समावर्तन संस्कारानंतर विवाह संस्काराचा क्रम येतो. सदरील वैदिक षोडश संस्कार मालिका सुरू होण्यापूर्वीच ‘विवाह संस्कार’ या विषयावर अनेक भागांमधून यापूर्वीच लेखमाला प्रकाशित झाली आहे. त्यामुळे आजच्या स्तंभात विवाह संस्कारावर अगदीच संक्षेपाने प्रकाश टाकण्यात आला आहे.
समञ्जन्तु विश्वे देवा:
समापो हृदयानि नौ।
सं मातरिश्वा सं धाता
समु देष्ट्री दधातु नौ॥
(ऋग्वेद-१०/८५/४७,
पारस्कर गृह्यसूत्र-१/४/१४)
अन्वयार्थ
(वर आणि वधू दोघेही म्हणताहेत - )(विश्वे देवा:) या विवाह संस्कारात उपस्थित असलेल्या सर्व थोर दिव्यज्ञानी, विद्वान व थोर वडीलधारी मंडळींनो (समञ्जन्तु) आम्ही दोघेही प्रसन्नतेने एक दुसर्यांना स्वीकारत आहोत.(नौ) आम्हां दोघांची (हृदयानि) हृदये (आप:) दोन नद्यांच्या पाण्याप्रमाणे (सम्) शांत व एक दुसर्यात मिसळलेले राहोत. ज्याप्रमाणे (मातरिश्वा) प्राणवायू सर्वांना प्रिय आहे, त्याचप्रमाणे (सम्) आम्ही एक दुसर्यांना प्रिय बनोत. जसे (धाता) धारण करणारा परमेश्वर (सम्) सर्व वस्तूंमध्ये मिसळून जगाला धारण करीत आहे, तसे आम्ही एक दुसर्यांना धारण करोत. ज्याप्रमाणे (समुदेष्ट्री) उपदेशक-वक्ता आपल्या समोरच्या श्रोत्यांवर प्रेम करतो, तसे (नौ) आम्ही दोघेही एक दुसर्यांवर आत्मवत प्रेम करीत (दधातु) परस्परांना धारण करोत.
विवेचन
समावर्तन संस्कारातील निरोपाच्या प्रसंगी आचार्यांनी आपल्या स्नातक शिष्यास अत्यंत मोलाचा उपदेश दिला होता. पितृकुळी व सामाजिक जीवनी व्यवहारात जगताना त्याने कसे आचरण करावे? यासंदर्भात बरेच मार्गदर्शन केले होते. त्याच प्रसंगात एक अपेक्षा व्यक्त करताना ते म्हणाले होते-
आचार्याय प्रियधनं आहृत्य प्रजातन्तुं मा व्यवच्छेत्सी!
म्हणजेच आचार्यांकरिता आवडणारे असे प्रिय धन आणून तू त्यांना प्रदान कर आणि प्रजेचा धागा तोडू नकोस!
आचार्यांचे प्रिय धन आहे तरी कोणते? कारण, त्यांना इतर कोणत्याही भौतिक धनाची मुळीच अपेक्षा नाही. त्यांस वाटते की, आपल्या शिष्यांची परंपरावेल अशीच उंचापर्यंत वाढत राहो. प्रजा म्हणजे शिकण्यास येणारे विद्यार्थी हेच त्यांचे खरे आवडते धन हे विद्यार्थी त्यांना कोठून मिळणार?गुरुकुलातून शिक्षण संपून एक एक विद्यार्थी पित्रगृही गेल्यानंतर आता गुरुकुलात राहणार कोण? म्हणून गुरुकुलातून निरोप घेणार्या विद्यार्थ्यांनाच ते म्हणतात की, “तुम्ही माझ्या आश्रमी पुन्हा तुमचीच मुले विद्यार्थी म्हणून इथे पाठवा, यासाठी युवक शिष्यांनो, आता तुम्ही विवाह करावा व आदर्श संतती जन्माला घालावी.” असे करणे म्हणजेच प्रजानिर्मितीचा धागा न तोडणे होय. दुसरी गोष्ट म्हणजे पितृऋणाचे ओझे उतरविणे या दोन्ही जबाबदार्या पूर्ण करण्यासाठी गृहस्थाश्रम प्रवेश आवश्यक आहे.
