नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना खेळविला जाणार आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना रविवार दि. १९ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी २ वाजल्यापासून सुरू होणार आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिका विरुध्द ऑस्ट्रेलिया सेमीफायनल सामन्यात पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे आता अंतिम सामन्यात पावसाचे व्यत्यय आल्यास काय होणार, कोणत्या नियमांनुसार निकाल लागणार हे याबद्दल जाणून घेऊया.
उद्या अहमदाबाद येथील सामन्यादरम्यान पाऊस आल्यास विश्वचषक विजेता या नियमानुसार घोषित केला जाणार आहे. फायनलचा निकाल लागण्यासाठी दुसऱ्या डावाचा अर्धा खेळ म्हणजेच कमीत कमी २० षटकांचा खेळ होणे गरजेचे आहे. पावसाने रविवारी अंतिम सामना रोखला तर हा सामना दुसऱ्या दिवशी राखीव दिनी म्हणजेच २० नोव्हेंबरला खेळविला जाईल.
दरम्यान, दुसऱ्या दिवशी म्हणजेच राखीव दिवशी देखील पावसाचा व्यत्यय आल्यास आणि सामना रद्द झाला तर गुणतालिकेत अव्वल असलेल्या भारतीय संघाला विश्वविजेता म्हणून घोषित केला जाईल. त्यामुळे पावसामुळे जर का अंतिम सामन्यात काही व्यत्यय आल्यास भारतीय संघ जिंकण्याची शक्यता जास्त आहे.
त्याचबरोबर, बहुप्रतीक्षित विश्वचषक २०२३ अंतिम सामना आता शेवटच्या टप्प्यात आला असून आयसीसीने सामनाधिकारी घोषित केले आहेत. तसेच, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामन्याकरिता रिचर्ड इलिंगवर्थ आणि रिचर्ड केटलबरो हे मैदानावरील पंच असतील, तर अँडी पायक्रॉफ्ट सामना पंच म्हणून काम पाहतील. जोएल विल्सन आणि ख्रिस गॅफनी हे अनुक्रमे तिसरे आणि चौथे पंच म्हणून काम पाहतील.