देशातील महाराष्ट्र या एकमेव राज्यात भरणारे यंदाचे हे ३६वे पक्षिमित्र संमेलन. भरगच्च कार्यक्रमांनी भरलेल्या या दोन दिवसीय संमेलनाचा ’महाराष्ट्र पक्षिमित्र’ संघटनेचे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर यांनी घेतलेला हा आढावा...
महाराष्ट्र पक्षिमित्र संघटना ही फक्त एक संस्था नसून, ती एक चळवळ आहे, असे आम्ही पक्षिमित्र मानतो. या चळवळीची सुरुवात झाली, ती १९८१ झाली. आजपासून ४२ वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील काही मोजके पक्षी निरीक्षक प्रकाश गोळे यांच्या आवाहनानुसार, लोणावळा येथे एकत्र आले. या मेळाव्यात पक्षिमित्र ही संकल्पना उदयास आली व या मेळाव्याचे रुपांतर पक्षिमित्र संमेलनामध्ये झाले आणि पक्षिमित्र संमेलन चळवळीची मुहूर्तमेढ रोवली गेली. अशा प्रकारचे पक्षिमित्रांचे संघटन आणि पक्षिमित्रांचे संमेलन घडवून आणणारे, महाराष्ट्र हे देशातील एकमेव असून, याचा राज्यातील तमाम पक्षिमित्रांना सार्थ अभिमानसुद्धा आहे. विशेष बाब म्हणजे, ही चळवळ आणि संमेलनाची परंपरा कुठल्याही शासकीय अनुदानाविना फक्त पक्षिमित्रांच्या सहकार्याने अखंडितपणे सुरू आहे.
गेल्या ४२ वर्षांत महाराष्ट्र पक्षिमित्रचे ३५ राज्यस्तरीय पक्षिमित्र संमेलने तसेच ३० पेक्षा जास्त विभागीय संमेलने राज्यभरात पार पडली असून, काल-परवाच दि. २३-२४ डिसेंबरदरम्यान ३६वे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन सांगली या ठिकाणी पार पडले. सांगली येथील ’बर्डसाँग एज्युकेशन’ या संस्थेच्या यजमानपदाखाली शांतिनिकेतन लोकविद्यापीठ परिसरात मोठ्या उत्साहात पार पडले. या संमेलनासाठी राज्यभरातून सुमारे २५० प्रतिनिधी सहभागी झाले होते.
या संमेलनाची आयोजक संस्था ’बर्ड साँग’चे प्रणेते शरद आपटे हे स्वतः पक्ष्यांच्या आवाजाचे व पक्ष्यांच्या गाण्याचे तज्ज्ञ असून, त्यांनी भारतातील अनेक पक्ष्यांचे आवाज रेकॉर्ड केलेले असून, त्यांचा या विषयातील अभ्यास बघता, ते भारतातील पक्ष्यांच्या आवाजाचे तज्ज्ञ व पिसांचे तज्ज्ञ म्हणून परिचित आहेत, त्यामुळे या संमेलनाची मध्यवर्ती संकल्पना अर्थातच ’पक्ष्यांची पिसे’ असा आहे. तसेच संमेलनाच्या आधीच्या दिवशी ’पक्ष्यांचे गाणे पक्ष्यांचे आवाज’ या विषयावर एका कार्यशाळेचे आयोजनसुद्धा करण्यात आले होते.
महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनाची दरवर्षी एक मध्यवर्ती संकल्पना असते व त्या संकल्पनेवर आधारित तज्ज्ञांची व्याख्याने तसेच सहभागींची सादरीकरणे यांवर संमेलनात विशेष भर दिला जातो. या संमेलनाची मध्यवर्ती संकल्पना ज्यावेळी जाहीर करण्यात आली. त्यावेळी अनेकांसाठी हा विषय थोडा अपरिचित व क्लिष्ट होता. त्यामुळे या विषयावर नेमकी काय चर्चा होईल, अशी शंका आणि चर्चा पक्षिमित्रांमध्ये होती. मात्र, हे दोन्ही विषय अलीकडे नव्याने संशोधन सुरु झालेले विषय असून, पक्षी निरीक्षणाची व अभ्यासाचा परिघ यामुळे विस्तारला जाणार आहे.