आपल्या आचार्यांचा उपदेश शिरोधार्य मानून गुरुकुलाचा युवा स्नातक पितृगृही येतो. आई-वडील आणि घरातील ज्येष्ठ मंडळी हे त्याच्या इच्छेच्या अनुकूल योग्य अशा कन्येचा शोध घेऊन विवाह जुळवितात आणि सर्वांच्या साक्षीने विवाह संस्कार पार पाडला जातो. मनुस्मृती, याज्ञवल्क्य स्मृती व नारदस्मृतींमध्ये विवाहाच्या आठ प्रकारांचा उल्लेख आढळतो. मनुस्मृतीत (३/९) म्हटले आहे-
ब्राह्मो दैवस्तथैवार्ष: प्राजापत्यस्तथासुर:।
गान्धर्वो राक्षसश्चैव पैशाचश्चाष्टमोऽधम:॥
म्हणजेच ब्राह्म, दैव, आर्ष, प्राजापत्य, असुर, गांधर्व, राक्षस आणि पिशाच हे विवाहाचे आठ प्रकार आहेत. यातील पहिले चार उत्तम मानले जातात, तर नंतरचे चार अधम व निकृष्ट समजले जातात.
पहिल्या चार प्रकारच्या विवाहप्रसंगी अग्निहोत्रपूर्वक जो विधी केला जातो, तो म्हणजेच वैदिक विवाह संस्कार! विवाह निश्चित करण्यापूर्वी मुलगा व कन्येचे गुण कर्म स्वभाव आणि विचार यांची साम्यता पाहणे गरजेचे ठरते. त्याबरोबरच रंग, रूप, विद्या, धन व कुळ यांच्या एकरुपतेचाही विचार करणे गरजेचे असते. जेव्हा या सर्व गोष्टी जुळून आल्या की, वाणीचा निश्चय केला जातो यालाच ‘वाङनिश्चय’ किंवा ‘वाग्दान विधी’ असेही म्हणतात. आजकालच्या युगात यालाच ‘साखरपुडा’ या नावाने ओळखले जाते. खरे तर हा विधी म्हणजे एक प्रकारे विवाहाचाच एक भाग. म्हणूनच विवाहाच्या काही दिवस अगोदर किंवा पूर्वसंध्येला हा विधी संपन्न केला जातो.
आता शुभवेला येते ती विवाह संस्काराची विद्वान ब्रह्मवृंद, घरातील ज्येष्ठ परिजन, नातलग, पाहुणे, आप्तेष्ट, मित्रजन या सर्वांच्या समोर अग्निदेवतेच्या साक्षीने वेदांना अनुकूल धार्मिक विधी संपन्न केला जातो. विवाह म्हणजे नवदाम्पत्याच्या खांद्यावर पडणारी गृहस्थ आश्रमाची मोठी जबाबदारी वधू-वरांच्या माध्यमाने जिथे राष्ट्र व समाजाला आदर्श संतती लाभणार आहे, तिथे ब्रह्मचर्य, वानप्रस्थ आणि संन्यास या तिन्ही आश्रमांची जबाबदारीदेखील या गृहस्थाश्रमींवर पडणार आहे. ‘वि’ म्हणजे विशेष प्रकारे, तर ‘वाह’ म्हणजे वहन करणे !
सामान्यपणे वधूच्या गृहीच हा विवाह संपन्न केला जातो. प्रथमतः स्वागत विधी म्हणजेच भेटीगाठीचा कार्यक्रम पार पडतो. नंतर नवरी लग्नघरी आलेल्या नवरदेवाचे औक्षण करून पुष्पवृष्टीने स्वागत करते. त्यानंतर ती आसन, जल, मधुपर्क या गोष्टी प्रदान करून वराचा सत्कार करते. पुढे गोदान व कन्यादान विधी संपन्न होतो. वराकडून देखील वधूचे स्वागत केले जाते. नूतन वस्त्रे परिधान केलेले वर व वधू हे अग्निदेवतेसमोर उभे राहून उपस्थितांना अभिवादन करतात. त्यावेळी हे दोघेही वरील प्रतिज्ञा मंत्र म्हणतात-
समञ्जन्तु विश्वे देवा: समापो हृदयानि नौ !
