मुंबई : ज्या लोकांनी धर्मांतर केले आहे, त्यासोबतच ज्यांनी आदिवासी समाजाच्या परंपरा, संस्कृती सोडली आहे. त्यांना अनुसूचित जनजातीच्या आरक्षणाचा लाभ घेण्याचा कोणताच अधिकार नाही, असे प्रतिपादन लोकसभेचे माजी उपाध्यक्ष करिया मुंडा यांनी केले. रविवार, दि. २६ नोव्हेंबर रोजी जनजाती सुरक्षा मंच कोकण प्रांत तर्फे मुंबईत ’ज्वाला डी लिस्टिंग महारॅली’ आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
शिवाजी पार्कपासून सुरु झालेल्या या महारॅलीचा समारोप जांबोरी मैदानात आयोजित महासभेने झाला. जनजाती सुरक्षा मंचाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या महारॅलीमध्ये आदिवासी समाजाने धर्मांतर करुन ख्रिश्चन आणि मुस्लिम झालेल्या लोकांना अनुसूचित जातींना मिळणारे आरक्षण रद्द करण्याची मागणी केली.
महारॅलीला संबोधित करताना करिया मुंडा म्हणाले की, “निसर्गाची पूजा करणारा आदिवासी हा हिंदूच आहे. पण अज्ञानामुळे आणि आदिवासींच्या गरीबीचा फायदा घेऊन त्यांचे धर्मांतरण करण्यात आले. आज देशभरात साडेआठ कोटी आदिवासींची संख्या आहे. त्यापैकी 80 लाख ख्रिश्चन तर 12 लाख मुसलमान म्हणून उघडपणे धर्मांतरित झाले. मुळात देशात आदिवासींकरिता केवळ सात टक्के आरक्षण आहे. धर्मांतरित आदिवासींमुळे इतर आदिवासी शासकीय योजना आणि आरक्षणाच्या लाभांपासून वंचित आहेत. सूर्य, चंद्र, वनस्पती, प्राणी, जलवायू, आकाश यांची पूजा करणारे आदिवासी हेच खरे सनातनी आहेत,” असेही ते म्हणाले.
या रॅलीत डॉ. रमणगिरी महाराज यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, “आदिवासी समाज हा भारतीय सनातन संस्कृतीचा कणा आहे. भारतीय संस्कृतीचे मुळच आदिवासी संस्कृतीमध्ये आहे. याच संस्कृतीच्या रक्षणासाठी संविधानाने आरक्षण दिले होते. पण आज धर्मांतरित झालेले लोकं, ही संस्कृती, पंरपरा पाळत नाही. त्यामुळे त्यांना आरक्षणाचा लाभ घेण्याचा सुद्धा अधिकार नाही.
या रॅलीमध्ये हजारो आदिवासी समाज बांधव सहभागी झाले होते. त्यासोबतच मंचावर आदिवासी समाजाच्या विकासासाठी काम करणार्या ठमाताई पवार, संतोष जनाठे, ह.भ.प. वाघुले महाराज उपस्थित होते. त्यासोबतच जनजाती सुरक्षा मंचाचे कोकण प्रांत संयोजक विवेक करमोडा आणि सहसंयोजक सुदाम पवार हे देखील उपस्थित होते.
जो भोलेनाथ का नहीं, वह मेरी जात का नहीं
हजारोंच्या संख्येने उपस्थित आदिवासी समाजाच्या घोषणांनी छत्रपती शिवाजी महाराज पार्क ते जांभोरी मैदानाचा रस्ता दणाणून सोडला. सकाळी पडलेला पाऊस आणि त्यानंतर मुंबईतील दमट वातावरण रॅलीमध्ये सहभागी झालेल्या आदिवासी बांधवांच्या उत्साहावर परिणाम करु शकला नाही. या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या आदिवासी बांधवांनी ’जो भोलेनाथ का नहीं, वह मेरी जात का नहीं’ अशा घोषणा दिल्या.
पारपांरिक नृत्यातून आदिवासी संस्कृतीचे दर्शन
रॅलीमध्ये सहभागी झालेल्या आदिवासी समाजाने पारंपारिक नृत्याने आपल्या संस्कृतीचे दर्शन मुंबईकरांना घडवले. सभास्थळी आणि रॅलीदरम्यान, वेगवेगळ्या गटांनी ठिपरी नृत्य, नंदी नृत्य, ढोलनाथ नृत्य इत्यादी पारंपारिक नृत्यकला सादर केल्या.
आज संविधान दिवस आहे. आजच्याच दिवशी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले होते. त्यावेळी संविधानात आरक्षण कोणाला मिळणार याचा स्पष्ट उल्लेख होता. पण पूर्वीच्या सरकारच्या दबावामुळे अदिवासींचे मोठ्या प्रमाणावर धर्मांतरण झाले. ही लोक धर्मांतरण सुद्धा करतात आणि आरक्षणाचा सुद्धा लाभ घेतात. हे कसे चालणार? म्हणून जनजाती सुरक्षा मंचाने रॅली आयोजित केली आहे. या रॅलीमध्ये हजारोंच्या संख्येने जनजाती समूह उपस्थित आहेत. जोपर्यंत डि-लिस्टिंग होत नाही, तोपर्यंत हा लढा सुरु राहणार!
-मंगलप्रभात लोढा, कौशल्य विकास मंत्री
धर्मांतरित आदिवासी कुठल्याही पंरपरा पाळत नाही!
मुंबईमध्ये संपूर्ण कोकण प्रांतातून साधारणता 25 हजार लोकांची उपस्थिती या महारॅलीला आहे. या महारॅलीमध्ये एकच मागणी आहे, जे आदिवासी धर्मांतरीत झाले असतील त्यांना आरक्षण सूचीतून वगळण्यात यावे. कारण त्यांना दोनदा लाभ मिळत आहे. धर्मांतर करुन ख्रिश्चन किंवा मुस्लिम झाल्याने ते अल्पसंख्याकांना मिळणारे लाभ घेत आहेत. त्यासोबत आदिवासी समाजाला जे आरक्षण मिळत आहे, त्याचा सुद्धा ते लाभ घेत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षणाच्या कलम 342 मध्ये अशी तरतूद केली की, आदिवासी समाजाच्या पंरपरा आहेत, रुढी आहेत. त्यांच्या विशिष्ट पूजापद्धती आहेत. त्यांचे पालन जो करेल, त्यांना हे आरक्षण मिळावे. पण धर्मांतरित आदिवासी कुठल्याही पंरपरा पाळत नाहीत. त्यामुळे समाजासमोर एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आमची सरकारकडे मागणी आहे की, कलम 342 मध्ये सुधारणा करुन धर्मांतरित झालेल्यांना आरक्षण सूचीतून वगळण्यात येईल.
- विवेक करमोडा, कोकण प्रांत संयोजक, जनजाती सुरक्षा मंच