पुण्याची सुरक्षितता

    08-Dec-2023
Total Views | 49
NCRB Report Pune second Safe City
 
राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागामार्फत (एनसीआरबी) दरवर्षी गुन्हेगारी संदर्भात देशपातळीवरचा वार्षिक अहवाल जाहीर केला जातो. यंदा या अहवालात पुणे शहराविषयी मात्र एक चांगली बातमी आहे. पुणे हे लोकसंख्येच्या तुलनेत दखलपात्र गुन्ह्याच्या प्रमाणानुसार देशात क्रमांक दोनचे सुरक्षित शहर ठरले आहे. शिक्षण आणि सांस्कृतिक क्षेत्रातील एक महत्त्वाचे केंद्र अशी पुण्याची जगभरात ओळख. वैयक्तिक सामाजिक स्वास्थ्य आणि शिक्षण संस्कृतीची भरभराट यांचा याच्याशी थेट संबंध आहे. त्यामुळे या गोष्टी प्रभावी ठरण्यासाठी गुन्हेगारीचे प्रमाण कमी असणे पूरक ठरते. पुण्यासाठी ही चांगली बातमी आहेच. पण, ही स्थिती भविष्यातही कायम राखणे, हे मात्र आव्हान ठरू शकते. एकदा मेरिटमध्ये क्रमांक काढणार्‍या विद्यार्थ्याला तो क्रमांक टिकवण्यासाठी पुढच्या इयत्तांतही अधिक श्रम करावे लागतात, तसेच काहीसे. पण, मग त्यादृष्टीने पुण्याची तयारी आहे का? अनेक वर्षे पुण्याभोवतीचा परिसर अभूतपूर्व वेगाने विकसित होताना दिसतो. देशभरातून कितीतरी बुद्धिमान, शिक्षित, धडपडणार्‍या तरुणांना पुणे सातत्याने आकर्षित करीत आहे. मात्र, कुठल्याही वाढीच्या प्रक्रियेत चांगल्या सोबत वाईटाची वाढ होण्याचा धोका संभवतोच. पुण्याने याचाही अनुुभव घेतला आहेच. यापुढे गुन्हेगारीचे प्रमाण सातत्याने कमी राखण्यासाठी पुण्यालाही काही पावले नक्कीच उचलावी लागतील. एक तर गुन्हेगारी प्रवृत्ती ओळखणे, त्या रोखणे यांसाठी यंत्रणा अधिक प्रभावीपणे राबविली पाहिजे. दुसरीकडे तरुणांची पावलं गुन्हेगारीकडे वळणार नाहीत, यासाठी समाजाला प्रयत्न करावे लागतील. लोकांवरचे सामुदायिक आणि वैयक्तिक दबाव कमी करणारे ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ लागतील. सुदैवाने सुशिक्षित, संवेदनशील आणि उपक्रमशील पुणेकरांची संख्या मोठी आहे. सर्व स्तरांवरचे ‘समुपदेशक’ आहेत, अभ्यासक आहेत, कार्यकर्ते आहेत. यंत्रणा आणि सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून गुन्हेगारी दूर राखणारे वातावरण कायमचे स्थापित होऊ शकेल का? तसे झाले तर ते एक उदाहरण ठरेल. महाराष्ट्राच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक राजधानीने या कामी ‘लीड’ घेणे ही पुण्याचीच नव्हे, तर महाराष्ट्राची आणि काळाचीही गरज आहे.


