पद्मनाभ आचार्य : पूर्वोत्तर भारत रक्तात भिनलेला प्रामाणिक, सत्य व शुद्ध आत्मा!

    25-Nov-2023
Total Views | 69
Article on Padmanabha Acharya

पद्मनाभ आचार्य गेल्याचे समजले, तेव्हा माझ्या घरातील वडीलधारी व्यक्ती गेली असे वाटले. त्यांच्यामध्ये केवळ आणि केवळ प्रामाणिकता, शुद्धता आणि सत्य होतं. १००हून अधिक वेळा त्यांना मी भेटलो असेल; पण प्रत्येक वेळेस त्यांची ईशान्य भारताविषयी असलेली तळमळ दिसून यायची. संघाशी, परिवारासोबत कुठलाही परिचय नसतानाही त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला. आमच्यात कुठलीही गोष्ट सारखी नसतानाही, त्यांच्यासारख्या पितृतुल्य व्यक्तिमत्त्वाचा मला सहवास लाभला. वडिलांचा आदर ठेवायचा असतो, भीती नाही. त्यामुळे त्यांच्यासोबत बोलताना मला कधीही भीती वाटली नाही. समोरचा काय करतोय, यापेक्षा आपण काय करू शकतो, हे महत्त्वाचे, हा त्यांचा मूलमंत्र आजही लक्षात आहे. ते एक प्रामाणिक आणि शुद्ध आत्मा होते. माझी परमेश्वरावर श्रद्धा आहे; पण मी तो माणसांमध्ये पाहतो आणि तोच मला आचार्यांमध्येही दिसला.

काही गोष्टी जीवनात योगायोगाने घडत असतात. बरीच वर्षं मी ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’सोबत काम केले. मी अध्यक्षपद सोडल्यानंतर तत्कालीन चेंबरच्या पदाधिकार्‍यांनी पद्मनाभ आचार्य यांना भेटीकरिता चेंबरमध्ये बोलावले होते. त्यानुसार आचार्य आल्यानंतर त्याचवेळी त्यांना दिल्लीहून ‘तुम्हाला राज्यपालपदाची जबाबदारी सांभाळायची आहे,’ असा फोन आला. पूर्वोत्तरमधील सात राज्ये अर्थात सप्त भगिनींसाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. या भागात त्यांनी ६० वर्षं काम केल्याने तेथील भौगोलिक, आर्थिक व सामाजिक स्थितीचा त्यांचा गाढा अभ्यास होताच. पण, २०१४ साली नागाभूमीच्या राज्यपालपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर तेथील लोकांसाठी काय करता येईल, यासाठी त्यांनी ’चेंबर ऑफ कॉमर्स’च्या पदाधिकार्‍यांना नागाभूमीला बोलावले. महाराष्ट्र उद्योग क्षेत्रात आघाडीवर आहे आणि नागाभूमी नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध. या दोन्ही गोष्टींचा मेळ साधून नागाभूमी कशी समृद्ध करता येईल, हा त्यांचा ‘चेंबर ऑफ कॉमर्स’च्या शिष्टमंडळाला बोलावण्यामागील उद्देश होता.

’चेंबर ऑफ कॉमर्स’चे शिष्टमंडळ नागाभूमीला जात असताना, त्यांनी मलाही येण्याची विनंती केली. तेव्हा शिष्टमंडळ जात आहे व ईशान्य भारताबद्दलचे असलेले आकर्षण, यामुळे मीही त्यांच्यासोबत निघालो. आपण कशाकरिता जात आहोत, याची कसलीही कल्पना मला नव्हती. आम्ही २२-२३ जण होतो. तीन दिवस आमच्या अनेक बैठका, चर्चासत्रे व उपक्रम पार पडले. यादरम्यान स्वतः आचार्य आणि कविता वहिनी यांनी आपुलकीने प्रत्येकाशी संवाद साधला. वयाने, मानाने आणि ज्ञानाने मोठे असूनही प्रत्येकाची त्यांनी केलेली विचारपूस, त्यांच्याशी साधलेला संवाद यामुळे त्यांच्याप्रति असलेला आदर आणखी वाढला. सतत पुढे पुढे राहणे, फोटो काढणे मला कधी जमलेच नाही. इथेही मी सगळीकडे मागेमागेच होतो. कर्म-धर्मसंयोगाने त्याचवेळी मित्र राजाभाऊ मोगल, त्यांच्या पत्नी आणि अन्य काही मित्रगण तिथे आले होते. त्यावेळी सर्वांच्या गप्पाटप्पाही झाल्या.

