अहमदाबाद : अहमदाबादमध्ये गांधींजींचा वारसा जपणार्या साबरमती आश्रमाला वळसा घातला की पुढे वीस मिनिटांच्या अंतरावर नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय स्टेडियम लागते. जगातील सर्वाधिक अत्याधुनिक अशा या स्टेडियममध्ये भारताचे अकरा शिलेदार या वर्ल्डकपमधील आपला अकरावा आणि फायनलचा मुकाबला खेळायला मैदनात उतरले तेव्हा सव्वा लाख क्षमतेचे हे स्टेडियम उत्साहाने भारून गेल होते. सलग दहा सामने लीलया जिंकणार्या टीम इंडियला नेमका शेवटचा अकरावा सामना जिंकता आला नाही, फायनली या स्पर्धेत ते हरले आणि क्रिकेटचा वर्ल्डकप हातातून निसटून गेला. वर्ल्डकप जिंकलो नसले तरी या अकरा खेळाडूंनी तमाम क्रिकेट शौकिनांची मने मात्र जिंकली.
यशाला अनेक बाप असतात. अपयशासाठी मात्र बकरे शोधले जातात. क्रिकेटचा वर्ल्डकप जिंकता न आल्यामुळे आता भारतीय टीममधील ११ बकरे शोधले जातील. यथासांग त्याची पुजा बांधली जाईल. नाक्यानाक्यावर रोहीत शर्माचा फटका कसा चुकला यापासून ते सुर्यकुमार यादवला आधीच हाकलले पाहिजे होते, अशा चर्चांना उद्या सोमवारचा सुर्य उगवल्यापासून सुरुवात होईल. ट्वीटर, फेसबूकवरून प्रत्येक जण आपापले क्रिकेटचे अगाध ज्ञान पाजळायला लागतील. पण मी खरं सांगतो अहमदाबादच्या या स्टेडियमवर सव्वालाखांच्या जनसमुदायासोबत क्रिकेटच्या या सामन्याचा आनंद लुटण्याची नशा काही औरच होती. भारत वर्ल्डकप जिंकला असता तर मजा डबल झाला असता.
फायनलमध्ये एकाला पराभूत व्हायचे असते, ती जबाबदारी गांधींच्या या साबरमतीजवळील स्टेडीयममध्ये आपण उचलली. ‘अतिथी देवो भव:’च्या थाटात आपण हा सामना गमावला. त्यात नाणेफेक महत्वाची ठऱली. संध्याकाळी पडणार्या दवानं भारतीय बॉलरची चेंडूवरील ग्रीप निसटली आणि वर्ल्डकपही निसटला. नाही म्हणायला शमी आणि बुमराहने पहिला स्पेल भन्नाट टाकला. फायनलमध्ये जान आणली खरी पण ती नुसतीच धाकधुकी ठरली. ट्रॅव्हिस हेडने आपल्या खांद्यावरील ‘हेड’ शांत ठेवत ऑस्ट्रेलियाला विश्वविजेतेपदाच्या समीप नेले.
या वर्ल्डकपमध्ये आपण ‘फायनली’ हरलो पण आपण हरलो म्हणण्यापेक्षा ऑस्ट्रेलिया जिंकली हे वाक्य अधिक सर्मपक ठरेल. या वर्ल्डकपमधील भारताची ही अकरावी मॅच होती. आधीच्या दहा मॅच आपण जिंकल्या होत्या. लॉ ऑफ एव्हरेजच्या तत्वानुसार आपले हरणे अटळ होते, पण ते नेमके फायनलला असावे यासारखेदुसरे दुख: नाही. क्रिकेटच्या इतिहासात जेव्हा-जेव्हा या वर्ल्डकपची चर्चा होईल तेव्हा या भारतीय क्रिकेट संघाबद्दल एक वाक्य आवर्जुन लिहीले जाईल आणि ते वाक्य असेल.... बंदो मे था दम!