सतत आत्मियता जपणारी वास्तू

    25-Nov-2023
Total Views | 60
Moreshwar Joshi on Motibag

मोतीबागेच्या वास्तूमध्ये बदल काळानुसार होत गेला. परंतु, मोतीबागेत असलेली आत्मियता ही मात्र वृद्धिंगत होत गेली.

मोतीबाग म्हणजे माझ्यासाठी एक विद्यापीठ देखील आहे. घटना अशी घडली की, मी व माझा मित्र सदाशिव मालुसरे आम्ही दोघेही ‘एलएलबी’च्या पहिल्या वर्षात पास झालो ते वर्ष होते 1978चे आमच्या कल्पनेनुसार किंवा अंदाजानुसार आम्हाला वाटले आमचे द्वितीय वर्षाला नाव आपोआपच जाईल. प्रत्यक्ष कॉलेज सुरू झाल्यावर आम्ही ‘आयएलएस लॉ’ कॉलेजमध्ये गेलो त्यावेळेला कोणत्याच वर्गात द्वितीय वर्षाच्या यादीत आमचे नाव नव्हते. त्यामुळे आम्ही कार्यालयात चौकशी केली. त्यावेळेस आम्हाला सांगण्यात आले की, तुम्ही द्वितीय वर्षाला प्रवेश घ्यायला हवा होता आणि आम्हाला याची कल्पना नव्हती. मग आता काय करावे लागेल, असे आम्ही कार्यालयात विचारले. काही नाही, आता तुम्हाला पुणे विद्यापीठात जाऊन म्हणजेच आताचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे जावे लागेल व तिकडून प्रवेशाची विनंती आमच्याकडे पाठवावी लागेल. आता आमच्यासमोर मोठा प्रश्न पडला की, विद्यापीठात कुठे जायचे, कोणाला भेटायचं? तो काळ असा होता की माहितीचा अभाव खूप असायचा.

मग मी विचार केला आणि आपण आपल्या विद्यापीठात जाऊया, असे मी सदाशिव मालुसरेला बोललो. सदाशिव म्हणाला की, “आपले विद्यापीठ कुठलं?” मी त्याला म्हणालो की, “चल तर कळेल तुला आपोआपच” आम्ही सायकलवर मोतीबागेत पोहोचलो. त्यावेळेस पुणे महानगराचे प्रचारक तात्या बापट होते आणि तात्यांचा पुण्यातील सर्व कार्यकर्त्यांशी स्नेहसंबंध खूपच घनिष्ठ असायचा, त्याला मीसुद्धा अपवाद नव्हतो. तात्यांना मी भेटलो. तात्यांना मी सर्व घडलेली घटना सांगितली. आता प्रवेशासाठी काय करावे, यासाठी तुमच्याशी विचारविनिमय करायला आलो आहे. तात्या मला म्हणाले, “थांब काळजी करू नको.” तात्यांनी आमच्या कॉलेजचे व्हाईस प्रिन्सिपल आप्पासाहेब कुलकर्णी यांना फोन केला आणि सर्व झालेली घटना सांगितली. आप्पासाहेबांनी तात्यांकडे निरोप दिला की त्यांना म्हणजे आम्हा दोघांना दुसर्‍या दिवशी सकाळी 10.30 वाजता मला भेटण्यास सांगितले. त्याप्रमाणे आम्ही दुसर्‍या दिवशी कॉलेजमध्ये गेलो. त्याच दिवशी आमची अ‍ॅडमिशन झाली आणि आमचे द्वितीय वर्ष सुरू झाले. अशा पद्धतीने माझा मित्र सदाशिव मालुसरे याला मोतीबागेची एक नवीन ओळख वेगळ्या प्रकारचे विद्यापीठ म्हणून झाली.

तसं मोतीबागेशी सर्व स्वयंसेवकांचा खूप आत्मियतापूर्वक संबंध राहिलेला आहे. त्याचं कारण मोतीबागेत राहणारी प्रचारक मंडळी. आले-गेल्याची चौकशी तेथील कार्यकर्ते करतात आणि त्याला काय नेमकं हवं-नकोय याची माहिती घेत असत. कार्यकर्ते मोतीबागेत बैठकीसाठी जरी आली तरी त्याच्याशी आत्मियतेने बोलणे, व्यवहार करणे हा आतापर्यंतचा रिवाज राहिलेला आहे. मी स्वतः साधारणतः 1972 पासून नियमित मोतीबागेमध्ये काही ना काही कारणामुळे जात असेे. प्रचारकांना भेटण्यासाठी असेल अथवा बैठक असेल आणि काही कोणाशी गप्पागोष्टी करायचे असतील, तर मोतीबागेत जाण्याचा योग यायचा. मोतीबागेच्या वास्तूमध्ये बदल काळानुसार होत गेला. परंतु, मोतीबागेत असलेली आत्मियता ही मात्र वृद्धिंगत होत गेली. त्यामुळे मोतीबागेमध्ये सहजगत्या येणार्‍यांमध्ये स्वयंसेवकांचे प्रमाण लक्षणीय राहिलेले आहे.

मी वकिली करत असताना दुपारच्या वेळेला कित्येक वेळा मी मोतीबागेत सहज जात असे, तर त्यावेळी तिथे असलेले कार्यकर्ते मला विचारायचे “काय, आज काम काढले?” मी सांगायचो मी सहज आलोय भेटायला आणि तुम्हा सर्वांना, तुमच्याशी गप्पा मारल्या की आनंद होतो, तर ते कार्यकर्तेसुद्धा बर्‍याच वेळा आश्चर्यचकित व्हायचे की सहज मोतीबागत येणे हे सुद्धा हृदयात सहज असलं पाहिजे. कित्येक वेळा मी आणि कित्येक कार्यकर्ते उपनगरांमधून बैठकीसाठी सायकलवरून येत असत आणि रात्री उशिरा बैठक जरी संपली की कार्यकर्ते सगळे एकत्र मिळून कुठेतरी दूध प्यायला जायचे. मग रात्री 10.30 वाजता दूध प्यायचे आणि मग घरी जायचं असा बराच वेळेला त्या काळी घडलेला प्रसंग आहे. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर मोतीबाग म्हणजे आत्मियता. मोतीबाग म्हणजे घर आणि मोतीबाग म्हणजे विद्यापीठ असे म्हणता येईल.

अ‍ॅड. मुरलीधर कचरे
(लेखक ’सक्षम’पश्चिम महाराष्ट्रचे अध्यक्ष आहेत.)
अग्रलेख
जरुर वाचा
नागपूरात हिंसाचार कसा घडला? जाणून घ्या सपूर्ण घटनाक्रम...

नागपूरात हिंसाचार कसा घडला? जाणून घ्या सपूर्ण घटनाक्रम...

दिवस होता सोमवार. रात्री ७.३० ते ८ वाजताच्या सुमारास नागपूर शहरातील काही भागात अचानक हिंसाचार उसळला. दोन गटात हाणामारी, दगडफेक, वाहनांची जाळपोळ या सगळ्या घटनांनी नागपूर हादरलं. एवढंच नाही तर जमाव पांगवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. तरीसुद्धा पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करत रात्री उशीरापर्यंत जमाव पांगवत हा हिंसाचार शांत केला. मुख्य म्हणजे हा सगळा प्रकार घडला तो म्हणजे कायम वर्दळ असलेल्या महाल परिसरात. सध्या नागपूरात संचारबंदी लागू करण्यात आलीये. मात्र, या घटनेची सुरुवात नेमकी कशी झाली? ..