हा मंत्र खरे तर विवाह संस्काराचा सारांश आहे. नव वर-वधू दोघेही एकरूपतेचा संकल्प करीत आहेत. ज्याप्रमाणे दोन नद्यांचे पाणी एकत्र केल्यावर त्यास कोणीही वेगळे करू शकत नाही. त्याचप्रमाणे या दोघांची हृदये आज सर्वांच्या साक्षीने एकरूप होत आहेत. किती मोठी विशाल भावना आहे ही. या मंत्रानंतर एक मंगल प्रदक्षिणा केली जाते. तत्पश्चात अग्निहोत्र प्रारंभ केला जातो व बृहद्विधी संपन्न होतो. याच यज्ञात राष्ट्रभृत, जया व अभ्यातान होम यांच्याही आहुत्या प्रदान केल्या जातात व नवदाम्पत्यांमध्ये राष्ट्रीय कर्तव्य, विजयाची भावना आणि सर्वांगीण उन्नतीचा संकल्प करविला जातो.
त्यानंतर पाणिग्रहणाचे सात मंत्र उच्चारत वर आपल्या उजव्या हातात वधूचा उजवा हात ग्रहण करतो. आजपासून आम्ही धर्मपूर्वक पती-पत्नी होत आहोत. पतीने पत्नीव्रत धारण करावयाचे व पत्नीने पतिव्रता बनायचे यापुढे कोणत्याही कर्तव्य-कर्माचे अधिष्ठान हे सत्य-धर्म असेल, याबाबत दक्ष राहावयाचे. यानंतर संपन्न होतो तो शिलारोहणविधी शिळा म्हणजे पाषाणाचा दगड वधूचा भाऊ आपल्या ताईचा उजवा पाय शिळेवर ठेवतो आणि तिच्या पायाला स्पर्श करीत विनंती करतो की, पतिघरी ताईने मर्यादेत राहून सर्वांशी सद्व्यवहार ठेवावा. आपल्या पितृकुळाचे नाव बदनाम होईल, अशा प्रकारचा दुर्व्यवहार तेथे करू नये. याप्रसंगी वर शिळेवर पाय ठेवलेल्या वधूकडे पाहत भावना व्यक्त करतो की, आपल्या पत्नीने जीवनभर पृथ्वीप्रमाणे सहनशील राहावे. शिळा कधीही झिजत नाही, त्याप्रमाणे आपल्या पत्नीने गार्हस्थ जीवनात येणारी सुख-दुःखे , हानी-लाभ इत्यादी द्वंद्वे सहन करावीत व जीवनभर धैर्यपूर्वक आणि कणखरपणे मोलाची साथ द्यावी. यानंतरचा पुढील विधी येतो तो लाजाहोमाचा. पती-पत्नी आपल्या ओंजळीने अग्निकुंडात लाह्या समर्पित करतात. यावेळी ते चार प्रदक्षिणा घालतात. या चार प्रदक्षिणांमागचा उद्देश म्हणजे धर्म, अर्थ, काम व मोक्ष या चार पुरुषार्थांना प्राप्त करणे होय.
त्यानंतर शेवटी ‘सप्तपदी’ हा महत्त्वाचा विधी मानला जातो. वर व वधू या दोघांनाही समानगतीने व समान विचाराने सात पावलेसोबत चालावयाची आहेत. यातील पहिले पाऊल हे अन्नाच्या प्राप्तीसाठी, दुसरे पाऊल ऊर्जा व शक्तीच्या संवर्धनासाठी, तिसरे पाऊल धनाच्या प्राप्तीसाठी, चौथे पाऊल सुखसंवर्धनासाठी, पाचवे पाऊल आदर्श संततीसाठी, सहावे पाऊल सहा ऋतूप्रमाणे वेळेवर दिनचर्या ठेवण्यासाठी आणि निसर्ग नियमांचे पालन करण्यासाठी, तर सातवे पाऊल हे अखंड मैत्रीपूर्ण संबंधांसाठी सप्तपदीनंतर सूर्यदर्शन, हृदयस्पर्श हे विधी पार पडतात व त्यानंतर वर हा वधूला जोडवे, दागिने व मंगळसूत्र प्रदान करतो. तसेच सौभाग्याचे लेणे म्हणून ओळखले जाणारे कुंकू वधूच्या कपाळी लावून तिला सौभाग्यवती बनवतो. शेवटी एक दुसर्यांच्या गळ्यात मोहक पुष्पहार समर्पित करून वधू-वर हे एक दुसर्याला पती-पत्नी म्हणून स्वीकारतात. त्यानंतर विवाह मंडपात उपस्थित असलेले सर्व मान्यवर वेदमंत्र उच्चारणपूर्वक शुभं भवतु, सौभाग्यम् अस्तु...! असे म्हणत नवदाम्पत्यावर फुलांचा वर्षाव करून आशीर्वाद प्रदान करतात.
प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य
९४२०३३०१७८