मुंबई : गणित म्हटले की शिकणे तर अवघड आणि शिकवणेही अवघड. विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमातील हा विषय वेगळ्याच उत्कंठा आणि चिकित्सेने हाताळता यावा यासाठी एक अभिनव प्रयोग करण्यात आला. ताराबाई मोडक सेकंडरी इंग्लिश मिडीयम स्कूलने अनोखी शक्कल लढवत चक्क रिल्सचा आधार घेतला आहे. गणित सोपे व्हावे, यासाठी चक्क रिल्स तयार करून विद्यार्थ्यांना गणिताची गोडी लावण्याची किमया साधली आहे. त्यासाठी शाळेने रिल्सची नाविन्यपूर्ण स्पर्धादेखील आयोजित केली होती. या स्पर्धेचे विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षणतज्ज्ञांकडूनही कौतुक होत आहे.
माटुंग्याच्या हिंदू कॅालनीतील शिशुविहार संचालित ताराबाई मोडक शिक्षण केंद्र या संकुलामध्ये बालदिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय लंगडी स्पर्धेचे विजेते विद्यार्थीच प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ताराबाई मोडक सेकंडरी इंग्लिश मिडीयम स्कुलचे आर्यन दिवे, विभास जोशी, स्वरूप कडू, अनिश पोळेकर, हर्षल कोलगावकर व आदित्य जाधव या ६ विद्यार्थ्यांची महाराष्ट्र टीममध्ये निवड करण्यात आली होती. याच विद्यार्थ्यांच्या दमदार खेळाने महाराष्ट्राचा संघ प्रथम क्रमांकाचा विजेता ठरला.
ताराबाई मोडक सेकंडरी इंग्लिश मिडीयमच्या मुख्याध्यापिका दिपा सावंत-खोत यांच्या संकल्पनेतून हे गणिताचे रील्स साकार करण्यात आले आहेत. आजच्या पिढीचा कल हा मोबाईलकडे असल्याने या मोबाईलचा वापर करून कठीण गणिताची सोपी सोडवणूक आणि सोशल मिडियामुळे या विद्यार्थ्यांबरोबरच इतर विद्यार्थीसुद्धा आवडीने गणिते सोडवतील हा या रील्सच्या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता. ही कठीण गोष्ट सोपी करण्यासाठी गणित विषयाचे शिक्षक प्रशांती ध्यावरीशेट्टी, रोहित मण्यार व दिव्या धारूरकर यांचे मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळाले.
या कार्यक्रमासाठी शिशुविहार मंडळाचे कार्याध्यक्ष राजेंद्र महाजन, कार्यवाह प्रशांत हडकर, सदस्या शीतल टिपणीस, अधिक्षिका वृंदा शिशुविहार माध्यमिकच्या मुख्याध्यापिका सुचित्रा कांबळे, ताराबाई मोडक प्रायमरीच्या प्रभारी अपर्णा केसरकर, शिशुविहार प्री-प्रायमरीच्या मुख्याध्यापिका सारिका पुरंदरे तसेच पालक शिक्षक संघाचे सदस्य व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.