत ठेवणे सुरू झाले.
 
क्रांतिगुरू लहुजींनी आपल्या आखाड्याची जागा बदलली. सह्याद्रीच्या कडेकपारी, खेडोपाडी आखाडे सुरू केले. गोर्‍यांना घाबरून आपले कार्य बंद केले नाही. शिवछत्रपतींचा गनिमी कावा अंगी बाणवला. शेवटच्या क्षणापर्यंत आपले शरीरधन सांभाळले. वासुदेव फडकेंना पकडून एडनच्या तुरुंगात बंदिस्त केल्यावर ते खूप दुःखी झाले. 17 फेब्रुवारी, 1881 ला त्यांची प्राणज्योत मालवली.त्यांच्या आखाड्यातील हजारोंचा शिष्यपरिवार त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी धावून आला. त्यांची समाधी संगमवाडी पुणे येथे आहे.ब्रिटिश साम्राज्यशाहीला सळो की पळो करून सोडणारे शेकडो क्रांतिकारक ज्या क्रांतिगुरूंनीनिर्माण केले आणि आपल्या मातृभूमीला मुक्त करण्याचा प्रयत्न केला, त्यांची 14 नोव्हेंबर ही 228वी जयंती. त्यांना मनोभावे वंदन करून अन्याय-अत्याचाराविरुद्ध लढणारी सक्षम पिढी निर्माण करण्यासाठी संकल्प करण्याचा हा दिवस.प्रत्यक्ष कार्याला प्रारंभ झाल्यावर कार्य सिद्धीकरिता क्रांतिगुरुंचे आशीर्वाद आमच्या पाठीशी सदैव असणारच आहेत.
 
-प्रा. वसंत गिरी
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
मुंबई मेट्रो-३

मुंबई मेट्रो-३ 'बीकेसी ते आचार्य अत्रे' मार्गाचे लोकार्पण

कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे' मेट्रो ३ मार्गिकेतील बीकेसी ते आचार्य अत्रे चौक, वरळी अशा टप्पा २ अच्या संचलनाची प्रतीक्षा अखेर आता संपली आहे. या मार्गिकेसाठी मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस)कडून टप्पा २ अ ला सुरक्षा प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यामुळे या टप्प्याच्या संचलनाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार, आज दि.९ रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई मेट्रो ३च्या या टप्प्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे. यावेळी मुख्यमंत्री बीकेसी ते सिद्धिविनायक मंदिर स्थानकापर्यंत मेट्रोने ..

मसूद अजहरचा भाऊ जैशचा दहशतवादी अब्दुल रौफ अझहर ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये ठार!

मसूद अजहरचा भाऊ जैशचा दहशतवादी अब्दुल रौफ अझहर ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये ठार!

पहलगाम हल्ल्या नंतर भारताने पाकिस्तानी दहशतवाद्यांना जबरदस्त उत्तर ‘ऑपरेशन सिंदूर’ पूर्ण केले. दि. ७ मे रोजी रात्री १ वाजून ४ मिनिटांनी ते दीड वाजताच्या दरम्यान ऑपरेशन सिंदूर पूर्ण झाले. भारतीय दलांनी पाकिस्तानमध्ये बहावलपूर आणि मुरीदके येथे हल्ले केले आणि जैश आणि लष्करचे मुख्यालय उद्ध्वस्त केले. कित्येक वर्षांपासून या दोन्ही दहशतवादी संघटना सातत्याने भारताविरोधात कारवाया करत आहेत. हल्ल्यात जैश-ए-मोहम्मद प्रमूख मसूद अझहरचा भाऊ अब्दुल रौफ अझहर जो जैश-ए-मोहम्मदचा ऑपरेशनल प्रमुख आणि आयसी-८१४ अपहरणाचा मास्टरमाइ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121