कष्टाची स्वयंसिद्धा!

    19-Dec-2023
Total Views | 65
Article on Rekha Kabare

लहानपणीच रेखा यांची आई वारली. वडिलांचेही रेखा यांच्यासह भावंडांवर दुर्लक्ष झाले. लग्नानंतर संसाराला हातभार लागावा म्हणून सुरू केलेल्या पुणे येथील उद्योजिकेची प्रेरणादायी वाटचाल!

भारतीयांच्या आहारात चपाती, ज्वारी, बाजरी, तांदळाची भाकरी यांचे महत्त्वाचे स्थान आहे. याच चपाती, भाकरी बनवून त्याची विक्री करण्याचा व्यवसाय पुण्यातील स्वारगेट जवळील घोरपडे पेठ येथील रेखा संतोष काबरे यांनी २००१ साली सुरू केला. रेखा यांचे सहावीपर्यंत शिक्षण झाले आहे. लहानपणीच त्यांची आई वारल्याने वडिलांचेही त्यांच्यासह भावंडांवर दुर्लक्ष झाले. रेखा यांचे पाच भावंड आहेत. थोरल्या भावाने सर्वांचा सांभाळ केला व जेवढं शक्य होईल तेवढ सर्वांचे शिक्षणदेखील केले. रेखा यांची आई स्वर्गवासी झाली तेव्हा फक्त एक भाऊ आणि बहिणीचं लग्न झालं होत. दरम्यान, घरची परिस्थिती हलाकीची झाली असल्याने रेखा यांनादेखील लवकर लग्न करावे लागले.

रेखा यांच्या पतीच जास्त शिक्षण झाले नसल्याने त्यांना हवी तशी नोकरी मिळत नसल्याने सुरुवातील त्यांना मदत व्हावी म्हणून रेखा ‘लिज्जत’ कंपनीमध्ये पापड लाटून देत असत. दरम्यान, त्यांच्या सासू यांचा पुण्यातील मंडईत भाजी विकायचा व्यवसाय होता, हॅाटेलवाले त्यांच्याकडून भाज्या घेऊन जात असत. एकदा चपाती करून द्याल का? अशी विचारणा हॅाटेलवाल्यांनी रेखा यांना केली, तेव्हा रेखा यांनी होकार देत प्रारंभी घरातूनच चपाती करून त्याची विक्री सुरू केली. २५ चपात्यांच्या मागणीने सुरुवात झाली होती, हळूहळू मागणी वाढत जाऊन पुढे चपात्यांची संख्या वाढतच गेली. तेव्हा त्यांना महिला मदतनीसांची गरज वाटू लागली. प्रथम दोन महिला मदतीला घेतल्या, नंतर त्यांची संख्या २१ वर आहे. नंतर त्यांनी ‘अन्नपूर्णा महिला गृहउद्योग’ असे त्याच्या व्यवसायाच नाव ठेवले.

आज अन्नपूर्णा महिला उद्योगात दररोज सहा हजार चपाती, चार हजार भाकरी करायचे काम करतात. त्यांना ऑर्डर खूप येत असतात. परंतु, त्यांच्या सहकार्‍यांवर कामाचा ताण येऊ नये म्हणून त्या स्वतः जास्त ऑर्डर्स घेत नाही. जेवढं शक्य आहे तेवढीच ऑर्डर्स त्या घेत असतात. सुरुवातीला महिलांना आठवड्याचा पगार दिला जात असे, आता महिना पूर्ण झाला की वेळेवर पगार दिला जातो. यातील अनेक महिला सुरुवातीपासून रेखा यांच्यासोबत काम करत आहेत, त्यांचा अनुभव तसंच कामाचा वेग यानुसार कमीत कमी १२ हजार ते जास्तीत जास्त १६ हजारांपर्यंत पगार दिला जातो.

