नवी दिल्ली : भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया हा विश्वचषक २०२३ मधील अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळविण्यात येणार आहे. या फायनल मॅचपूर्वी स्टेडियमवर अनेक कार्यक्रमांसाठी जय्यत तयारी करण्यात येत आहे. दरम्यान, अंतिम सामना पाहण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान रिचर्ड मार्लेस स्टेडियमवर उपस्थित राहणार आहेत. तसेच या मॅचदरम्यान अनेक शोज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.
दरम्यान, अंतिम सामन्यातील शोज संदर्भात बीसीसीआयने X वर पोस्ट करत माहिती दिली आहे. यात सामना सुरू होण्यापूर्वी म्हणजेच प्री मॅच शो दरम्यान, १:३५ ते १:५० दरम्यान भारतीय हवाई दलाकडून 'सूर्यकिरण' एअर शो होणार आहे. तसेच, भारतीय वायुसेनेद्वारा आकाशात पहिल्यांदा सलामी दिल्यानंतर पहिल्या इनिंगमधील ड्रिंक्स ब्रेकदरम्यान ‘खलासी’ या ट्रेंडिंग गाण्याचा गायक आदित्य गधवी परफॉर्म करणार आहे.
तर ब्रेकदरम्यान प्रीतम, जोनिता गांधी, नक्श अजीज, अमित मिश्रा, अकासा सिंह आणि तुषार जोशी यांचेही परफॉर्मन्स पहायला मिळतील. देवा देवा, केसरियाँ, लेहरा दो, जीतेगा जीतेगा, नगाडा नगाडा, धूम मचाले, दंगल, दिल जश्न बोले यांसारखी दमदार गाणी सादर केली जातील. तर दुसऱ्या इंनिगच्या ड्रिंक्स ब्रेकदरम्यान लेझर आणि लाईट शो देखील दाखविण्यात येणार आहे.