मानवी व्यवस्थापनात तरबेज असलेले एकनाथजी रानडे

    18-Nov-2023
Total Views | 137
Article on Eknath Ranade

कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता, एखादे सामाजिक कार्य कसे पूर्णत्वास नेता येते याचे उत्तम उदाहरण द्यायचे झाले तर ते द्यावे लागेल, कन्याकुमारी येथील विवेकानंद शीला स्मारकाचे! या स्मारकाच्या उभारणीत सिंहाचा वाटा होता, तो विवेकानंद शीला स्मारक समितीचे कार्य संघटन सचिव एकनाथजी रानडे यांचा. आज दि. १९ नोव्हेंबर हा एकनाथजींचा जन्म दिवस ’साधना दिवस’ म्हणून देशभर साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने त्यांच्यातील मानवी व्यवस्थापन कौशल्याचे गुणवैशिष्ट्य शब्दबद्ध करणारा हा लेख...

कोण होते हे एकनाथजी रानडे? तर एकनाथजी रानडे १९३८ ते १९६२ या सुमारे २३ वर्षांच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ते होते. नंतर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह झाले. त्यांचे पूर्ण नाव होते-एकनाथ रमाबाई रामकृष्ण रानडे. महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यातील टिमटाला या छोट्याशा गावी दि. १९ नोव्हेंबर १९१४ रोजी एकनाथजींचा जन्म झाला. महाविद्यालयात शिकत असताना एकनाथजी स्वामी विवेकानंदांची पुस्तके वाचत. विवेकानंदांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या याच तरुणावर पुढे स्वामी विवेकानंदांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने १९६३ मध्ये दोन कार्यांची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यातले पहिले कार्य होते, ते म्हणजे स्वामी विवेकानंदांच्या व्याख्यानांचे आणि भाषणांचे संकलन करून ते पुस्तकाच्या रुपात प्रसिद्ध करणे. दुसरे कार्य होते, कन्याकुमारीच्या श्रीपाद शीलेवर विवेकानंदांचे भव्य स्मारक उभारणे. ही दोन्ही कार्ये एकनाथजींनी अतिशय यशस्वीपणे पार पाडली. स्वामी विवेकानंदांच्या व्याख्यानांचे आणि भाषणांचे संकलन करून त्यांनी ’द राऊझिंग कॉल टू हिंदू नेशन’ हे पुस्तक लिहिले. हे पुस्तक १९६३ साली प्रकाशित झाले. कन्याकुमारी येथील श्रीपाद शीलेवर विवेकानंदांचे भव्य स्मारक उभारण्याचे काम एकनाथजी रानडे यांनी सुरू केले दि. १२ ऑक्टोबर १९६७ रोजी आणि ते पूर्णत्वास नेले १९७० मध्ये. या शीला स्मारकाचे राष्ट्रार्पण ‘श्री रामकृष्ण मिशन’चे तत्कालीन अध्यक्ष स्वामी वीरेश्वरानंदजी यांच्या हस्ते झाले. स्मारकाचे उद्घाटन भारताचे तत्कालीन राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांच्या हस्ते दि. २ सप्टेंबर १९७० रोजी करण्यात आले.

जशी उक्ती तशी कृती...

एकनाथजी रानडे हे सर्वोत्कृष्टतेचा ध्यास घेतलेले कुशल योजक होते. केव्हा बोलायचे व काय बोलायचे आणि मौन कधी पाळायचे, हे एकनाथजींना चांगलेच अवगत होते. त्यांना विलक्षण राजकीय जाण होती. आपल्या विरोधकांच्याही हाताखाली काम करण्याची मानसिकता त्यांच्याकडे होती. एखादा हेतू साध्य झाल्यावर विरोधकांमध्ये आणि आपल्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कडवटपणा राहणार नाही, याचीही पुरेपूर काळजी एकनाथजी घेत. लोकांशी जवळीक साधण्याची तसेच आपल्या विरोधकांनाही आपले विचार पटवून देण्याची विलक्षण हातोटी आणि दूरदृष्टी त्यांच्याकडे होती.

