अनेकदा आम्हाला मोेतीबागेत व्यवस्थेसाठी यावे लागत असे. त्यामुळे घरात वावरताना जेवढे सहजपणे आपण वावरतो तेवढ्या सहजपणे मोतीबागेत वावरण्याची सवय झालेली होती. कार्यालय कितीही मोठे झाले, तरी त्या ठिकाणी माणसे जोडणारी आपुलकी तेवढीच मोठी होईल, याची खात्री आहे.
एखाद्या वास्तूची आठवण म्हणजे नेमके काय असते? त्या ठिकाणी घडलेले अनेक प्रसंग, तिथे भेटलेली अनेक माणसे, त्यांच्याबरोबर केलेले संवाद, त्या ठिकाणी झालेल्या बैठका किंवा इतर कार्यक्रम, वेळी ते अवेळी त्या वास्तूला भेट देण्याचे आलेले प्रसंग, हे सर्व या आठवणींमध्ये येते. मोतीबागे संबंधात अशा स्वरूपाच्या 60 वर्षांपासूनच्या आठवणी माझ्याकडे आहेत. 1961च्या पानशेतच्या पुरापूर्वी मी जवळजवळ वर्षभर मोतीबागेतल्या शाखेवर येत होतो. त्यावेळी मी बाल होतो. परंतु, शाखेवरील उत्साहाचे वातावरण, तिथे घेतले जाणारे खेळ, पद्ये व प्रार्थनेच्या वेळी अभ्यागतांच्या रांगेमध्ये उभे राहिलेले अनेक मोठे पदाधिकारी हे मला अजून आठवतात. पुरानंतर आम्ही सेनादत्त पेठेत म्हणजे मोतीबागेपासून चार किलोमीटर दूर राहायला गेलो. तिथल्या शाखेवर माझ्याकडे क्रमाक्रमाने मुख्य शिक्षक, कार्यवाह अशा जबाबदार्या येत गेल्या व विविध बैठकांच्या निमित्ताने किंवा पदाधिकार्यांना भेटण्याच्या निमित्ताने आमचे मोतीबागेमध्ये अनेकदा येणे-जाणे होत राहिले.
मोतीबागेच्या आठवणींमध्ये अगदी ठळक आठवण आहे ती भांडारात काम करणार्या बाबा सरदेशपांडे यांची. फळ्यावर भांडाराच्या वेळा लिहून ठेवलेल्या असत, पण बाबांच्या कामाला वेळेचे बंधन कधीच नव्हते. दसर्याचा उत्सव जवळ आला की, दिवसाच्या कुठल्याही वेळेला आम्ही मोतीबागेत डोकवायचो व गणवेशाचे काही ना काही साहित्य विकत देण्यासंबंधी बाबांना गळ घालायचो. पण, असे एकदाही मला बाबा म्हणाल्याचे आठवत नाही की, अरे दिलेल्या वेळेला येत जा, भांडार काही 24 तास चालू नसते. वेळी-अवेळी येऊन त्यांना त्रास देणे हा आम्ही आमचा हक्क समजत होतो व तेवढ्याच आनंदाने बाबा आमचे काम करून देत असत.
मोतीबागेत आलो आणि हवा तो माणूस भेटला नाही की आम्ही ‘हिंदुस्तान साहित्य’मध्ये जाऊन बापूराव दात्यांना भेटत असू. बापूरावांच्याकडे संघाच्या कार्यकर्त्यांसंबंधी सांगण्याजोग्या खूप गोष्टी असत. अनेक ठिकाणचे अनुभव ते हसत खेळत आम्हाला सांगत. किती वेळ जात असे हे समजतही नसे. आम्हाला हवा असलेला माणूस आला व आम्ही तिथून उठलो की बापूराव आम्हाला म्हणत, “आता बरोबर आहे, आता तुम्हाला आमची काही गरज नाही. पण हरकत नाही, पुन्हा आलास की इथे येत जा.” मी छोट्या मोठ्या कविता करायचो, नंतर काही संघगीतेही तयार केली. बापूरावांना त्या गीतांच्या व्याकरणाचे उत्तम ज्ञान होते. ते माझ्या कविता अथवा संघगीते व्याकरणाच्या दृष्टीने दुरूस्त करून देत व कुठे कोणता शब्द वापरला, तर तो अधिक अर्थपूर्ण होईल हे समजावूनही सांगत. त्यांच्या आणि माझ्या वयामध्ये अंतर खूप होते. पण, बाबुराव माझ्याशी अगदी मित्र असल्यासारखे बोलत असत.
आबा अभ्यंकर हे असेच आमच्यापेक्षा वयाने खूप मोठे असलेले आमचे मित्र होते. त्यांनाही दिवसातील कुठल्याही वेळी येऊन आम्ही त्रास देत असू. कधी मला एखाद्या कार्यकर्त्याचा फोन नंबर हवा असे, कधी तळघरातून काही साहित्य काढून घ्यायचे असे किंवा येणार्या जाणार्या इतर कार्यकर्त्यासाठी इथे निरोप ठेवायचा असे. पण, आबा कधी मला नाही म्हणाले नाहीत. मी बाल विभागाचा प्रमुख असताना शिबिराच्या पूर्वतयारीच्या महिनाभरात अनेक शाखांवर योगचाप नेऊन देण्याचे काम मला करावे लागे. त्यावेळी एकाच दिवसात चार-पाच वेळा तळघरात जाऊन योगचाप काढून देण्याचे काम त्यांनी केलेले आहे. माझ्याकडे काही दिवस संघाची एक जुना वापरासाठी होती. मी संघाच्या कामाला जाण्यापूरती ती मोतीबागेतून घेऊन जात असे व काम झाल्यावर मोतीबागेत आणून ठेवत असे.
