ही दि. १ फेब्रुवारी, १९८६ची आठवण आहे. अयोध्येतील रामजन्मभूमीला वादग्रस्त-विवादास्पद ठरवून डिसेंबर १९४९ मध्ये तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंच्या कारकिदीर्र्त कुलूप ठोकण्यात आले होते आणि सकल हिंदू समाजाला, रामभक्तांना कुलूपबंद लोखंडी दरवाजाच्या बाहेरूनच रामललाचे दर्शन घ्यावे लागत होते. दरवाजाबाहेर एक छोटासा चौथरा-कट्टा बांधला होता व त्या कट्ट्यावर रामभक्त फुले, फळे अर्पण करून समाधान मानत होते. तब्बल ३५ वर्षांनंतर दि. १ फेब्रुवारी, १९८६ रोजी फैजाबाद न्यायालयाने निर्णय दिला आणि अत्यंत अनपेक्षितपणे तो निर्णय हिंदू समाजाची अनेक वर्षांची ’कुलूप उघडा व रामललाचे दर्शन घेऊ द्या’ या मागणीला रास्त न्याय देणारा होता. न्यायालयाचा आदेश होताच त्याच रात्री प्रशासनाने रामजन्मभूमीच्या दरवाजाला लावलेले कुलूप काढले आणि समस्त भाविकांना रामजन्मभूमीच्या घुमटवजा छताखालील श्रीराम मूर्ती दर्शनासाठी खुली झाली.
दि. १ फेब्रुवारी, १९८६ शनिवारचा दिवस होता. पुण्याच्या दै. ‘तरुण भारत’च्या थोरले बाजीराव पेशवे रस्त्यावरील ’भारत भवन’मधील कार्यालयात, मी मुख्य उपसंपादक म्हणून दुपारी ३ ते ९ अशा पाळीत काम करीत होतो. सायंकाळी ६.३०- ७ वाजण्याच्या सुमारास टेलिप्रिंटरची घंटी वाजली. फ्लॅश म्हणजे त्यावेळची एक ’ब्रेकिंग न्यूज’ आली की, टेलिप्रिंटरची घंटी वाजत असे. मी टेलिप्रिंटर वरील बातमी टाईप झालेला कागदाचा भाग कापून हाती घेतला आणि बारकाईने वाचला-’रामजन्मभूमी विवादास्पद जागेचे कुलूप उघडण्याचा फैजाबाद न्यायालयाचा आदेश. ’अयोध्येचा विषय त्याकाळातील संघ, विहिंप एवढेच नव्हे, तर सर्व देशाचाच चर्चेचा केंद्रबिंदू होता. बातमी वाचून मला आनंदयुक्त आश्चर्याचा धक्काच बसला. त्यावेळी ही फार मोठी बातमी होती, संपादकांना कळवायचे तर मुख्य संपादक चित्तरंजन पंडित मुंबईला गेलेले होते. पण, योगायोगाने काही कामानिमित्त कार्यकारी संपादक बाळ भिडे कार्यालयात आलेले होते आणि त्यांच्या केबिनमध्ये वाचत बसले होते. त्यांनीही टेलिप्रिंटरची ’फ्लॅश न्यूज’ देणारी घंटी ऐकली होती आणि ’काय आहे रे विद्याधर फ्लॅश?’ अशी जागेवरूनच विचारणा केली होती.
’रामजन्मभूमीचे कुलूप काढण्याचे न्यायालयाचे आदेश’ एवढी ओळ माझ्या तोंडून ऐकताच ते ताडकन उठले आणि संपादक कक्षातील माझ्या खुर्चीसमोर येऊन बसले. मोठ्या अधीरतेने त्यांनी सर्व बातमी वाचली आणि आनंद व्यक्त केला. मी या बातमीला थोडी पार्श्वभूमी लिहून देतो असे म्हणून तेथेच लिहू लागले. एवढ्यात त्यांना आठवले की, मोतीबाग कार्यालयात प्रांत संघचालकांच्या उपस्थितीत बैठक चालू आहे. त्यांनी मला त्याबद्दल सांगितले व ताबडतोब स्कूटरवर मोतीबागेत जाऊन प्रल्हादजी अभ्यंकर, दामूअण्णा दाते यांना ही बातमी सांगून - दाखवून ये’ म्हणाले. (तेव्हा आजच्यासारखे मोबाईल नव्हते. मोतीबाग कार्यालयातील दूरध्वनी तळमजल्यावर होता आणि बैठक दुसर्या मजल्यावर होती, त्यामुळे दूरध्वनीवर प्रल्हादजींशी संपर्क शक्य नव्हता.)
मी बातमी घेऊन मोतीबागेत गेलो आणि बैठकीमध्ये जाऊन प्रल्हादजींच्या हाती बातमीचे कागद देत ’रामजन्मभूमीचे कुलूप उघडले’ म्हणालो. त्यांनी ही सर्व बातमी वाचली आणि बैठकीतील सर्वांना वाचून दाखवली. ’जा रे पेढे आणा, जा’ म्हणून व्यवस्थेतील स्वयंसेवकाला सांगितले. उपस्थित सर्वांनी एकच जल्लोष केला ’जय श्रीराम’ ‘पेढे आणायला वेळ लागेल, मला दैनिकाच्या आवृत्तीचे काम आहे. शनिवारमुळे संपादक मंडळातील अनेकांची सुट्टी असते. बाळ भिडे कार्यालयात माझी वाट पाहत आहेत, मी जातो’ असे मी प्रल्हादजींना म्हणालो. तेव्हा ’अरे, तुझेच प्रथम तोंड गोड केले पाहिजे, थोडी साखर तर घेऊन जा.’ म्हणत त्यांनी साखर मागवली. ती माझ्या हातावर देत, पाठीवर हर्षभराने थाप मारली.मी मोतीबागेतून परत येईपर्यंत बाळ भिडेंनी माझे सर्व संपादकीय कार्य पूर्ण केले होते व ’६ लाईन’ (७२ पॉईंटचा) मथळाही दिला होता. ’रामजन्मभूमी कुलूपमुक्त!’
- विद्याधर ताठे