मी नऊ वर्षांचा होतो तेव्हा आईचे आणि २० वर्षांचा असताना वडिलांचे निधन झाले. तसेच पुढे एकनाथ ठाकूर यांच्यानंतर आशीर्वादाचा हात मी आचार्यांच्या रुपात शोधला. २०१५ साली राजाभाऊंनी पद्मनाभजी कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकला येत असल्याचे फोनवरून कळवले. तेव्हा आचार्य माझ्या घरी आले, तर मला आनंद होईल, असे मी त्यांना सांगितले. कुंभमेळ्याबरोबरच तेव्हा गणेशोत्सवाचे दिवस होते. आचार्य यांना गणपतीच्या आरतीला आणि जेवणाला आमंत्रित करण्याचे नक्की झाले. यावेळी नाशिकमधील विविध क्षेत्रांतील २० ते २५ मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले होते. स्वतः पद्मनाभजी आणि वहिनी सहकुटुंब उपस्थित होते. तीन ते चार तास आचार्यांनी सर्वांशी अगदी मनसोक्त गप्पा मारल्या. तसेच पूर्वोत्तरसाठी काय करता येईल, यावर विस्तृत चर्चादेखील केली. माझे दैवत माझ्या घरी आले, याचा सर्वाधिक आनंद मला होणे स्वाभाविकच. त्यावेळी आचार्यांनी नागाभूमीहून आणलेला भाला मला सोपवत, तो कायम माझ्या कार्यालयात ठेवण्यास सांगितले. जोपर्यंत हा भाला तुझ्या कार्यालयात राहील, तोपर्यंत तुला पूर्वोत्तरसाठी काम करायचे आहे, हे तुला लक्षात राहावे, म्हणून मी तुला भाला देत असल्याचे आचार्य यांनी मला अगदी हक्काने सांगितले. या भाल्याच्या रुपात त्यांनी मला आशीर्वादच दिला. त्या रुपात आजही तो भाला माझ्या कार्यालयात वास करत असून, आजही हा भाला माझ्या कार्यालयात माझ्या नजरेसमोरच ठेवलेला आहे.

पुढे महिनाभरानंतर त्यांनी फोन करून मला ’इंडियन नॅशनल फेलोशिप सेंटर’मध्ये सामील होण्यास सांगितले. यानंतर मी मुंबईतील बैठकीत ‘आयएनएफसी’विषयी माहिती घेतली. तेव्हा मला सल्लागारपदाची जबाबदारी देण्यात आली. एखाद्या संस्थेत पद मिळालं, तर त्यात भरीव काम केलं, तरच ते काम करण्यात आनंद वाटतो, अशी माझी धारणा होती. त्यामुळे मी मार्च २०१८ साली त्यांच्याकडे स्वतंत्र प्रकल्पावर काम करण्याची परवानगी मागितली. “काय करायचे तुम्हीच सांगा,” असे आचार्यांनी विचारले. तेव्हा मी महिला सक्षमीकरणावर काम करण्याचा प्रस्ताव त्यांच्यासमोर मांडला. याअंतर्गत पूर्वोत्तरमधील जवळपास तीन हजार मुलामुलींना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे, यासाठी त्यांना संगणकीय प्रशिक्षण देण्याचे नक्की केले. तिथे जाणे, मुलं-मुली शोधून त्यांना प्रशिक्षण देणे, ही खरं तर अवघड गोष्ट होती.

आधी मी राज्यपाल आचार्य यांचा अतिथी म्हणून मी तिथे गेलो होतो. पण, आता वैयक्तिकरित्या तिथे जाऊन त्याठिकाणी काम करणे, ही मात्र पूर्णपणे एक वेगळी गोष्ट होती. विद्यावर्धिनी महाविद्यालयाच्या सविता ठाकूर मॅडम आणि त्यांच्या सहकार्‍यांनी संगणकीय प्रशिक्षण देण्याची जबाबदारी घेतली. बोस्टन विद्यापीठानेही काही सामान्य सॉफ्टवेअर मोफत दिले. तेथील सर्व अडीअडचणींवर मात करत हा प्रकल्प सुरू झाला. अरुणाचल प्रदेशमधील काही शाळांनी महिला शिक्षकांची राहण्या-खाण्याची व्यवस्थादेखील केली. हा प्रकल्प अनेक ठिकाणी राबविण्याचा प्रयत्न असल्याने त्याच ठिकाणी प्रशिक्षणांर्थींमधून प्रशिक्षण देणार्‍यांची निवड करण्यात आली. या प्रकल्पासाठी ’सारस्वत बँके’चे प्रायोजकत्व लाभले. त्यामुळे निधीचा प्रश्नही सुटला. प्रकल्पासाठी माझे अनेकदा पूर्वोत्तरला जाणे होत असे. त्यानंतर कोरोना महामारी आली आणि प्रकल्प थांबला. अशा परिस्थितीतही ऑनलाईन पद्धतीने प्रकल्प पुढे नेण्याचा प्रयत्न केला. या प्रकल्पाच्या निमित्ताने अरुणाचल प्रदेशमध्ये अनेक ठिकाणी भेट दिली.