एकनाथजींमधील या सर्व गुणांचा प्रत्यय विवेकानंद शीला स्मारक उभारणीच्या कामात अनेकांना आला. ”प्रथम आपले ध्येय निश्चित करा. नंतर ते प्राप्त करण्यासाठी आपल्या सर्व शक्ती वापरा आणि अखेर तेच आपल्या जीवनाचे कार्य म्हणून स्वीकारा,“ असे एकनाथजी नेहमी सांगत. एकनाथजी जे काही सांगत त्याप्रमाणे ते स्वतःही वागत. त्यांची उक्ती आणि कृती एकच होती. वयाच्या अवघ्या १२व्या वर्षी त्यांनी आपले ध्येय निश्चित केले. ते ध्येय होते-राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य पुढे नेण्याचे. १९३८ मध्ये एकनाथजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ प्रचारक बनले. १९६३ मध्ये संघाने विवेकानंदांचे भव्य स्मारक श्रीपाद शीलेवर उभारण्याची जबाबदारी एकनाथजींवर सोपवली. एकनाथजींनी ती जबाबदारी आनंदाने स्वीकारली. त्यानंतर विवेकानंदांचे चैतन्यपूर्ण असे स्मारक उभारणे, हेच एकनाथजींनी आपले ध्येय ठरवले. ते स्मारक उभारण्यासाठी त्यांनी आपल्या सर्व क्षमतांचा वापर केला आणि स्मारक उभारण्याचे कार्य तडीस नेले! स्वामी विवेकानंदांच्या विचारातून राष्ट्र पुनरुत्थान करणे, हेच आपल्या जीवनाचे कार्य म्हणून त्यांनी स्वीकारले. दि. २२ ऑगस्ट १९८२ या आपल्या जीवनाच्या अखेरच्या दिवसापर्यंत ते या कार्याशी एकनिष्ठ राहिले!
 
कन्याकुमारी येथे श्रीपाद शीलेवर विवेकानंदांचे स्मारक उभारण्यास अनेक राजकारण्यांचा तसेच कन्याकुमारी येथील अल्पसंख्याकांचा विरोध होता. तत्कालीन मद्रास राज्याचे मुख्यमंत्री भक्तवत्सलम, केंद्रीय मंत्री प्रा. हुमायून कबीर, अण्णा दुराई, डाव्या विचारसरणीचे कम्युनिस्ट नेते व पश्चिम बंगालचे तत्कालीन उपमुख्यमंत्री ज्योती बसू यांच्यासारखे अनेक नेते विवेकानंद शीला स्मारक उभारणीच्या विरोधात होते. पण, एकनाथजींनी स्मारकाच्या विरोधकांचे मनपरिवर्तन केले, विरोधकांना त्यांनी आपलेसे करून घेतले आणि स्मारक उभारणीच्या कामात त्यांना सहभागीदेखील करून घेतले. स्मारकासाठी निधी संकलनाच्या कामात, तर एकनाथजींनी ज्योती बसू यांच्या पत्नी श्रीमती कमला बसू यांनाही मोठ्या कौशल्याने सहभागी करून घेतले. विवेकानंद शीला स्मारकाच्या उभारणीचा इतिहास जर आपण वाचला, तर एकनाथजी रानडे हे मानवी व्यवस्थापनात किती तरबेज होते, हे आपल्या लक्षात येईल. मानवी व्यवस्थापनाचे धडे एकनाथजींकडूनच घ्यायला हवे होते, असे शीला स्मारकाच्या उभारणीचा इतिहास वाचून अनेक व्यवस्थापन तज्ज्ञांना वाटेल, यात शंकाच नाही!