संमेलनाच्या आधीच्या दिवशी आयोजित केलेल्या ’पक्ष्यांची भाषा पक्ष्यांचे आवाज’ या विषयांवरील पहिले राष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्राचे आयोजनसुद्धा वैशिष्ट्यपूर्ण असे ठरले. या संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी प्रसिद्ध लेखक ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक डॉ. एरिक भरूचा गोवा येथील पश्चिम घाट संवर्धनासाठी कार्य करणारे राजेंद्र केरकर, संमेलनाध्यक्ष अजित उर्फ पापा पाटील, ’महाराष्ट्र पक्षिमित्र’चे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर व आयोजक संस्थेचे शरद आपटे यांची उपस्थिती होती. या उद्घाटन सोहळ्यामध्ये काही पक्षीविषयक पुस्तके, पक्षी याद्या व पक्षी विषयावरील दिनदर्शिकांचे प्रकाशन झाले. या प्रकाशनामध्ये सर्वात महत्त्वाचे प्रकाशन झाले, ते शरद आपटे लिखित ’पक्षिगान... का? केव्हा? कोठे?’ हे पुस्तक संमेलनाच्या संकल्पनेशी समरूप असल्याने, किंबहुना पुस्तकाच्या विषयाशी संबंधित संमेलनाची संकल्पना होती, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
आपटेेंचे हे पुस्तक म्हणजे पक्ष्यांचे आवाज व पक्ष्यांचे गाणे या विषयावरील मराठीतील पहिलेच व इतक्या सखोलपणे अभ्यास व निरीक्षणे असलेले भारतातील पहिलेच पुस्तक असावे. पक्ष्यांच्या आवाजाचे रेकॉर्डिंग करण्यासाठी व अभ्यासक्रमासाठी महत्त्वपूर्ण दस्तावेज असणार आहे. या संमेलनामध्ये संकल्पनेवर आधारित तज्ज्ञांच्या वेगवेगळ्या व्याख्यानांचे नियोजन करण्यात आले होते. यामध्ये ’पक्ष्यांची पिसे’ या विषयावरील भारतातील तज्ज्ञ तथा ’फेदर्स लायब्ररी’ म्हणजेच पक्ष्यांच्या व बंगळुरू येथील (NCBC) येथील क्यूरेटर इशा मुंशी यांचे पक्ष्यांच्या पिसांची सखोल माहिती देणारे, व्याख्यान सर्व सहभागींसाठी महत्त्वाची उपलब्धी ठरले. या व्याख्यानातून ‘पक्ष्यांची पिसे’ हा पक्षी अभ्यासातील एक महत्त्वाचा घटक असून, त्यावर अभ्यास करता येऊ शकतो, असा महत्त्वपूर्ण संदेश या दिला गेला. इशा मुंशी यांना विचारल्या गेलेल्या प्रश्नांमधून ते प्रतीत झालं. याच विषयावरील दुसरे सादरीकरण आयसर पुणे येथील संशोधक प्रा. श्रेयस मानगावे यांचे झाले. ’पक्ष्यांची पिसे काय सांगतात’ या आपल्या सादरीकरणामधून मानगावे यांनी पिसांच्या अभ्यासावरून, त्यांच्या मागील जीवनाचा त्याच्या भूतकाळातील परिस्थितीचा ’आयसोटॉप’ अभ्यासावरून कसा अभ्यास केला जातो, अशी महत्वपूर्ण माहिती याव्दारे मिळाली.
याशिवाय ‘पक्ष्यांची पिसे’ हा विषय घेऊनच, पुढील सादरीकरण झाले, ते भारतातील प्रसिद्ध छायाचित्रकार बैजू पाटील यांचे ‘पिसे आणि पिसारा’ या विषयावर. याशिवाय दरवर्षी महाराष्ट्रभरात पक्ष्यांची निरीक्षणे व अभ्यास करणारे अभ्यासक दरवर्षी संमेलनात आपला अभ्यास मांडत असतात. या अभ्यासकांची सादरीकरणेसुद्धा वैशिष्ट्यपूर्ण ठरलीत. यामध्ये ‘गालापॅगोस बेटाची सफर’ या विषयावरील डॉ. संदीप श्रोत्री, संशोधक डॉ. रोहित बानिवडेकर यांचे ’कृषी वनकरणातील पक्षी’ संशोधक डॉ. पूजा पवार यांचे ’शहराचा पक्षी नकाशा’ ही सादरीकरणे महत्त्वाची होती.
हे संमेलन पक्ष्यांची पिसे व त्यांचा अभ्यास कसा केला जाऊ शकतो, याबाबत मार्गदर्शन करणारे ठरले असून पक्ष्यांचे आवाज म्हणजे काय, ते गाणे केव्हा गातात, अशा प्रश्नांची उत्तरे तर यातून मिळालीच. शिवाय आवाजाचा अभ्यास करून, आणखी चांगले पक्षी निरीक्षण व पक्षी अभ्यास केला जाऊ शकतो. हे पक्षिमित्रांना माहिती झाले. दुपारच्या जेवणाच्या सत्रानंतर पक्षिमित्रांचे खुले चर्चासत्र पार पडले. यानंतर पक्षिमित्र संमेलनाचा समारोप झाला आणि महाराष्ट्रभरातून आलेले पक्षिमित्र आपल्याला गावाकडे परतले. येथील शांतिनिकेतन लोकविद्यापीठ या शाळेचा परिसर आणि येथील आदरातिथ्य व संमेलनात चर्चा झालेेले विषय पक्षिमित्रांच्या कायमच स्मरणात राहतील.
डॉ. जयंत वडतकर
(लेखक महाराष्ट्र पक्षिमित्र संघटनेचे अध्यक्ष आहेत.)