आचार्यांच्या नागाभूमीच्या निवासस्थानी मी सात ते आठ वेळा मुक्कामी होतो. राजभवनात मी त्यांच्याबरोबरच नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे जेवण करत असे. टेबलावर माझ्यासमोर सर्व भाज्या आणून यातील कोणती भाजी आवडते रे, असे ते विचारत. मी सांगितलेली भाजी मग जेवणात असायची. एकदा आचार्यांकडे मी कामाख्या देवीचे दर्शन घेण्याची इच्छा व्यक्त केली. नागाभूमीहून मी त्यांच्यासोबत आसामला आलो. ‘जेवणानंतर मी आराम करतो आणि तू कामाख्या देवीचे दर्शन घेऊन परत येे’ असे त्यांनी सांगितले. मी दर्शन घेऊन परतल्यानंतर ते मला बोटिंगसाठी घेऊन गेले. आचार्य, वहिनी आणि मी असे आम्ही तिघाजणांनी ब्रह्मपुत्रा नदीत दोन-अडीच तास बोटिंगचा आनंद घेतला. त्यावेळी आमच्या क्रूझवर काही मराठी बोलणार्‍या महिलादेखील होत्या. तेव्हा त्या सर्वांनी फोटो आणि स्वाक्षरीसाठी विनंती केल्यांतर आचार्यांनी ती मान्यदेखील केली. यावेळी मस्त गरमागरम भजीचाही आस्वाद घेतला. दुसर्‍या दिवशी मी गुवाहाटीहून मुंबईला आलो आणि आचार्य दिल्लीला रवाना झाले.

कोरोना काळात मी त्यांच्या संपर्कात होतो. जानेवारी २०२० मध्ये माझ्या पुतण्याच्या मुलाच्या लग्नाला त्यांना आशीर्वाद देण्यासाठी बोलावले होते. त्याप्रमाणे ते लग्नाला उपस्थितही राहिले होते. प्रत्येक वेळी भेटल्यावर मी आचार्यांच्या पाया पडायचो. तेव्हा, ”अरे पाया काय पडतो,” असे आचार्य म्हणत. तेव्हा मी त्यांना एकदा म्हणालो की, “सध्या असे खूप कमी पाय आहेत, जिथे डोकं टेकवता येते. मी नशीबवान आहे की, मला तुमचे चरणस्पर्श करण्याचे भाग्य लाभले आणि तो माझा अधिकारही आहे. या पायांवर डोकं टेकविण्याची मला संधी आहे, खूप जणांना ती मिळतच नाही.”

सप्टेंबर महिन्यात पद्मनाभजींची तब्येत बरी नसल्याचे कळल्यानंतर मी त्यांच्या चिरजीवांना फोनही केला. त्यानंतर मी आचार्यांना मुंबईला भेटायला गेलो. आचार्य आतमध्ये होते; पण लगेच खुर्चीवर बाहेर आले. यावेळी आचार्य, वहिनी, मुलगा, सून असे आम्ही सर्वांनी गप्पा मारल्या. त्यांनी कुटुंब, घराविषयी विचारपूस केली, तेव्हा त्यांची माझ्याप्रति असलेली काळजी दिसून आली. ’नमस्ते’ शब्दात पूर्वोत्तरच्या सात राज्यांची नावे सामावली आहेत. त्यामुळे ते भेटले की आवर्जून ‘नमस्ते’ म्हणत. एका ठरावीक वयात आपल्यावर कुणाचे तरी आशीर्वाद असावेत, असे प्रत्येकाला वाटत असते. माझी ही इच्छा आचार्यांच्या रुपाने पूर्ण झाली. त्यांनी वडीलकी घेतली आणि मला शिष्यत्व दिलं.

पद्मनाभ आचार्य गेल्याचे समजले, तेव्हा माझ्या घरातील वडीलधारी व्यक्ती गेली असे वाटले. त्यांच्यामध्ये केवळ आणि केवळ प्रामाणिकता, शुद्धता आणि सत्य होतं. १००हून अधिक वेळा त्यांना मी भेटलो असेन; पण प्रत्येक वेळेस त्यांच्या रक्तात पूर्वोत्तरच होते. संघाशी, परिवारासोबत कुठलाही परिचय नसताना आचार्यांनी माझ्यावर विश्वास टाकला. आमच्यात कुठलीही गोष्ट सारखी नसतानाही, त्यांच्यासारखे वडील मला मिळाले. वडिलांचा आदर ठेवायचो असतो, भीती नाही. त्यामुळे त्यांच्यासोबत बोलण्याची मला कधीही भीती वाटली नाही. समोरचा काय करतोय, यापेक्षा आपण काय करू शकतो, हे महत्त्वाचे आहे, हा त्यांचा मूलमंत्र आजही लक्षात आहे. ते एक प्रामाणिक आणि शुद्ध आत्मा होते. माझी परमेश्वरावर श्रद्धा आहे. पण, मी तो परमेश्वर माणसांमध्ये पाहतो आणि तोच मला आचार्यांमध्ये दिसला.

हेमंत राठी
(लेखक प्रसिद्ध उद्योजक तथा ‘एम्पायर स्पायसेस अ‍ॅण्ड फूड्स लि.’चे (राम बंधू मसाले) चेअरमन आहेत.)
(शब्दांकन ः पवन बोरस्ते संपर्क : ७०५८५८९७६७)
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.
जरुर वाचा