राजकारणापासून दूर

एकनाथजींना राजकारणाची पुरेपूर जाण जरी असली तरी राजकारणात त्यांनी कधीही लुडबुड केली नाही किंवा कोणत्याही कार्यात राजकारण आणले नाही. विवेकानंद शीला स्मारकाच्या उभारणीस जेव्हा अनेकांनी विरोध केला, तेव्हा एकनाथजी आणि त्यांचे सहकारी उपोषण करतील किंवा एखादे आंदोलन उभे करतील, संघर्ष करतील असा अनेकांचा समज होता. विवेकानंद शीला स्मारकाचा विरोध मोडून काढण्यासाठी आपण आंदोलन करू, उपोषण करू, निदर्शने करू, असेही काहींनी एकनाथजींना सूचविले होते. एकनाथजींनी या सर्व सूचनांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. काही राजकीय नेत्यांनी तर एकनाथजींना स्मारकाच्या उभारणीबाबत आपण लोकसभेत प्रश्न उपस्थित करू, असेही सांगितले. तेव्हा एकनाथजींनी त्यांना स्पष्टपणे सांगितले की, “स्मारक उभे राहावे, यासाठी तुम्ही उत्सुक आहात, ही चांगली गोष्ट आहे. पण, जर खरेच तुम्हाला या कामात मदत करायची असेल, तर विवेकानंद स्मारकाबाबत लोकसभेत एक शब्दही उच्चारू नका. ज्यावेळी हा विषय मांडण्यासाठी या सदनाचा उपयोग करावा, असे मला वाटेल, तेव्हा मी येऊन तुम्हाला सांगेन.” विवेकानंद शीला स्मारकाला देशातील सर्वांचा हातभार लागावा, सर्वसंमतीने हे स्मारक उभे राहावे, विवेकानंद शीला स्मारक हे सर्व भारतीयांच्या आस्थेचा आणि अभिमानाचा विषय व्हावा, असेच एकनाथजींना वाटत असे.

स्मारकाच्या उभारणी संदर्भात एकनाथजी अनेकांना भेटले. अनेकांचे अनेक अनुभव त्यांनी घेतले. केवळ स्मारकाचाच विषय नव्हे, तर आपल्या देशाच्या हिताचा प्रत्येक विषय वा देशहिताची प्रत्येक योजना ही राजकारणापासून दूरच ठेवायला हवी, अशा ठाम निष्कर्षाप्रत ते आले. या संदर्भात एकनाथजी लिहितात की, ”प्रत्येकातल्या भारतीयतेला जागृत करून त्यांच्याकडून काम करून घ्यायला हवे. प्रत्येकातील भारतीयता, प्रत्येकातला हिंदू, वेदांती जागृत व्हायला हवा. तुम्ही वरचे आवरण खरवडून पाहा. तुम्हाला दिसेल की, प्रत्येकजण या भूमीचा पुत्र आहे. तो पाश्चिमात्यवाद, रशियनवाद किंवा आधुनिकवाद, कोणत्याही वादाबद्दल, ’ईझम्’ बद्दल बोलू दे. तो मूलतः या भूमीचाच पुत्र असेल आणि तुम्ही सर्व मार्गांनी जरी नाही, तरी या ना त्या मार्गाने त्याच्याकडून मदतीची खात्री बाळगू शकता.” आपण हाती घेतलेल्या कार्यात जर खात्रीलायक यश प्राप्त करायचे असेल, तर राजकारणापासून दूर राहण्याच्या आवश्यकतेवर एकनाथजींनी सदैव भर दिला. राजकारण आणि राजकारणी यांच्याबाबत त्यांनी मांडलेले विचार आजच्या राजकारणाला आणि राजकारण्यांना तंतोतंत लागू पडतात! राजकारणाचे अजीर्ण झालेल्या आजच्या काळात सर्वांनीच एकनाथजींचे हे विचार लक्षात घेतले पाहिजेत.

