सत्तर वर्षांच्या आठवणी

    25-Nov-2023
Total Views | 80
Suhas Hari Joshi on Motibag

मोतीबागेसंबंधी एक छोटासा लेख लिहिण्याचा प्रयत्न करीत आहे, अर्थात फार जुनी गोष्ट आहे सुमारे ७० वर्षांपूर्वीची गोष्ट. त्यावेळी मी दहावीत होतो आणि आमच्या शाखेवर निरोप आला. आपण प्रांतासाठी एक कार्यालय घेतलेले आहे. सरदार बिवलकर यांचा वाडा, तर त्यासाठी निधी जमा करायचा आहे. तेव्हा प्रत्येकाने पावती पुस्तक घ्यावे आणि घरोघरी जावे. मला एक पुस्तक देण्यात आले.

आता आठवते त्यानुसार एका अत्यंत छोट्या मिठाईच्या दुकानात गेलो. एक दाढीवाले सुदृढ गृहस्थ तिथे होते. मी त्यांना म्हटले, संघासाठी कार्यालय विकत घ्यायचे आहे. आपण निधी देता का, तर त्यांनी लगेच एक रुपया (म्हणजे मला वाटते सध्याचे दोनचारशे रुपये तरी होतील) दिले. मला फार आनंद झाला. आमचे कार्यवाह बाळकृष्ण कुलकर्णी हे दहावीत होते. त्यांनी निधी गोळा केला. त्यावरून आम्हाला स्फूर्ती मिळाली आणि घरोघर जाऊन निधी जमा करण्याचा प्रयत्न केला. अखेर एके दिवशी कार्यालय आपल्याकडे आले. नागपुरात रेशीमबाग तशी पुण्यात मोतीबाग. अतिशय आनंद झाला.
 
आणखी एक आठवण अशी की, १९६२ रोजी महापूर आला पानशेतचा, तर त्या महापुरात मोतीबाग निम्मी पाण्यात बुडाली. प्रांत प्रचारक बाबाराव भिडे यांची आठवण सांगतात की, पुराच्या पाण्याची वार्ता आल्यानंतर न्यायालय बंद झाले आणि बाबा निघाले ते प्रथम घरी गेले नाहीत, तर मोतीबागेची काय परिस्थिती आहे हे पाहायला ते आले आणि मगच ते घरी गेले. महापूर आल्यानंतर जिकडे तिकडे चिखलच चिखल! अशावेळी सर्व स्वयंसेवक जमा झाले आणि डॉक्टर बंडोपंत परचुरे यांच्या नेतृत्वाखाली सगळी मोतीबाग साफ करण्यात आली. तिसरी आठवण घोष विभागाचे एक फार मोठे कार्यकर्ते बापूराव दात्ये यांनी एक ग्रंथ भांडार थाटले होते आणि संघ विषयक सर्व पुस्तके तिथे विक्रीला ठेवली होती. बापूराव हेे एक प्रसन्न व्यक्तिमत्व. श्रीगुरुजींच्या वाढदिवसानिमित्त बापूराव यांनी काढलेले चित्र तिथे लावलेले होते असे आठवते. नाना पालकर मोतीबागेत असत, तेही मला आठवते. या सगळ्या गोष्टी सुमारे ७० वर्षांपूर्वीच्या आहेत. त्यामुळे सर्व काही आठवत नाही, पण मोतीबाग म्हणजे एक वैभव होते.

तिथे प्रांत कार्यालय थाटण्यात आले होते. त्यामुळे मोतीबाग इथे येणार्‍या सर्व कार्यकर्त्यांचा परिचय भेटीगाठी होता. मोतीबागेत जाणे म्हणजे एक ऊर्जा असे. ते एक उत्साह केंद्र होते. खरोखर मोतीबागेत जावे आणि नवीन प्रेरणा घेऊन बाहेर यावे, अशीच स्थिती होती, अशा रीतीने अगदी प्रारंभापासून म्हणजे १९५३ पासून मी मोतीबाग पाहत आलेलो आहे. इथे मी तात्या बापट यांना पाहिले. मोरोपंत पिंगळे यांना अनेकदा पाहिले. लक्ष्मणराव इनामदार, वसंतराव केळकर, महाजनी, राजाभाऊ भोसले, श्रीधर पंत फडके, प्राध्यापक भाऊराव क्षीरसागर, आबा अभ्यंकर, दामूअण्णा दाते आणि कितीतरी कार्यकर्ते मी मोतीबागेत पाहिले. एका दृष्टीने मी भाग्यवानच आहे. ओडिशा प्रांताचे प्रांत प्रचारक दत्ताजी पाळधीकर, नामदेवराव घाडगे, विश्वास ताह्मणकर, केळकरदादा, चोळकर यांनाही मी इथे भेटलो. मोतीबाग म्हणजे चैतन्य आहे. इथे यावे आणि आशावाद, उल्हास, स्फूर्ती घेऊन परत जावे. मोतीबाग वाचून चैन पडत नाही. हे मोतीबाग वास्तू, तुला अनंत प्रणाम. आम्ही तुझे अत्यंत ऋणी आहोत...

-सुहास हरी जोशी



अग्रलेख
जरुर वाचा
नागपूरात हिंसाचार कसा घडला? जाणून घ्या सपूर्ण घटनाक्रम...

नागपूरात हिंसाचार कसा घडला? जाणून घ्या सपूर्ण घटनाक्रम...

दिवस होता सोमवार. रात्री ७.३० ते ८ वाजताच्या सुमारास नागपूर शहरातील काही भागात अचानक हिंसाचार उसळला. दोन गटात हाणामारी, दगडफेक, वाहनांची जाळपोळ या सगळ्या घटनांनी नागपूर हादरलं. एवढंच नाही तर जमाव पांगवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. तरीसुद्धा पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करत रात्री उशीरापर्यंत जमाव पांगवत हा हिंसाचार शांत केला. मुख्य म्हणजे हा सगळा प्रकार घडला तो म्हणजे कायम वर्दळ असलेल्या महाल परिसरात. सध्या नागपूरात संचारबंदी लागू करण्यात आलीये. मात्र, या घटनेची सुरुवात नेमकी कशी झाली? ..