सुरुवातीला रेखा यांच्या घरातून काम चालत असे. परंतु व्यवसाय वाढला तशी घरातील जागा अपुरी पडू लागली. तसं रेखा यांनी दुसरं युनिट सुरू केलं. दोन्ही ठिकाणी दोन शिफ्टमध्ये हे काम चालतं. सुरुवातीला सगळं काम हातानं व्हायचं. आठ वर्षांपूर्वी पाच किलो कणिक भिजवता येईल अशा क्षमतेचं मशीन वापरायला त्यांनी सुरुवात केली. जसं, जसं काम वाढत गेलं तसं दहा किलो क्षमतेचं मशीन त्यांनी खरेदी केलं. मशिनवर कणिक मळण्याचे हे काम एक महिला करते. बाकी पुढचं सगळं काम हाताने चालते. भाकरीचं पीठ आजही हातानेच मळले जाते. दरम्यान, रेखा यांच्या पतीचे २०१६ साली निधन झाले, त्यांचा पतीचा व्यवसायास भरपूर पाठिंबा होता, पोळ्यांची डिलिव्हरीचे करायचे काम ते स्वतः करत असत. आज रेखा यांच्या दोन लेकी समृद्धी आणि ऐश्वर्या व त्यांचे बंधू सुधीर त्यांच्या व्यवसायात मदत करतात.

अन्नपूर्ण महिला गृह उद्योगाला व्यवसाय करण्याच लायसन्स मिळाले आहे. दोन्ही युनिटमध्ये स्वच्छतेचे नियम काटेकोरपणे पाळले जातात. प्रत्यक्ष ग्राहकांसमोर सगळं काम चालते. विशेष म्हणजे, चपाती/भाकरी घ्यायला आलेले ग्राहक चपाती तयार होताना बघू शकतात. पोळ्या भाजण्यासाठी गॅस शेगडी वापरली जाते. व्यावसायिक वापरासाठीच्या वीस गॅस टाक्या दोन्ही युनिटमधे मिळून आहेत. मदतनीस महिलांचा पगार, जागेचं भाडं, गॅसचा, विजेचा खर्च, धान्य खरेदी, पीठं दळून आणणे आणि बाकी इतर सगळे खर्च वजा करता कष्ट असले तरी या व्यवसायात नफा आहे, असे रेखा सांगतात.

स्त्रियांनी घराबाहेर पडायला हवे त्याशिवाय घराबाहेरच्या जगात काय चाललंय ते कळणार नाही, तसेच जर खरच आयुष्यात काही तरी करण्याचे स्वप्न असल्यास काहीतरी करण्याचा पर्याय हा शोधावाच लागेल. कुठल्याही कार्याची सुरुवात ही प्रतिकूल परिस्थितीतूनच होत असते फक्त खचून न जाता आयुष्यात काही तरी स्वतःच्या हिमतीवर करण्याची जिद्द अंगी हवी. माझ्या आयुष्यातील आजवरचा जो काही प्रवास झाला तो मी कधीच ठरवून केलेला नाही व पुढेही तो ठरवून होणार नाही. माझ्यामुळे कोणाच्या जीवनात काही चांगली मूल्य जोडली जात आहे याचे मला समाधान आहे. माझ्यासारख्या बायकांच्या जीवनात रोजगार देऊन थोडंफार का होईना त्यांना स्वावलंबी बनवून परिवर्तन आणायचा असल्याचे रेखा आवर्जून सांगतात. रेखा काबरे यांना पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे हार्दिक शुभेच्छा.

गौरव परदेशी 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.
जरुर वाचा
काऊंटडाऊन सुरू, सुनिता विल्यम्स पृथ्वीवर परतणार! NASA कडून परतीच्या मोहिमेचं थेट प्रक्षेपण

काऊंटडाऊन सुरू, सुनिता विल्यम्स पृथ्वीवर परतणार! NASA कडून परतीच्या मोहिमेचं थेट प्रक्षेपण

Sunita Williams Return : ८ दिवसांच्या मोहिमेसाठी अंतराळात गेलेल्या नासाच्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि अंतराळवीर बुच विल्मोर तब्बल ९ महिन्यांपासून अंतराळात अडकले होते. बोईंग स्टारलायनरमध्ये झालेल्या काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांचा जेमतेम आठवड्याभराचा मुक्काम पाहता पाहता वाढत गेला आणि नऊ महिने उलटून गेले. आता अखेर त्यांच्या परतीचा मुहूर्त ठरला असून ते दोघेही भारतीय प्रमाणवेळेनुसार बुधवार दि. १९ मार्च रोजी पहाटे पृथ्वीवर परतणार आहेत. नासासह स्पेसएक्स आणि अमेरिकी सरकारच्या प्रयत्नांतून ..