चांगल्या शक्ती एकत्र आणूया

एकनाथजी म्हणत की, ”राजकारणाला मी काहीच महत्त्व देत नाही असे नाही. वास्तविक, राजकारण ही या देशातील सर्वग्रासी शक्ती बनली आहे. राजकीय जीवनाची महत्त्वाकांक्षा अधिकाधिक वाढताना दिसत आहे. केवळ एका क्षेत्राचे राजकीयीकरण झाले आहे असे नाही, तर ते सर्वच क्षेत्रांत पसरताना दिसत आहे. पूर्ण जीवनावर राजकारणाचा प्रभाव आहे. त्याला दुर्लक्षित करणे शक्य नाही. त्याचे भलेबुरे परिणाम सर्वांनाच स्वीकारावे लागणार आहेत. आपण म्हणतो, देशाचे शासन योग्य हातात नाही. राज्यकर्ते भ्रष्ट, अप्रामाणिक आहेत अन् त्याचा परिणाम म्हणजे, देशाची सध्याची स्थिती. आपल्याला याची जाणीव आहे. पण, त्याचवेळी हेही खरे आहे की, या समस्येवर उपाय म्हणजे राजकारणाचे शुद्धीकरण. मात्र, याचा मार्ग राजकारणात प्रवेश करणे हा नाही. राजकारणात राहून ते स्वच्छ करणे, कदाचित कुणाला शक्य होणार नाही. ते स्वच्छ करण्याच्या आशेने जर कोणी राजकारणात प्रवेश केला, तर त्याला निराशच व्हावे लागेल, अशी मला भीती आहे. मला वाटते या स्थितीत राजकारण स्वच्छ करण्याचा, त्याला योग्य दिशेने नेण्याचा मार्ग राजकारणाबाहेर आहे. राजकीय शक्तींचा प्रभाव असतानाही या देशात आपल्या मूल्यांचा अर्थ प्रस्थापित करणे अत्यावश्यक आहे. स्वार्थाचा लवलेशही नसलेली आध्यात्मिक आधार असलेली देशप्रेमाची शक्ती निर्माण करणे आवश्यक आहे. अशा लोकांची शक्ती जरी राजकारणाबाहेर उभी राहिली, तरी त्याचा योग्य प्रभाव पडू शकेल. सद्य परिस्थिती बदलण्याची जर काही आशा असेल, तर ती यातच आहे. निश्चितपणे यश मिळवण्यासाठी आपण चांगल्या शक्ती एकत्र आणूया. म्हणून आपण हे कार्य करण्यासाठी जागरूकपणे राजकारणापासून दूर राहिले पाहिजे.”

या विचारातूनच एकनाथजींनी आध्यात्मिक पायावर आधारित निःस्वार्थपणे मानव सेवा करणारी तरुणांची एक संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेतला. दि. ७ जानेवारी १९७२ रोजी ’विवेकानंद केंद्र’ या नावाने त्यांनी अशा संघटनेची स्थापना कन्याकुमारी येथे केली. आजही ’विवेकानंद केंद्र’ ही संघटना भारतीय मूल्यांची जोपासना करत, विविध माध्यमांतून मानव सेवेचे पवित्र कार्य करीत आहे आणि एकनाथजी रानडे यांच्या विचारांना पुढे नेत आहे. दि. १९ नोव्हेंबर हा एकनाथजींचा जन्म दिवस ’साधना दिवस’ म्हणून देशभर साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने एकनाथजींच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!
संजय पाठक
९४२००७७१५०
अग्रलेख
जरुर वाचा
नागपूरात हिंसाचार कसा घडला? जाणून घ्या सपूर्ण घटनाक्रम...

नागपूरात हिंसाचार कसा घडला? जाणून घ्या सपूर्ण घटनाक्रम...

दिवस होता सोमवार. रात्री ७.३० ते ८ वाजताच्या सुमारास नागपूर शहरातील काही भागात अचानक हिंसाचार उसळला. दोन गटात हाणामारी, दगडफेक, वाहनांची जाळपोळ या सगळ्या घटनांनी नागपूर हादरलं. एवढंच नाही तर जमाव पांगवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. तरीसुद्धा पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करत रात्री उशीरापर्यंत जमाव पांगवत हा हिंसाचार शांत केला. मुख्य म्हणजे हा सगळा प्रकार घडला तो म्हणजे कायम वर्दळ असलेल्या महाल परिसरात. सध्या नागपूरात संचारबंदी लागू करण्यात आलीये. मात्र, या घटनेची सुरुवात नेमकी कशी झाली? ..