गाडी घेऊन जाण्यासाठी व गाडी आणून ठेवताना वेळ सांभाळली जाण्याची शक्यताच नव्हती. त्यामुळे आबांना वेळोवेळी हाक मारून गाडी घ्यावी लागे. पण, आबांनी कधी कुरकुर केली नाही. जेव्हा आबा मोतीबागेच्या कार्यालय प्रमुख व्यवस्थेतून निवृत्त झाले, तेव्हाही आबांनी आमच्याबरोबर गप्पा मारणे थांबवले नाही. कधी माझ्याबरोबर ते गप्पा मारायला व कॉफी घ्यायला गंधर्व हॉटेलमध्ये येऊन बसत. ‘एकता’ मासिकासाठी निधी संकलन करण्याची गरज पडली, त्यावेळी आबा मला शहरातल्या 60-70 जणांकडे घेऊन गेले व कित्येक लाख रुपये आम्ही जमा केले. आबांच्या शब्दाला कोणीही नाही म्हटले नाही, एवढा त्यांचा संपर्क होता.
नगर कार्यवाह झाल्यावर मोतीबागेत नियमितपणे बैठकीला येणे होत असे. बैठका रात्री उशिरापर्यंत चालत असत. कधी बैठकांना सोडूनच जेवणाचा कार्यक्रमही असे. बैठकीत काही निर्णय घेतले गेले व त्यांची त्वरित अंमलबजावणी करायची असेल, तर आमचे भाग कार्यवाह शरदभाऊ साठे, मी, मुरलीधर कचरे असे दोघे तिघेजण जवळच्या एका हॉटेलमध्ये चहा घ्यायला जात असू व तिथे बैठकीत ठरलेल्या विषयांची अंमलबजावणीसाठी आपापसात वाटणी करत असू. इतर परिवार संस्थांतील कार्यकर्त्यांच्याही मोठ्या बैठका होत असत व अनेकदा आम्हाला इथे व्यवस्थेसाठी यावे लागत असे. त्यामुळे घरात वावरताना जेवढे सहजपणे आपण वावरतो तेवढ्या सहजपणे मोतीबागेत वावरण्याची सवय झालेली होती. कुठे काय मिळेल व कुठली व्यवस्था कशी करायची हे अशा अनेक बैठकांच्या अनुभवामुळे आम्हाला अंगवळणी पडलेले होते.
आपल्या घराच्या बाबतीत काही समस्या निर्माण झाली, तर जसे दुःख होते तसे आम्हाला बंदीच्या काळात मोतीबागेला कुलूप लावून ठेवले होते त्यावेळी दुःख झाले होते. आतमध्ये अगदी कचरा झाला असेल, घाण झाली असेल असे वाटत असे. पण आमच्या एक-दोन सहकार्यांनी तिथल्या पोलिसांशी गप्पा मारून, त्यांना चहा पाजून विश्वासात घेतले व आम्हाला दररोज मोतीबागेत मारुतीच्या दर्शनाला जायचे आहे असे पटवले. ते रोज त्यानिमित्ताने मोतीबागेत जाऊन फेरफटका मारून येत असत. त्यांच्याकडून मोतीबागेची हाल हवाल आम्ही उत्सुकतेने ऐकत असू.
दामूअण्णा दाते, श्रीमती शास्त्री व तात्या बापट ही त्यावेळी आमची तीन दैवते होती. स्वतःच्या व्यक्तिगत अडचणी असोत, संघाचा काही कार्यक्रम ठरवायचा असो, अथवा संघासंबंधी वर्तमानपत्रात काही छापून आले, तर त्यासंबंधी चर्चा करायची असो. यांच्यापैकी कोणाची तरी आम्ही जाऊन भेट घेत असू व त्यांच्याशी गप्पा मारत असू. मनाचा होणारा गोंधळ हा यांच्याशी गप्पा मारल्यावर अगदी शांत होत असे. घरातल्या वडीलधार्या माणसाप्रमाणे हे तिघेजण पुणे शहरातल्या कितीतरी कुटुंबांशी जोडलेले होते व प्रत्येकाच्या अडचणी लक्ष घालून सोडवत होते. या मोठ्या माणसांना इतकी माणसे जोडण्याची क्षमता कशी काय लाभलेली होती कोण जाणे. परंतु, त्यांची भेट घेणे हे मोतीबागेत जाण्याचे एक प्रमुख कारण ठरत असे, हे निश्चित.
मोतीबाग मोठी झाली तरी त्या कार्यालयाची संघ संस्कृती मात्र बदलली नाही. माणसे बदलली, पण त्यांच्या वागण्याची रीत तीच राहिली व त्यामुळे मोतीबागेसंबंधीची आपुलकीही तशीच राहिली. आता पुन्हा एकदा कार्यालय खूप मोठे झाले आहे. अनेक हॉल बांधले गेले आहेत, अनेक कार्यकर्त्यांच्या राहण्याची व्यवस्था झालेली आहे. संघाच्या वाढत्या कामामुळे प्रांत कार्यालयात या सर्व व्यवस्था असणे गरजेचेही झाले आहे. मला खात्री आहे की, कार्यालय कितीही मोठे झाले, तरी त्या ठिकाणी माणसे जोडणारी आपुलकी तेवढीच मोठी होईल. संघ वाढेल तशी संघाची संस्कृतीही अधिक समृद्ध होत जाईल.