छत्रपती संभाजीनगर : अध्यात्मिक गुरु धिरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणजेच बागेश्वर बाबा सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड आणि सकल हिंदू जनजागरण समितीतर्फे बागेश्वर धाम सरकारचा भव्य दिव्य महादरबार आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान, यावेळी एका मुस्लीम कुटुंबातील तब्बल १० लोकांनी हिंदू धर्मात प्रवेश करत घरवापसी केली आहे.
दिनांक ६, ७ आणि ८ नोव्हेंबर रोजी हा महादरबार आयोजित करण्यात आला होता. महादरबाराच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच ८ नोव्हेंबर रोजी अहमदनगरमधील जमीर शेख यांच्या कुटुंबातील १० लोकांनी घरवापसी केली आहे. बागेश्वर बाबांच्या हस्ते दीक्षा घेत त्यांनी हिंदू धर्मात प्रवेश केला आहे. तसेच बागेश्वर बाबांनी जमीर शेख यांचे नाव शिवराम असे ठेवले आहे.
यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, "मी लहानपणापासूनच सनातन धर्म मानत असून सनातन धर्माची पुजा करत आहे. जेव्हापासून मी बागेश्वर बाबांचे प्रवचन ऐकत आहे तेव्हापासून माझे ह्रदय जागे झाले," असे ते म्हणाले. तसेच माझ्यावर कोणाचीच जबरदस्ती नसून मी स्वत:च्या इच्छेने घरवापसी करत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.