शहरांतर्गत जलद प्रवास


शहरांचा जसजसा विस्तार होत जातो, तसतशी शहराच्या एका भागातून दुसर्‍या भागात प्रवास करण्यासाठीच्या सार्वजनिक वाहतुकीकडूनही अपेक्षा वाढीस लागते. नुसती गरज वाढत जाते असे नाही, तर प्रवास वेगवान व्हावा, अशीही अपेक्षा असते. अलीकडच्या काळात पुण्यात नागरिकांचा शहरांतर्गत प्रवास अधिक जलदगतीने व्हावा, यासाठी काही प्रकल्पांवर काम सुरू आहे. मेट्रो सेवा आणि पुण्याचा वर्तुळ मार्ग (रिंग रोड) हे दोन महत्त्वाचे प्रकल्प. पुण्यात दोन मेट्रो मार्गिका कार्यान्वित झाल्या आहेत. शिवाय हिंजवडीसारख्या भागांतून नव्या मार्गिकांची कामे प्रगतिपथावर आहेत. मेट्रोचा हा लाभ असला तरी मेट्रो स्थानकापर्यंत पोहोचणे अधिक सुविधाजनक झाले पाहिजे. त्यासाठी मेट्रो स्थानकांवर सगळीकडे पार्किंग सेवा, फीडर बस सेवा आणि रिक्षा स्थानके यांची सोय झाली, तरच तिचा अधिक उपयोग होऊ शकेल. अनेक मेट्रो स्थानके ही गर्दी आणि गजबजाट असलेल्या भागात आहेत. तिथे या सुविधांसाठी अतिरिक्त जागा कशी उपलब्ध व्हावी, हाही प्रश्न आहेच. मेट्रोसाठी प्रवासी संख्या वाढणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी वर उल्लेख केलेल्या सुविधा तातडीने मिळाल्या, तर अधिक प्रवासी मेट्रोकडे वळतील. इतर नव्या मेट्रो मार्गिकांची वाढ होण्यानेही प्रवासी संख्येत भर पडेल. शहरात दूरवरचा प्रवास मेट्रोने जलद होऊ शकतो, हे लक्षात आलेल्या नागरिकांनी पिंपरी-चिंचवड ते पुणे शहर अशा प्रवासासाठी मेट्रोला काही प्रमाणात पसंती दिली आहे. रुबी हॉल पलीकडे रामवाडीपर्यंतची सेवा सुरू झाल्यावर वनाझ ते रामवाडी मार्गावरही प्रवासी संख्या सध्यापेक्षा वाढू शकते. दूरवरच्या अंतरासाठी प्रवासाचा वेळ लक्षात येण्याइतका कमी होत असल्याने मेट्रोला पसंती मिळू शकते. उपनगरांतून शहराच्या मध्यभागी पोहोचण्यासाठी मेट्रो सोयीची आहे. जे दिल्लीसारख्या शहरात दिसते, तेच चित्र पुण्यातही दिसू शकते. मात्र, शहरातच जिथे बस, रिक्षा सहज उपलब्ध आहेत, अशा थोड्या अंतरासाठी जिने, उद्वाहक वापरत मेट्रोच्या फलाटावर पोहोचणे किती प्रवाशांना आवडू शकेल, हा प्रश्न वाटतो. मेट्रो सेवा आणि त्याखेरीज पुण्याचा वर्तुळ मार्गाचा प्रकल्प या दोन गोष्टींमुळे वाढत्या पुणे शहरात जलद प्रवासाची गरज पूर्ण होण्यात मोठा हातभार लागू शकेल.

मनोज तुळपुळे 
अग्रलेख
जरुर वाचा
Mock Drill India : देशभरात युद्धाचे

Mock Drill India : देशभरात युद्धाचे 'मॉक ड्रील'! ७ 'मे'ला नक्की काय घडणार?

Mock Drill India : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला आहे. भारत-पाकिस्तान युद्धाच्या चर्चा असताना दोन्ही देशांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन होत असल्याचंही पहायला मिळतंय. दोन्ही देशांमध्ये कोणत्याही क्षणी युद्धाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. या पार्श्वभुमीवर युद्धसज्जतेच्या दृष्टीने केंद्रीय गृहमंत्रालयाने देशातल्या २४४ जिल्ह्यांमध्ये बुधवार दि. ७ मे रोजी 'मॉक ड्रील' अर्थात युद्धकाळातील उपायांचा सराव करण्याचे निर्देश दिले आहेत. . या २४४ जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातल्या ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121